Thursday 6 September 2018

परतूर शहराचा चेहरामोहरा बदलणार परतूर शहराच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी गटातटाचे राजकारण न करता विकास कामाला सहकार्य करा - पालकमंत्री बबनराव लोणीकर





            जालना, दि. 6 – परतूर शहरामध्ये 200 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातुन विविध विकास कामे करण्यात येत आहे.  येणाऱ्या काळात परतूर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा आपला मानस असुन पदाधिकाऱ्यांनी गटातटाचे राजकारण न करता विकास कामांना सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            परतूर येथे 45 कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाचे भूमिपुजन पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, मोहन अग्रवाल, रामेश्वर तनपुरे, रमेश भापकर, गणेश खवणे, प्रदीप ढवळे, अशोकराव बरकुले, शहाजी राक्षे, भगवानराव मोरे, बद्रीनारायण ढवळे, बी.डी. पवार, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार राजाभाऊ कदम, मुख्य अभियंता के.टी. पाटील, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता श्री सोनलकर आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, परतूर शहराची लोकसंख्या वाढत आहे.  वाढत्या लोकसंख्येनुसार नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करुन घेण्यात येत असुन परतूर शहराच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेण्यात आला असुन या माध्यमातुन विविध विकास कामे करण्यात येत आहेत.  परतूर शहरामध्ये अद्यावत अशा नाट्यगृहाच्या उभारणीबरोबरच न्यायालयाची दर्जेदार अशा इमारतीबरोबरच शादीखाना, स्मशानभूमी यासारखी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करण्यात येत असुन गेल्या चार वर्षात नगरपालिकेला विविध विकास कामांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            परतूर शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम बऱ्याच दिवसापासून रखडले होते.  यापूर्वी हा पुल गावामध्ये तयार करण्यात येणार होता.  परंतू स्थानिक व्यापाऱ्यांनी हा पुल गावातून गेल्यास येथील व्यवसाय धोक्यात येणार असल्याचे सांगून हा पुल इतरत्र वळविण्याची मागणी केली होती.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करुन या पुलाचा मार्ग बदलण्यात आला असुन यामुळे येथील व्यापार टिकण्याबरोबरच या उड्डाणपुलामुळे सुमारे 100 पेक्षा अधिक गावातील गावकऱ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न मिटणार असुन ज्या व्यापाऱ्यांच्या दुकानाची जागा यामध्ये संपादित करण्यात आली आहे त्यांना मावेजापोटी 9 कोटी 28 लक्ष रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            परतूर शहरातील वीज व्यवस्था सुरळीत होऊन नागरिकांना योग्य क्षमतेने वीज पुरवठा व्हावा यासाठी 21 ट्रान्सफार्मर कार्यान्वित करण्यात आले असुन चारशे पोल बदलण्यात येत आहेत. सह किलोमीटर एचटी लाईन, बारा किलोमीटर एलटी लाईन तसेच 19 किलोमीटर ए.बी. केबलही टाकण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठरावित दलितवस्तीमध्येच रस्त्यांची कामे करण्यात येत होती.  शहरातील प्रत्येक दलितवस्तीमध्ये मजबुत व दर्जेदार रस्ते व्हावेत यासाठी एक कोटी आठ लक्ष रुपये तर शहरातील मुख्य रस्त्याच्या कामांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राष्ट्रीय रुरबन मिशन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत परतूर तालुक्यातील आष्टीसह परिसरातील १६ गावांची निवड करण्यात आली असून यासाठी १८५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. निधीच्या माध्यमातून 16 गावातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देण्यात येत आहे. राष्ट्रीय रुरबन अंतर्गत आष्टी-पांडेपोखरी रस्त्यावर राज्यातील पहिली शेतकऱ्यांची मिनी एमआयडीसी उभारण्यात येत आहे. या मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच महिलांच्या बचतगटांना छोटछोटे उद्योग उभे करुन देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगला भावही या माध्यमातून मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. 


            रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई, ही देशातील अग्रगण्य संस्था असून मागील ८१ वर्षापासून रसायन तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन व नाविन्यपूर्ण कार्य करीत आहे. या संस्थेच्या उप केंद्रासाठी मौजे शिरसवाडी, ता.जि.जालना येथील गट नं.132 मधील 200 एकर शासकीय जमिन उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आली असून या उपकेंद्राच्या कामाचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले आहे. सध्या औद्योगिक वसाहती मध्ये भाडे तत्वारील जागेत हे उपकेंद्र सुरु करण्यात आले असुन उपकेंद्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी सोय झाली असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जालना जिल्ह्याचा विकास अधिकगतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असुन मराठवाड्यासह जिल्ह्यातील जवळपास 40 हजार लोकांना रोजगार देऊ शकणाऱ्या आणि सुमारे 6 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करण्याची क्षमता असलेल्या 109 कोटी रुपये गुंतवणुकीचा सीडपार्क जालना परिसरात होत आहे.  या सीडपार्कमुळे बियाणे उद्योगासमोरील अडचणी दूर करण्याबरोबरच पायाभुत सुविधांचा विकास करुन बियाणे उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्मितीद्वारे रोजगार आणि गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांनी आयुष्यभर जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संपूर्ण देश स्वच्छ व सुंदर करण्याचे आवाहन केले.  त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात 60 लक्ष शौचालयांची उभारणी करुन महाराष्ट्र राज्य देशात प्रथम आले असुन उभारण्यात आलेल्या शौचालयांचा प्रत्येक नागरिकाने नियमित वापर करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.

            उपकेंद्रावर तसेच ट्रान्सफार्मरवर विजेचा अतिरिक्त ताण पडल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना पुरेसा विजेचा पुरवठा करण्यात अडचणी येत होत्या या प्रश्नावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी वीज वितरणामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर शासनाने भर दिला असून जिल्ह्यातील जनतेला व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला सुरळीतपणे वीजेचा पुरवठा होण्यासाठी जिल्ह्यात 1500 नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आले असून जिल्ह्यासाठी नवीन 33 केव्हीचे 49 उपकेंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 19 उपकेंद्राच्या उभारणीचे काम सुरु झाले असून 170 कोटी रुपये खर्चून जालना येथे 220 केव्ही केंद्राचे काम करण्यात येत आहे तर परतूर येथील 220 केव्ही केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर 132 के.व्हीच्या नवीन 4 केंद्राचा प्रस्ताव असून ही सर्व कामे पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला अखंडितपणे विजेचा पुरवठा होणार असुन  मतदारसंघामध्ये  आठ 33 के.व्ही. उपकेंद्राबरोबरच 500 ट्रान्सफार्मरची उभारणी करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            तेलंगणा, आंध्रप्रदेश, श्रीलंका व गुजरात या राज्याच्या धर्तीवर जालना, परतूर व मंठा या तालुक्यातील 176 गावांना वॉटरग्रीडच्या माध्यमातुन शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 234 कोटी रुपयांची योजना साकारली जात आहे. या योजनेचे काम अत्यंत जलदगतीने करण्यात येत असून खडकपुर्णा प्रकल्प उद्धभ पकडून या तीन तालुक्यातील 92 गावासाठी रुपये 117 कोटीची नवीन योजना मंजूर करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातुन तीनही तालुक्यातील गावांना येणाऱ्या काळात केवळ 7 रुपयांमध्ये एक हजार लिटर एवढे स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यातील रस्ते विकासावर अधिक प्रमाणात भर देण्यात येत असून जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी केंद्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून शहरांसह ग्रामीण भागात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे.  शंभर गावात पक्के व डांबरी रस्त्याचे जाळे निर्माण करण्यात आले असुन  राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे.  हा मार्ग पुर्ण झाल्यास  परिसराचा विकास होण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.  शेगाव ते पंढरपूर मार्गे जालना या मार्गावर गतकाळात अपघातामध्ये वारकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. विदर्भातील प्रत्येक भाविकांना पंढरपूर या श्रद्धास्थानापर्यंत  कमी वेळात पोहोचता यावे यासाठी नवीन दिंडी मार्ग होणे आवश्यक होते. त्यामुळे शेगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-परतूर-माजलगाव हा मार्ग व्हावा अशी मागणी वेळोवेळी  नागपूर व दिल्ली येथे जाऊन  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याने हा रस्ता तातडीने मंजूर करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजनेच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येत असुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली असुन त्यापैकी 1 लाख 32 हजार 447 लाभधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 648 कोटी 52 लक्ष इतकी रक्कम जमा करण्यात आली असुन उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येत आहे.  जिल्ह्यातील 96 हजार 56 शेतकऱ्यांना 655 कोटी 54 लक्ष रुपये पीककर्जाचे वाटप करण्यात आले असुन जालना जिल्हा मराठवाड्यात पीककर्ज वाटपात प्रथम क्रमांकावर आहे.  बोंडअ ळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने 275 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असुन त्यापैकी 183 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.  तसेच पीकविम्यापोटी 5 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 176 कोटी 81 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती देत शेतकऱ्यांनी पीकवलेला माल हमी भावानेच व्यापाऱ्यांनी खरेदी करण्याचा शासनाने निर्णय घेतला असुन हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला दंडाबरोबरचे शिक्षेची तरतूद करण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
परतूर शहरात 63 कोटी 37 रुपयांच्या विकास कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
            शहरातील दलित वस्तीमधील रस्ते काम                                    -1 कोटी 8 लक्ष
            शहरातील मुख्य रस्ता                                                    - 6 कोटी
            शहरातील विविध भागात मंजूर 31 ट्रान्सफार्मर              
            6 कि.मी. एच.टी. लाईन, 12 कि.मी. एलटी लाईन,       - 2 कोटी 31 लक्ष
            19 कि.मी. ए.बी. केबल
            रेल्वे उड्डाणपुल                                                              - 45 कोटी
            रेल्वे उड्डाणपुल भु-संपादन                                             - 9 कोटी 28 लक्ष
            यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, मोहन अग्रवाल, मुख्य अभियंता के.टी. पाटील यांचीही समयोचित भाषणे झाली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी केले.
            कार्यक्रमास परतूर नगरपरिषदेचे नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शंभरपेक्षा अधिक गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******
           

No comments:

Post a Comment