Monday 9 August 2021

आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढवा विनामास्क संचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा -पालकमंत्री राजेश टोपे

 

 




      जालना, दि. 9 (जिमाका):-  कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घातलेल्या निर्बंधातून काही प्रमाणात जालना जिल्ह्याला सूट मिळाली असली तरी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, यादृष्टीने उपाययोजना करत विनामास्क संचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

         जालना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.     

  यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज  जिंदल, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, कल्याणराव सपाटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, उपजिल्हाधिकारी श्रीमती शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली कानडे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप,अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख,जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, अन्न औषध व प्रशासन विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर, डॉ. प्रताप घोडके, डॉ. संजय जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

             पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांच्या  चाचण्या करण्यात याव्यात.   जालना जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर हा आजघडीला जरी कमी असला तरी हा दर भविष्यात वाढु नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत आवश्यकतेनुसार कंटेंटमेन्ट झोन तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

       कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी मास्क, सुरक्षित अंतराचे पालन याबरोबरच लसीकरणही तेवढेच महत्वाचे आहे.  जालना जिल्हा लसीकरणाच्या बाबतीमध्ये ईतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मागे राहू नये यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अधिक दक्षपणे जनजगृती करण्यात यावी.    दैनंदिन लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवुन देत लसीकरणाची गती वाढविण्याच्या    सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

     जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट मंजूर करण्यात आले आहेत. या प्लॅन्टचे काम गतीने पूर्ण करण्याबरोबरच सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिकल परीक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

-*-*-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment