Monday 9 August 2021

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेच्या कामांना गती द्या -पालकमंत्री राजेश टोपे ◆योजनेचे प्रस्ताव विनाकारण प्रलंबित राहणार नाहीत याची गांभीर्याने दखल घ्या. ◆योजनेचे प्रस्ताव 15 दिवसामध्ये निकाली निघालेच पाहिजेत. ◆कामात दिरंगाई करण्यावर कारवाई तर चांगले काम करणाऱ्यांचा गौरव करणार.

 




        जालना, दि. 9 (जिमाका)शेतकऱ्यांच्या शेती बरोबरच शेतीला पूरक उद्योगामध्ये वृद्धी होऊन त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना अत्यंत उपयुक्त असुन या योजनेंतर्गत दाखल करण्यात येत असलेले प्रस्ताव विनाकारण प्रलंबित राहणार नाहीत याची गांभीर्याने दाखल घेण्यात यावी.  या योजनेअंतर्गत जिल्ह्यात करण्यात येत असलेली कामे अधिक गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत या कामात दिरंगाई अथवा हयगय करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई तर चांगले काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे  राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.

 यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज  जिंदल, कृषी विभागाचे उपसंचालक विजय माईनकर, सतिश होंडे, कल्याणराव सपाटे, नानाभाऊ उगले, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

                पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्याचे अर्थकारण शेतीवरच अवलंबून असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.नानाजी देशमुख कृषि संजीवनी  योजनेमध्ये वैयक्तिक विकासाबरोबरच सामुहिक विकासाच्या अनेकविध योजना राबविण्यात येत असल्याने या योजनेची जिल्ह्यात गतीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी केल्या.

              नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेंतर्गत प्राप्त होणारे प्रस्ताव मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी स्तरावर अनेकवेळा विनाकारण प्रलंबित ठेवण्यात येतात. या योजनेच्या अंमलबजावणी मध्ये कुठल्याही प्रकारची हयगय अथवा टाळाटाळ खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत या योजनेसाठी प्राप्त होणारे प्रस्ताव 15 दिवसांमध्ये निकाली काढण्यात यावेत. तसेच जिल्ह्यात योजनेचे काम गतीने व पारदर्शकपणे होईल, याची कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिले.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना राबविताना काही तांत्रिक अडचणी अथवा समस्या असतील व त्या जिल्हास्तरावर सुटू शकणाऱ्या नसतील आशा समस्या खात्याचे मंत्री, सचिव यांच्याशी समन्वय साधून सोडविण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

    बैठकीस तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सेवक आदींची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment