Monday 2 August 2021

जिरडगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध - पालकमंत्री राजेश टोपे

 






          जालना, दि.2 ( जिमाका) - जिल्ह्यातील गोरगरीबांसह प्रत्येक सर्वसामान्यांपर्यंत विकासाची गंगा होचुन त्यांचे आर्थिक सामाजिक जीवनमान उंचावे यासाठी आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, कृषी, सिंचन या बाबींवर अधिक प्रमाणात भर देण्यात येत असुन जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

            घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासस्थानाचे लोकार्पण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.  त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

            व्यासपीठावर  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, कल्याणराव सपाटे, भागवत रक्ताटे, रघुनाथ तौर, नानाभाऊ उगले, जीवनराव वघरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल,  तहसिलदार नरेंद्र देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, भास्करराव गाढवे, सुधाकरराव काळे, बापुराव देशमुख, राजाभाऊ देशमुख, रविंद्र आर्दड, संभाजी देशमुख, भागवत सोळुंके, शिवाजीराव काकडे, डॉ. नंदकिशोर उढाण, सुदामराव मुकणे, समद बागवान, नजिम पठाण, सुनिल उगले, अतिक पटेल, जगदिश नागरे, श्री वडगावकर, नाजिम पठाण  आदींची उपस्थिती होती.

            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासुन या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम विविध अडचणींमुळे रखडले होते.  परंतु आज यानिमित्ताने या वास्तुचे काम पुर्ण होऊन त्याचे लोकार्पण होत असल्याने मनस्वी आनंद होत आहे. जवळपास 6 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करुन सर्व सोयी-सुविधांनीयुक्त  दर्जेदार अशा प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.  जिरडगाव परिसरातील गावांमध्ये असलेल्या 31 हजारापेक्षा अधिक नागरिकांना आरोग्याच्या सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत.  याठिकाणी विविध आजारावरील उपचार, तसेच छोट्या स्वरुपाच्या शस्त्रक्रिया, महिलांच्या प्रसुती, कुटूंबनियोजन यासारख्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार असुन याठिकाणी स्वतंत्र अशी रुग्णवाहिका आवश्यक ते मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्यात आले असुन या उपकेंद्रामुळे खासगी रुग्णालयात नागरिकांना उपचार घेण्याची गरज भासणार नसुन या केंद्रामार्फत मोफत स्वरुपात देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करत या ठिकाणी संरक्षक भिंत तसेच अंतर्गत रस्त्याची कामे येत्या आठ दिवसांमध्ये पुर्ण करण्यात येऊन पुर्ण क्षमतेने हे उपकेंद्र सुरु करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी आरोग्य प्रशासनाला यावेळी दिल्या.

            जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात आला असुन जिल्हा रुग्णालयाचे अद्यावतीकरण करण्यात येऊन या ठिकाणी आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  रुग्णालयात सी.टी. स्कॅन मशिन व सी.आर. सिस्टीम यंत्रणा, एम.आर.आय व सोनोग्राफी, डायलेलीस सुविधा, स्टेमी प्रोजेक्ट, -संजिवनी सेवा, केमोथेरेपी कक्ष व सुविधा, कोव्हीड रुग्णालय व्हेंटीलेटरसह आय.सी.यु कक्ष, आर.टी.पी.सी.आर लॅब, ऑक्सिजन लिक्वीड टँक, प्लाझ्मा थेरेपी, यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.  कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यातील पहिल्या मॉडयुलर हॉस्पीटलची उभारणीही करण्यात आली असुन तीसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचे सांगत या सुविधांसाठी सीएसआर, एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा नियोजन मंडळ तसेच शासनामार्फत भरीव अशा निधीची तरतुद करुन घेण्यात आली.  घनसावंगी व अंबड येथील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी जालना अथवा औरंगाबाद येथे जावे लागु नये व त्यांच्याच तालुक्यात त्यांना उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी घनसावंगी व अंबड येथे नव्याने १०० खाटांच्या रुग्णालयास मंजुरी देण्यात आली असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

            विकासामध्ये  रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगत रस्ते विकासावरही भर देण्यात येत आहे.  रांजणी ते राजाटाकळी या 43 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 280 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन या निधीच्या माध्यमातुन तीन पदरी  सिमेंट रस्ता या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.  येत्या आठ दिवसांमध्ये या कामाची टेंडर प्रक्रिया पुर्ण होऊन वर्षभरामध्ये या रस्त्याचे काम पुर्णत्वास नेण्यात येणार आहे.  त्याचबरोबर वीरेगाव ते राजंणी या रस्त्यासाठीही निधी मंजुर असुन प्रमुख जिल्हा मार्गासाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेण्यात आला असुन लवकरच या सर्व रस्त्यांची कामे सुरु होणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

            ग्रामीण भागामध्ये तलाठ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य व्यक्तींची अनेक कामे असतात.  जिल्ह्यात तलाठी कार्यालयांची दुरावस्था असल्याने अनेकवेळा तलाठ्यांना शोधण्यातच नागरिकांचा वेळ जातो.  सर्वसामान्य व्यक्तींची असलेली विविध कामे त्वरेने मार्गी लागावीत, त्यांना त्यांच्या कामासाठी चकरा माराव्या लागु नयेत यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तलाठी सज्ज्यांसाठी स्वतंत्र ईमारतींच्या उभारणीसाठी निधी मंजुर करण्यात आला आहे.  तसेच घनसावंगी येथे एकाच छताखाली सर्व प्रशासकीय कार्यालये येऊन नागरिकांची कामे गतीने होण्यासाठी प्रशासकीय ईमारतही उभारण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातील जनतेला योग्य दाबाने व सुरळीतपणे वीजेचा पुरवठा व्हावा यासाठी विद्युत उपकेंद्रे उभारणीवरही भर देण्यात येत असुन वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना अखंडितपणे वीज मिळावी यासाठी एसडीटी ट्रान्सफार्मरही संपुर्ण जिल्ह्यात उभारण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

             जालना जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेमध्ये पोलीस ठाण्यांची मनुष्यबळाची संख्या कमी असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त ताण येत आहे.  या गोष्टीचा विचार करुन जिल्ह्यात असलेल्या पोलीस ठाण्यांचे विभाजन करुन नवीन पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. जालना, अंबड, राजुर, घनसावंगी, तीर्थपुरी, कुंभारपिंपळगाव या ठिकाणी नव्याने पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.  नवीन ठाण्यांबरोबरच अतिरिक्त मनुष्यबळ पोलिस विभागाला प्राप्त होणार असल्याने विभागाला प्रभावीपणे पोलिसिंग करुन  जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

            जिल्ह्यातील ऊसतोड कामागारांच्या पाल्यांना शिक्षण मिळावे यासाठी अंबड घनसावंगी येथे  मुलां-मुलींना राहण्यासाठी 100 क्षमतेची प्रत्येकी दोन अशा चार वसतीगृहांची उभारणी करण्यात येणार आहे.  प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचे घर मिळावे यासाठी गतवर्षात 4 हजार घरकुले मंजुर करुन घेतली असुन चालु वर्षात 10 हजार घरकुलांची मागणी जिल्ह्यासाठी करण्यात आली आहे.  त्याचबरोबरच जालना तालुक्यातील हातवण प्रकल्पासाठी 297 कोटी 39 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन घेण्यात आला असुन या  प्रकल्पासाठी भु-संपादनाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.        या प्रकल्पामुळे 714 हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याबरोबरच 24 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

            जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे म्हणाले, जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीच्या मिळाव्यात यासाठी पालकमंत्री राजेश टोपे सातत्याने प्रयत्नशिल असुन त्यांच्याच माध्यमातुन जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी भरीव तरतुद उपलब्ध होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, जिरडगाव येथे उभारण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रामुळे परिसरातील जवळपास 25 गावातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.  एवढ्या मोठया प्रमाणात निधी खर्च करुन उभारण्यात आलेले हे आरोग्य उपकेंद्र एक मॉडेल म्हणुन नावारुपास येऊन जिल्ह्यात नावलौकिक व्हावा यादृष्टीने काम करण्याबरोबरच सध्या पावसाळयाचे दिवस असुन साथीचे आजार पसरणार नाहीत, यादृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले.  कोरोना अजुन संपलेला नाही.  जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असुन कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन तसेच सॅनिटायजरचा वापर या त्रीसुत्रीचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            सर्वप्रथम पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले.  या उपकेंद्रासाठी जमीन देणाऱ्या डॉ. किशोर उढाण, ठेकेदार ..वडगावकर, जगदीश नागरे यांचा पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

*******

 

No comments:

Post a Comment