Friday 23 July 2021

प्राणवायूची नैसर्गिकरित्या अधिकाधिक निर्मिती होऊन सर्वांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचे आवाहन

 





    जालना दि.23 (जिमाका) :- आजघडीला भारत देशामध्ये  बेसुमार वृक्षतोडीमुळे तसेच वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे.  निसर्गाचा समतोल राखला जाऊन मानवी जीवन सुकर व्हावे या दृष्टिकोनातून वृक्ष लागवडीची चळवळ उभी होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिक्षक सेनेच्या माध्यमातून राज्यात 10 लक्ष वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला  आहे. वृक्षांपासून नैसर्गिकरित्या प्राणवायूची अधिकाधिक निर्मिती होऊन समाजातील प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी  प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन  अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी केले.

     अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री अभ्यंकर यांच्या हस्ते आज दि.23 जुलै रोजी घनसावंगी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, संत रामदास महाविद्यालय, पंचायत समिती येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

      यावेळी तहसिलदार घनसावंगी नरेंद्र देशमुख,गट विकास अधिकारी एम. जी. जाधव,शिक्षणाधिकारी (निरंतर) श्रीमती मंगल तुपे, गट शिक्षण अधिकारी रवी जोशी,मुख्याधिकारी नगर पंचायत विक्रम मांडुळगे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे, सुधाकर कापरे, आर. बी. वाहुळे, शिवाजी उगले, पजांबराव देशमुख, ॲड राजेंद्र देशमुख, नंदकुमार देशमुख, शेख न्याजु, रजाक बागवान, नरेंद्र जोगड, प्राचार्य राजेंद्र परदेशी, उपप्राचार्य सुभाष जाधव, भगवान मिरकड आदींची उपस्थिती होती.

      श्री अभ्यंकर म्हणाले, मानवी जीवनामध्ये वृक्षांचे अनन्य साधारण महत्व आहे.  वृक्षांची बेसुमार तोड करण्यात येऊन त्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येत नसल्यामुळे अनेक संकटे आपल्यासमोर येत आहेत. कोरोना या आजारामध्येसुद्धा प्राणवायूंच्या कमतरतेमुळे आपल्याला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. याच प्राणवायूंच्या कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.  त्यामुळे वाढते प्रदूषण कमी होऊन नैसर्गिकरित्या प्राणवायूची निर्मिती होण्यासाठी व मानवी जीवन सुकर होण्याच्यादृष्टीने वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली असल्याचेही श्री अभ्यंकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार घनसावंगी नरेंद्र देशमुख यांच्याकडून कोविड 19 बाबत प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना, रुग्णांची संख्या, लसीकरण आदी माहितीही त्यांनी यावेळी जाणून घेतली.

      अल्पसंख्याक समाजासाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ पोहोचावा तसेच अल्पसंख्याक समाजावर अन्याय होत असल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग सक्षमतेने काम करत असल्याचे सांगत अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या त्यांनी समस्याही यावेळी जाणून घेतल्या.

   अंबड तालुक्यातील जिजामाता हायस्कुल किनगाव व  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनगाव येथेही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री अभ्यंकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

   यावेळी तहसिलदार अंबड श्री कडवकर, गट शिक्षण अधिकारी विपुल भागवत, लक्ष्मीकांत आटोळे आदींची उपस्थिती होती.  यावेळी उपस्थित अल्पसंख्याक समाजातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही श्री अभ्यंकर यांनी जाणून घेतल्या.

-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment