Thursday 25 July 2019

जिल्हयातील आर्थिक गणना 2019 होणार पेपरलेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांचे आवाहन

जालना,दि.25:- देशामध्ये राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे.  ही गणना पेपरलेस म्हणजेच ॲपद्वारे करण्यात येणार आहे.  जिल्ह्यात या गणनेच्या माध्यमातुन संकलित होणारी माहिती अचुक व्हावी यासाठी सर्व संबंधित विभागांनी संयुक्तरित्या यामध्ये काम करावे.  तसेच माहिती संकलित करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रगणकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले. 
            सातवी आर्थिक गणना 2019-20 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हासुचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडुळकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी मनोज सयाजीराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की, आर्थिक गणना म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत असलेल्या सर्व आस्थापनांची संपूर्ण मोजणी होय. आर्थिक गणनेच्या माहितीवरुन संपूर्ण देशात तसेच गाव, वार्ड, तालुका स्तरावर ही माहिती केंद्र  राज्य शासनाला आणि स्थानिक शासनाला नियोजन व धोरणांसाठी उपयुक्त  ठरणार आहे. तसेच औद्योगिक विकासाचा अभाव असलेल्या क्षेत्रामंध्ये विस्तार करण्यासाठी माहिती उपयुक्त ठरणार आहे. गणना होणारे प्रमुख घटक उद्योग, रोजगार,कामगारांची संख्या, कारखाने, दुकाने, वस्त्रोद्योग इ. बाबत प्रत्येक घराला भेट दिली जाईल व सर्वांकडून माहिती प्राप्त करण्यात येणार असल्याने या उपक्रमाची माहिती जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवर सर्व पदाधिकारी तसेच गावकऱ्यांना देण्यात यावी.  यावेळी प्रथमच मोबाईल ॲपद्वारे आर्थिक गणना करण्यात येणार आहे.  त्यामुळे या उपक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांमार्फत अचूक माहिती संकलित व्हावी यासाठी तज्ज्ञ व्यक्तींमार्फत प्रशिक्षणाचे तातडीने नियोजन करण्याचे निर्देश देत या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            आर्थिक गणनेसंदर्भात माहिती देताना जिल्हा सांख्यिकी अधिकारी मनोज सयाजीराव म्हणाले की, दि. 30 जुलै, 2019 ला प्रगणकांना यासंदर्भात जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच ऑनलाइन मोबाइल ॲपदवारे  आर्थिक गणना होईल. ॲप मुळे मोबाईलची रेंज किंवा इंटरनेट सेवा उपलब्ध झाली नाही तरी गणनेतील तपशील भरता येणार आहे. आर्थिक गणेनेचे क्षेत्रकाम करण्यासाठी कॉमन सर्व्हीस सेंटर ई-गर्व्हनन्स यांच्यामार्फत ऑनलाईन परीक्षेद्वारे प्रगणक व पर्यवेक्षक यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हयात एकूण 1608 प्रगणक  व  785 पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली असून निवड झालेल्या प्रगणकास प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबाची माहिती संकलित केली जाणार आहे.
            या पार्श्वभूमीवर ‍ही गणना अधिक नेमकेपणाने अणि अचूक करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हयातील सर्व शहर व गावात गणनेचे काम प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे  यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली असून त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलिस अधीक्षक एस चैतन्य यांच्यासह 15 सदस्यांचा समावेश असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
            बैठकीस सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
******* 

No comments:

Post a Comment