Saturday 20 July 2019

वृक्ष लागवडीचा उपक्रम अधिकाऱ्यांनी कल्पकतेने राबवावा वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षांचे संवर्धनही करा- प्रधान सचिव विकास खारगे



जालना, दि. 20 -   वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असुन यामुळे जागतिक स्तरावर उष्णतेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. आपले गाव, तालुका व जिल्हा हरित होण्याच्या दृष्टीकोनातुन अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीचा उपक्रम कल्पकतेने राबविण्याबरोबरच वृक्षांच्या लागवडीबरोबरच त्यांच्या संवर्धनासाठी यंत्रणांनी काळजी घेण्याचे निर्देश वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या कामाचा आढावा श्री.खारगे यांनी  घेतला. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.  
            यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उप वन संरक्षक सतीश वडसकर, वनसंरक्षक सामाजिक वनीकरण श्री गुदगे, सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती पुष्पा पवार, वनक्षेत्रपाल श्रीकांत इटलोड, प्रशांत वरुडे सतीश बुरकुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री खारगे म्हणाले,  जालना जिल्ह्यास वृक्ष लागवडीचे देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पुर्ण होण्याबरोबरच वृक्ष लागवडीमध्ये लोकसहभाग वाढवावा. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम लोकचळवळीत रुपांतरीत होण्यासाठी लोकशिक्षण व प्रबोधन होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.  वृक्ष लागवड करताना शासकीय जमिनी, कार्यालयाच्या परिसरात उपलब्ध असलेली जागा त्याबरोबरच रस्त्यांच्या दुतर्फा अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याबरोबरच प्रत्येक शासकीय विभागाने आपल्या विभागाशी संबंधित असलेल्या नागरिकांनाही वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये सहभागी करुन घ्यावे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत.  वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यातील उद्योजकांशी संपर्क साधुन त्यांना वृक्ष लागवडीसाठी उद्युक्तच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवड कार्यक्रमाकडे केवळ शासकीय उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातुन न पहाता या माध्यमातुन पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्यासाठी बांबु तसेच तुतीच्या लागवडीवर भर द्यावा.  वृक्ष लागवड ही आज काळाची गरज बनली असुन या उपक्रमामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी जनजागृती करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            वृक्ष लागवड केलेल्या वृक्षांची आकडेवारी, छायाचित्रे, व्हिडीओ सातत्याने संकेतस्थळांवर, ऍपद्वारे अद्यावत करावेत. कन्या वन समृध्दी योजना, नरेगा अंतर्गत वनशेती, यासह इतर योजनांमधून अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याच्या सुचना करत जिल्ह्यातील 54 विभागांनी वृक्ष लागवडीअंतर्गत केलेल्या कामांचा आढावाही प्रधान सचिव विकास खारगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला.
उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवडीबद्दल
राज्य उत्पादन शुल्क व कोषागार कार्यालयाचे अभिनंदन
33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी अधिकची वृक्ष लागवड केल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीमती भाग्यश्री जाधव तसेच जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती वैशाली थोरात यांनी अनुक्रमे 365 टक्के व 166 टक्के वृक्ष लागवड केल्याबद्दल प्रधान सचिव विकास खारगे यांनी त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले. सर्व विभागांनी अशा प्रकारचे काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
*******


No comments:

Post a Comment