Saturday 29 June 2019

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन मिशनअंतर्गत परतूर तालुक्यातील आष्टीसह 16 गावांचा विकास करण्यासाठी सुरु असलेली विविध कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 29 - केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन मिशन अंतर्गत परतूर तालुक्यातील  आष्टीसह परिसरातील १६ गावांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  या 16 गावांमध्ये करण्यात येणारी विकास कामे  दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
            राष्ट्रीय रुरबन योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि. 29 जुन 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. लोणीकर बोलत होते.
            बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  श्री इंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
            श्री. लोणीकर म्हणाले, परतूर तालुक्यातील आष्टीसह 16 गावांमध्ये राष्ट्रीय रुरबन मिशनच्या माध्यमातुन विकास कामे करण्यात येत आहेत.  16 गावातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देऊन गावातील शेतकऱ्यांसह  नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्यात येणारी विविध विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत.  राष्ट्रीय रुरबन योजनेंतर्गत विविध गावात शाळाखोल्यांची उभारणी करत असताना शाळा खोल्यांची उभारणी दर्जेदार करण्यात यावी.  या सर्व शाळा डिजिटल शाळा करण्यात याव्यात.  ज्या ठिकाणी शाळाखोल्या उपलब्ध आहेत परंतू वास्तु जीर्ण अथवा मोडकळीस आली आहे अशा ठिकाणच्या खोल्या पाडून त्या ठिकाणी नव्याने शाळा खोल्यांची उभारणी करण्यात यावी.  शाळाखोल्यांच्या उभारणी संदर्भात असलेल्या अडचणी येत्या आठ दिवसाच्या आत निकाली काढण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
            मिशनअंतर्गत निवड करण्यात आलेल्या १६ गावांमधील गावातील तरुण-तरुणींना स्वत:च्या पायावर उभे राहून व्यवसाय करणे सोईचे व्हावे, यादृष्टीकोनातुन प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेंतर्गत विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात यावे.  गावातील बेघरांना स्वत:चे हक्काचे घर देण्यासाठी घरकुल योजनेंतर्गत अधिकाधिक घरकुलांना मंजुरी देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            राष्ट्रीय रुरबन मिशन हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असुन राज्यात सहा ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.  या प्रकल्पासाठी सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या सर्व प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्या असुन यंत्रणांनी दिलेला निधी वेळेत खर्च करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  
            याप्रसंगी पालकमंत्र्यांनी गावात करावयाच्या नळाद्वारे पाणी पुरवठा स्वच्छता, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, गाव अंतर्गत गटारे, रस्त्यावरील दिवे, गाव अंतर्गत रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, एल पी जी गॅस कनेक्शन, कौशल्य विकास प्रशिक्षण, आरोग्य सुविधा यासह गावात करण्यात येणाऱ्या सर्व विकास कामांचा विभाग निहाय आढावा घेऊन राष्ट्रीय रुरबन मिशनअंतर्गतची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
*******





No comments:

Post a Comment