Saturday 29 June 2019

33 कोटी वृक्ष लागवड : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यशाळा संपन्न मराठवाड्याला हरितक्रांतीकडे नेण्यासाठी वृक्ष लागवड मोहिमेमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदवावा - पालकमंत्री बबनराव लोणीकर



            जालना, दि. 29 –  वाढती लोकसंख्या तसेच शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.  वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असुन यामुळे जागतिक स्तरावर उष्णतेमध्ये सातत्याने वाढ होत आहे.  वृक्षांच्या कमतरतेमुळे मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असुन त्यामुळे सातत्याने मराठवाड्याला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.  मराठवाड्याचा कायमचा दुष्काळ संपविण्यासाठी तसेच मराठवाड्याला पाणीदार करुन मराठवाड्याला हरितक्रांतीकडे नेण्यासाठी 1 जुलै ते 30 सप्टेंबर या काळात उद्दिष्टापेक्षा अधिकची वृक्ष लागवड करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांनी वृक्षलागवड मोहिमेत अधिकाधिक सहभाग नोंदविण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यामध्ये 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असुन त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडी संदर्भात आज दि. 29 जुलै रोजी मातोश्री लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            याप्रसंगी व्यासपीठावर राहुल लोणीकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, भुजंगराव गोरे, दिलीप तौर, रामेश्वर तनपुरे, ॲड संजय काळबांडे,नानासाहेब उगले, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षीरसागर सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी पी.व्ही. जगत, उप वनसंरक्षक श्री वडसकर, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती पुष्पा पवार, प्रशांत वरुडे, के.बी. पांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती वृषाली तांबे, श्रीकांत इटलोड, वनपाल श्री बुरकुले, वनरक्षक श्री कुमावत, आदींची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, राज्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे.  मराठवाड्यात केवळ 4 टक्के व जालना जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी केवळ 1.29 टक्के एवढेच वनक्षेत्र आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, जल व  वायु प्रदुषण वाढत असुन त्याप्रमाणात वृक्ष लागवड न होता त्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे.  ही अत्यंत चिंतेची बाब आहे.  वनक्षेत्राच्या कमतरतेमुळे मराठवाड्यासह जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे.  वनक्षेत्र कमी असल्यामुळेच आपणाला सातत्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.  मराठवाड्यासह जिल्ह्यात पाऊस पाडण्यास कारणीभुत असलेल्या अधिकाधिक वृक्षांची लागवड केल्यास भविष्यात दुष्काळी परिस्थितीवर आपण कायमस्वरुपी मात करण्यात यशस्वी ठरु शकतो. यासाठी  संपूर्ण राज्यात वृक्ष लागवडीचा संकल्प पुर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे येऊन या उपक्रमात सहभागी होण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            जालना जिल्हयात १ जुलै ते 30 सप्टेंबर, २०१9 या कालावधीत १ कोटी 50 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक प्रमाणात वृक्षांची यशस्वीपणे लागवड सर्वांच्या सहकार्यातुन निश्चित पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करत केवळ वृक्ष लागवड करुन चालणार नाही तर त्या वृक्षांचे संगोपनही करणे तितकेच आज काळाची गरजी बनली  असुन वृक्ष लागवड करतांना शास्त्रोक्त पध्दतीनेच वृक्षांची लागवड करण्यात यावी. मानवी आरोग्यास उत्तम असलेल्या वड, पिंपळ, कडूलिंब, जांभूळ, बदाम, बांबू यासह 51 प्रकारच्या वृक्षांची प्राधान्याने लागवड करण्यात यावी. तसेच प्रत्येक विभागाला ठरवुन देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे काम काटेकोरपणे व जबाबदारीने पार पाडण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            मराठवाड्यातील पाण्याची पातळी अत्यंत खोली गेली असुन याबाबत चिंता व्यक्त करताना श्री लोणीकर म्हणाले की,  गतकाळात मराठवाड्याला सहा हजार पाचशे टँकरच्या माध्यमातुन पाणी पुरवठा करावा लागला.  लातुर शहराला तर रेल्वेने पाण्याचा पुरवठा करण्यात आला.  भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जाण्यासाठी आपणच कारणीभूत असल्याचे सांगत विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात भुगर्भातुन पाणी उपश्याचे प्रमाण केवळ 20 ते 22 टक्के असुन मराठवाड्यात मात्र हे प्रमाण 80 ते 82 टक्के एवढे आहे.  पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब न् थेंब अडवण्यासाठी व जिरवण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान गेल्या चार वर्षापासुन प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.  येणाऱ्या काळातही जलयुक्त शिवार अभियान अधिक गतीने राबवुन गावागावात पाण्याचे शाश्वत साठे निर्माण करणे, नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राज्यामध्ये अटल वन योजना राबविण्यात येत असल्याचे सांगत या योजनेच्या माध्यमातुन एका हेक्टरमध्ये 30 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.  यासाठी आवश्यक असणारी रोपे व ईतर मदत शासनाकडून करण्यात येणार असुन या योजनेसाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याचे आवाहन करत जलयुक्त शिवार अभियानाची कामे ज्या गावात झाली आहेत अशा ठिकाणी बांबु वृक्षाच्या लागवड करण्यात यावी  अत्यंत कमी पाण्यावर या वृक्षांची जोपासना करता येणे शक्य आहे. बांबु वृक्षापासुन अनेक प्रकारच्या वस्तुंची निर्मिती होत असुन या माध्यमातुन शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात उत्पन्न मिळणार असल्याने ग्रामपंचातींनी यामध्ये पुढाकार घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले की,  वृक्ष लागवड हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.  जिल्ह्याला १ कोटी 5 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असुन वृक्ष लागवडीची प्रशासनाकडून संपुर्ण तयारी करण्यात आली आहे. मियावॉकी फॉरेस्ट हा प्रकल्प अनेक ठिकाणी यशस्वी झाला असुन या प्रकल्पाच्या माध्यमातुन कमी जागेत जास्तीत जास्त वृक्षांची लागवड होत असल्याने जालना जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगत जालना जिल्ह्यात जैवविविधता प्रकल्प राबविण्याचा मंत्री महोदयांचा मानस असुन त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  जिल्ह्यात तुती लागवडीवर भर देण्यात येत असुन चालु वर्षात 85 लक्ष तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  या माध्यमातुन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याचे सांगत वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती क्षीरसागर म्हणाल्या की, वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना 3 हजार 200 रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकच्या वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन करत कन्यावनसमृद्धी योजनाही जिल्ह्यात राबविण्यात येत असुन याचा लाभही घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            कार्यशाळेचे प्रास्ताविक औरंगाबादचे उपवनसंरक्षक पी.एस. वडसकर यांनी केले. तत्पूर्वी जालना जिल्ह्यात वृक्ष लागवडीसंदर्भात केलेल्या नियोजनाची माहिती सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी पी.व्ही जगत यांनी उपस्थितांना दिली. कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच वटवृक्षाच्या पुजनाने करण्यात आली.  यावेळी रोपे आपल्या दारी या स्टॉलचे उदघाटनही पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******






No comments:

Post a Comment