Wednesday 14 September 2016

मंठा शहराचा सर्वांगिण विकास करणार-- पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना –  मंठा शहराचा विस्तार झपाट्याने होत असून शहराच्या सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            मंठा येथील मार्केट यार्ड येथे नवयुवक राजे छत्रपती गणेश मंडळाने आयोजित केलेल्या महाआरतीप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी गोपाळराव बोराडे, अंकुशराव अवचार, कल्याणराव बोराडे,  अंकुशराव बोराडे, सखाराम बोराडे, बाबुराव शहाणे, गणेश खवणे, प्रदीप बोराडे, सोनाबापू बोराडे, पंजाबराव बोराडे, अंकुश कदम, काशिनाथ बोराडे, राजाभाऊ बोराडे, श्री झंवर, श्री खरात, उप विभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, तहसिलदार श्री सोनवणे, कलंबर खाँ पठाण, शेख एजाज, इसाक पटेल, बी.डी. पवार, सहदेव मोरे आदींची उपस्थित होती.
            यावेळी बोलताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, मंठा शहराच्या विकासासाठी आपण विशेष लेख देणार असल्याचे सांगत जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छता अभियान, डासमुक्ती यासारखे अभियान‍ यशस्वीपणे राबविण्यात येत असून मंठा शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 15 कोटी 37 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाला गती देण्यात येत आहे. ही योजना येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून या योजनेच्या माध्यमातून मंठावासियांना पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असून या योजनेसाठी विद्युत विभागामार्फत अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
             मंठा शहरातील सांडपाणी शहरातील मंठा नदीमध्ये सोडण्यात येते.  या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शेतीला वापरण्यासाठी 3 कोटी 15 लक्ष रुपयांचा निधी नाबार्डच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला असल्याचही माहितीही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी उपस्थितांना दिली.
            संपूर्ण राज्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी शासनामार्फत भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून मंठा शहरातील मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार असून या कामासाठी 1 कोटी 30 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून रस्त्यांच्या बाजुचे सुशोभीकरणही करण्यात येणार असून मंठा व परतूर शहरातील विद्युत खांबावर एलईडी लाईट बसवण्याबरोबरच अल्पसंख्यांक बहुलक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत वसतीसाठी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
             महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकावर आहे तर जालना जिल्हा आठव्या क्रमांकावर आहे.  जालना जिल्हा स्वच्छ व सुंदर करुन स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी  समाजातील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदविण्याचे आवाहन करत पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की,  स्वच्छतेचा मंत्र प्रत्येकाने अंगी बाळगण्याची आवश्यकता आहे.  स्वच्छता ही यशाची गुरुकिल्ली आहे.  स्वच्छतेमुळे मानवी आरोग्य सदृढ राहण्याबरोबरच मनही प्रसन्न राहते.  अस्वच्छतेमुळे मानवाला अनेक रोगांचा सामना करावा लागतो.  स्वच्छता ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असल्याचे सांगून आपले तन व मन सदृढ राहण्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकाने बाळगण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी, चर्चा करण्यासाठी विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन जिल्ह्यातील विविध गणेश मंडळे समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. ही बाब अभिनंदनीय आहे. लोकमान्य टिळकांनी सर्व नागरिकांनी एकत्रित यावेत या उद्देशाने सुरु केलेल्या या सार्वजनिक उत्सवाला आता विराट स्वरुप प्राप्त झाले असून या उत्सवामध्ये सर्व जाती-धर्माचे नागरिक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात ही  एक अत्यंत चांगली बाब असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            या महाआरतीस अजय अवचार, सतीष निर्वळ, अशोक वायाळ, राधाकिसन बोराडे, बाजीराव बोराडे, संजय गायकवाड, नारायण दवणे, संजय बोराडे, रोहित बोराडे, दत्ता गोरे, भगवान कुलकर्णी, सचिन बोराडे, दत्ता हातकडके, ज्ञानेश्वर गोंडगे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******* 

No comments:

Post a Comment