Saturday 17 September 2016

शेतकऱ्यांच्या हिताचे राज्याचे नवे कृषी धोरण आणण्यासाठी प्रयत्नशिल-- कृषि मंत्री पांडूरंग फुंडकर

जालना, दि. 17 –शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेकविध योजना राबवित आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला रास्त भाव मिळून त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचिण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताचे राज्याचे एक नवे कृषी धोरण येत्या काळात आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी केले.
            वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व कृषि विभाग, जालना यांच्यासंयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालय, बदनापुर येथे रबी पीक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषिमंत्री श्री फुंडकर बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब दानवे-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी आमदार श्रीमती ढोरे,रामेश्वर भांदरगे,  जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दीपक चौधरी, परभणी येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.बी. वेंकटेश्वरलू, पुणे येथील कृषि परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे, कृषि तज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. पी.आर. शिवपुत्रे, गोविंद देशमुख, अनंतराव चोंदे, रविंद्र देशमुख, कुलसचिव दिलीप कच्छवे, डॉ. ए.एस. ढवन, डॉ. दत्तप्रसाद वासकर, विभागीय कृषि सहसंचालक रमेश भताने, विस्तार शिक्षणचे संचालक डॉ. बी.बी. भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे आदींची उपस्थित होती.
            यावेळी मार्गदर्शन करताना कृषिमंत्री श्री फुंडकर म्हणाले की, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज असून बदलत्या हवामानानुसार शेती करण्याची गरज आहे.  कमी पाण्यावर व कमी वेळात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची तसेच देशी वाणांच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक व शाश्वत पाणी, वीज व उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतकऱ्यांच्या पिकाला मिळण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे सांगत  शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज होऊन त्यांना शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगता यावं यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणारअसल्याचेही कृषिमंत्री श्री फुंडकर यांनी सांगितले.
            जगात कृषि क्षेत्रात होत असलेली नवनवीन संशोधने तसेच राज्यातील कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून विविध वाणांचे संशोधन करुन त्याचा लाभ राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच आत्माच्या माध्यमातून गटशेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल परदेशापर्यंत पोहोचावा व याचा चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत शेतकऱ्यांनी पारंपरित शेतीबरोबरच शेतीला किफायतशीर असे जोडधंदे करण्याची गरज असल्याचेही कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            रबी पिकांमध्ये घेण्यात येणाऱ्या पिकासंदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत मराठवाड्याच्या मुक्तीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करुन उपस्थित सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कृषिमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

            यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, कृषि क्षेत्रामध्ये नवनवीन अधिक उत्पन्न देणाऱ्या विविध प्रजातींची निर्मिती करुन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या प्रगती व उन्नतीसाठी शासन प्रयत्नशिल आहे.  शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज बनली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम उद्योग हा एक किफायतशीर असा उद्योग असून शासनामार्फत या उद्योगासाठी प्रतीहेक्टरी 2 लाख 55 हजार रुपये एका हेक्टरसाठी सबसीडी म्हणून देण्यात येतात.  जालना शहरातील रेमीश उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना कोष खरेदी, विक्रीसाठी बँगलोर येथे जावे लागत होते.  परंतू संपूर्ण मराठवाड्यासाठीचे खरेदी व विक्री केंद्र जालना येथे होत असून यासाठी शासनाने भरीव असा निधीही मंजूर केला आहे.  जालना जिल्हा हा फळबागांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.  मोसंबी पिकाचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.  या मोसंबीवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पासाठी शासनाने 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            शेतीला शाश्वत व मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. गतवर्षात राज्यात 5 हजार गावांमधून ही योजना यशस्वीरित्या राबविण्यात आली तर लोकसहभागातून 400 कोटी खर्चून एक हजार गावातून जलसंधारणाची कामे करण्यात आली येणाऱ्या काळातही ही योजना संपूर्ण राज्यात यशस्वीरित्या राबविण्यात येणार असल्याचे सांगत शहरातील अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शेतीला देण्यासाठी जिल्ह्यात प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.  
            यावेळी मार्गदर्शन करताना खासदार रावसाहेब दानवे म्हणाले की, गेल्या तीन वर्षात पावसाच्या अल्प प्रमाणामुळे मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती होती. अशा परिस्थिती शासनाने अनेकविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले सून शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे खा. दानवे यांनी यावेळी सांगितले.
            शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेती करणे आवश्यक झाले असून कृषी क्षेत्रात पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या ज्ञानाचा फायदा शेती विकसित करण्यासाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्यात जलयुक्त शिवार अभियानातून           1 हजार 400 कोटी रुपये खर्चून जलसंधारणाची विविध कामे यशस्वीरित्या करण्यात आली असून 24 टीएमसी पाणी अडविण्यात व साठविण्यात शासनास यश आल्याचेही खासदार श्री दानवे यांनी यावेळी सांगितले.
            आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कुलगुरु बी. वेंकटेश्वरलू यांनी येणाऱ्या काळात विद्यापिठातील मनुष्यबळ सक्षम करण्याबरोबरच अनेकविध वाणांचे संशोधन करुन ते अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोविण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
            याप्रसंगी कृषि परिषदेचे उपाध्यक्ष राम खर्चे,आमदार नारायण कुचे, माजी आमदार विजय गव्हाणे यांचीही समयोचित भाषणे झाली.  सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते बियाणे विक्री केंद्र, कृषि प्रदर्शन तसेच पॉली हाऊसचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शेतीभाती रबी पीक विशेषांक, पीक संरक्षण मोहिम पुस्तिका तसेच मोसंबी ॲपचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.  कार्यक्रमाची सुरुवात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  कार्यक्रमाचे संचलन डॉ. विना भालेराव यांनी केले.
            मेळाव्यास पदाधिकारी, अधिकारी, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******



No comments:

Post a Comment