Friday 5 April 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 परतूर, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा

 





जालना, दि. 5 (जिमाका) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने परभणी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक कामाकाजाचा आज निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला, निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. विष्णुकांत आणि निवडणूक निरीक्षक (खर्च) अनुराग चंद्रा यांनी सविस्तर आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघासाठी सदर  निवडणूक निरीक्षकांची निवड केली आहे.

घनसावंगी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, दीपक पाटील आदींसह निवडणुकीशी संबंधित विविध कामकाजाचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला म्हणाले की, निवडणूक भयमुक्त व सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करावे. कर्मचाऱ्यांना व्यवस्थितपणे प्रशिक्षण द्यावे.  निवडणुकीत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रभावीपणे जनजागृती करावी. मतदार व निवडणुक कामाकरीता नियुक्त कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा अवश्य द्याव्यात.

निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. विष्णुकांत यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. विशेषत: सण-उत्सवाच्या काळात अधिक दक्ष राहावे. तर निवडणूक  निरीक्षक (खर्च) अनुराग चंद्रा  यांनी निवडणूकीशी संबंधित खर्चाचे अहवाल अद्यावत ठेवावेत. वेळेवर संबधित नोडल अधिकाऱ्यांकडून खर्च अहवाल प्राप्त करुन घ्यावेत, अशा सूचना केल्या.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सादरणीकरणाव्दारे परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या, मतदान केंद्र व तेथे मतदारांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा, दिव्यांग मतदारांसाठीच्या सुविधा, मनुष्यबळ, वाहन सुविधा, चेकपोस्ट, भरारी पथके, प्रतिबंधात्मक कार्यवाया, साहित्य व्यवस्थापन, स्वीप अंतर्गत मतदानाविषयी करण्यात आलेली जनजागृती याबाबत सविस्तर माहिती दिली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी  निवडणूक व सणाच्या अनुषंगाने करण्यात आलेले पोलीस बंदोबस्ताच्या नियोजनाबाबत माहिती दिली. तसेच अवैध कारवाया रोखण्यासाठी केलेल्या कारवाईची माहिती दिली. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी स्वीप अंतर्गत मतदानाबाबत जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

                                                                    -*-*-*-*-*-        

No comments:

Post a Comment