Thursday 28 October 2021

शासन नियमानुसार कामगारांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या कामगारांचे वेतन दरमहा त्यांच्या बँक खात्यात जमा होईल यादृष्टीने काळजी घ्या - राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशन जी

 




      जालना, दि. 28 :- जालना जिल्ह्यातील स्वच्छता कामगारांना शासन नियमानुसार सर्व सोयी-सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत. सर्व कामगारांना त्यांचे वेतन विहित वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याच्यादृष्टीने काळजी घेण्याबरोबरच सर्व कामगारांचा गटविमा काढण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशन जी यांनी दिले.

         जिल्ह्यातील कामगांराना देण्यात येणाऱ्या सुविधासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासभागृहात आढावा बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

         यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल,अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपजिल्हाधिकारी (सामान्यप्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, नगरपालिका प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमित घवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्यासह सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सफाई कामगार व कंत्राटदारांची उपस्थिती होती.

       आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन म्हणाले, नियमित व कंत्राटी सफाई कामगारांना त्यांचे वेतन विहित वेळेत मिळणे आवश्यक आहे. कामगारांचे वेतन त्यांच्या बँक खात्यामध्येच जमा करण्यात यावेत. त्याचबरोबर या कामगांराच्या वेतनातुन भविष्य निर्वाह निधीची रक्कम दरमहा कपात होईल, यादृष्टीनेही आवश्यक ती काळजी घेत त्यांच्या खात्यामध्ये रक्कम होते आहे किंवा नाही याची ते पडताळणी करण्यासाठी कामगारांना त्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांकही उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

कामगारांच्या आरोग्याच्यादृष्टीने त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी होणे आवश्यक असुन कामगारांना सुरक्षिततेच्यादृष्टीने गमबुट, हॅडग्लोज, साबण, मास्क, सॅनिटायजर, गणवेष आदी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याच्या सुचना करत कामगारांना राष्ट्रीय व धार्मिक उत्सवानिमित्त सुट्टी देण्यात यावी. सुट्टीच्या दिवशी कामगारांनी काम केल्यास त्या दिवसाचा मोबदलाही त्यांना देण्याच्या सुचनाही एम. व्यंकटेशन यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

अध्यक्षांनी साधला सफाई कामगारांशी संवाद

          आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या कामगारांशी आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांच्याशी संवाद साधत आपणास दरमहा किती पगार मिळतो, सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक सर्व साहित्य मिळते काय, आपल्या आरोग्याची नियमितपणे चौकशी करण्यात येते का, किती तास काम करता, यासहत कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी बाबींची माहिती त्यांनी यावेळी जाणुन घेतली.

-*-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment