Monday 25 October 2021

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा उपसभापती श्रीमती गोऱ्हे यांनी घेतला आढावा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देत त्यांचे पुनर्वसन करा - उपसभापती श्रीमती निलम गोऱ्हे

 



          जालना, दि.25 ( जिमाका) –  कोरोना या महामारीमध्ये घरातील कर्ता पुरुषाच्या निधनामुळे अनेक महिला विधवा होण्याबरोबरच बालके अनाथ झाली आहे.  महिला व बालकांच्या मदतीसाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सच्या उपसमितीची स्थापना करुन या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देत त्यांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती श्रीमती निलम गोऱ्हे यांनी दिले.

            जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती गोऱ्हे बोलत होत्या.

            याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भीमराव रणदिवे, कल्याणराव सपाटे, अभिमन्यु खोतकर, भाऊसाहेब घुगे,  श्रीमती संगिता चव्हाण यांच्यासह सर्व संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

            उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, कोरोना या महामारीमध्ये घरातील कर्ता पुरुष दगावल्याने महिलांसमोर जगावे कसे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.  महिलांचे पुनर्वसन करत असताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन देत असतानाच शेतकरी महिलांना खते, बि-बियाणे याबरोबरच उमेदमार्फत महिलांना अधिकाधिक मदत करण्याच्या सुचना करत जिल्ह्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी कृषि विभागाने सर्वंकष प्रयत्न करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

            जालना जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना 47 कोटी 20 लक्ष रुपयांची मदत शासनामार्फत त्यांच्या खात्यात वितरित करण्यात आली असल्याचे सांगत जिल्ह्यात घरेलु कामगारांची नोंदणी अत्यंत कमी आहे.  जिल्ह्यातील घरेलु कामगारांची अधिकाधिक नोंदणी व्हावी यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.  जिल्ह्यात नोंदणीकृत अशा 4 हजार 704 रिक्षाचालक असुन 736 रिक्षाचालकांना शासनामार्फत मदत देण्यात आली आहे.  तालुकास्तरावर तसेच लहान गावांमध्ये असलेल्या रिक्षाचालकांना शासनाच्या योजनेची माहिती व्हावी यादृष्टीने योजनेची व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याबरोबरच ज्या रिक्षाचालकांनी मदतीसाठी अर्ज केलेले आहेत व त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करुन अधिकाधिक रिक्षाचालकांना मदत देण्याच्या सुचना करत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, खावटी अनुदान, कोरोनाच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजना आदी विषयांचाही श्रीमती गोऱ्हे यांनी व्यापक स्वरुपात आढावा घेतला.

            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असुन नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे 600 कोटी रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे.  ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीकडुनसुद्धा नुकसान भरपाई मिळावी यासाठी नुकसानीच्या माहितीबरोबरच वस्तुनिष्ठ पद्धतीने पीक कापणी प्रयोग राबविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक प्रमाणात गती देण्याची गरज असल्याचे सांगत मिशन कवचकुंडल या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वदूर लसीकरणाबाबत जनजागृती करत अधिक गतीने लसीकरण करण्यात यावे.  जालना जिल्हा लसीकरणाच्या बाबतीमध्ये राज्यातील ईतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागे राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केल्या.

उपसभापती श्रीमती निलम गोऱ्हे यांनी साधला संरपंचांशी संवाद

            जालना जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या गावातील संरपंचांशी उपसभापती श्रीमती निलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष संवाद साधत आपले गाव कशा पद्धतीने कोरोनामुक्त केले, यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबविण्यात आली याबाबतची माहिती जाणुन घेत संरपंचांनी गाव कोरोनामुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचे ईतरांना प्रेरणादायी ठरेल अशा यशकथांचे संकलन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

-*-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment