Friday 22 October 2021

नळणी बु. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ दर्जेदार व गुणवत्तापुर्ण विकास कामांसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - पालकमंत्री राजेश टोपे




          जालना, दि.22 ( जिमाका) –  सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानुन शासनामार्फत अनेक विकास योजना राबविण्यात येतात. विकास कामे करत असताना गटातटाचे राजकारण न करता सर्वांच्या सहभागातुन दर्जेदार व गुणवत्तापुर्ण विकास कामे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली

            भोकरदन तालुक्यातील नळणी बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आल.  त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

             व्यासपीठावर  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, आमदार नारायण कुचे, डॉ. चंद्रकांत साबळे, आशा मुकेश पांडे, गजानन नागवे, कल्याण सपाटे, कैलास पुंगळे, बबलु चौधरी, श्री गावंडे, सत्यनारायण लोहिया, संजय पोकळे, राजाभाऊ देशमुख, शालीग्राम जाधव, गोपाळ जाधव, ज्ञानेश्वर जाधव, प्रदीप जाधव, योगेश जाधव, गणेश जाधव, उत्तमराव पगारे, बधुसिंग सिंगल, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसिलदार श्रीमती सारीका कदम,  गावच्या सरपंच प्रतिभाताई जाधव, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.‍विवेक खतगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रघुवीरसिंग चंदेल, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप घोरपडे आदींची उपस्थिती होती.

            पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासुन या ठिकाणच्या नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होतीराजुर येथे ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आल्याने त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर करुन नळणी बु. या ठिकाणी या केंद्राचा शुभारंभ करण्यात आल्याचा मनस्वी आनंद आहेया केंद्राच्या ईमारतीसाठी 7 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन या निधीच्या माध्यमातुन 20 बेडची क्षमता असलेले व शस्त्रक्रियागृह, प्रसुतीगृहाचा समावेश असलेली ईमारत येणाऱ्या काही महिन्यात या ठिकाणी उभारण्यात येणार आहेयाठिकाणी विविध आजारावरील उपचार, तसेच छोट्या स्वरुपाच्या शस्त्रक्रिया, महिलांच्या प्रसुती, कुटूंबनियोजन यासारख्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत याठिकाणी स्वतंत्र अशी रुग्णवाहिका व आवश्यक ते मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या उपकेंद्रामुळे खासगी रुग्णालयात नागरिकांना उपचार घेण्याची गरज भासणार नसुन या केंद्रामार्फत मोफत स्वरुपात देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.

            जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात आला असुन जिल्हा रुग्णालयाचे अद्यावतीकरण करण्यात येऊन या ठिकाणी आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे सांगत लोकसंख्येच्या आधारावर नागरिकांना आरोग्याच्या सेवा दर्जेदार व अधिक गतीने मिळाव्यात यासाठी जिल्ह्यात नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व 87 उपकेंद्रांना मान्यता देण्यात येणार  असल्याचेही  पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

            राज्यात पुणे, ठाणे, नागपूर रत्नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये कार्यरत असून सद्दस्थितीत मराठवाडा विभागासाठी एकही प्रादेशिक मनोरुग्णालय नव्हते. मानसिक रुग्णांचे आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन यासाठी होणारी गैरसोय टाळण्याकरीता तसेच मानसिक आरोग्य विषयक सुविधा मराठवाड्यातील जनतेला उपलब्ध होण्यासाठी जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता देत यासाठी  104 कोटी रुपयांचा निधीही मंजुर केला आहे. मराठवाडा विभागात मनोरुग्णालय नसल्याने रुग्णांना नागपूर आणि पुणे येथे जावे लागण्याची गरज आता पडणार नसुन यामुळे या भागातील रुग्णांची मोठी सोय होणार असल्याचे सांगत या रुग्णालयाच्या ईमारतीचे काम पुर्ण होईपर्यंत  तात्पुरत्या स्वरुपात जालना येथे स्त्री रुग्णालय येथे 50 खाटांचे मनोरुग्णालय सुरु करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

            जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपीक, फळपीकासह मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहेझालेल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण करण्यात येऊन या नुकसानीपोटी 600 कोटी रुपयांच्यानिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असुन हा निधी मिळवण्यासाठी आपण व्यक्तश: प्रयत्न करणार असल्याचे सांगत विमा कंपनीकडुनही झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळवुन देण्यासाठी आपण आग्रही असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

        कोरोना या आजारामध्ये कवचकुंडलाची भूमिका बजावणाऱ्या लसीचा डोस प्रत्येकाने घेणे गरजेचे आहेलस ही अत्यंत सुरक्षित असुन या लसीपासुन कुठल्याही प्रकारचा धोका नाही. लस ही  कोरोनापासुन संरक्षण देणारी संजीवनी ठरली असुन प्रत्येकाने लस टोचुन घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.

            जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे म्हणाले, जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीच्या मिळाव्यात यासाठी पालकमंत्री राजेश टोपे सातत्याने प्रयत्नशिल आहेत. त्यांच्याच माध्यमातुन जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी भरीव तरतुद उपलब्ध होत असुन नळणी बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातुन 40 हजार लोकसंख्येला याचा लाभ  होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            याप्रसंगी आमदार नारायण कुचे, श्रीमती आशाताई मुकेश पांडे, डॉ. चंद्रकांत पुंगळे, संजय पोकळे, कैलास पुंगळे आदींचीही समयोचित भाषणे झाली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी केले.

            कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह पंचक्रोशितील महिला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-          

No comments:

Post a Comment