Tuesday 9 November 2021

शासकीय व खासगी रुग्णालयांच्या फायर व स्ट्रक्चरल ऑडीटचे काम 30 नोव्हेंबरपर्यंत पुर्ण करुन अहवाल सादर करा -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड


 


 

     जालना, दि. 9 (जिमाका) :- सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हा रुग्णालयासह व शासकीय व खासगी रुग्णांलयांच्या फायर व स्ट्रक्चरल ऑडीटचे काम येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश देत या कामामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय अथवा दिरंगाई खपवुन घेतली जाणार नसल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्पष्ट केले.

                जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात फायर ऑडीट संदर्भात आयोजित आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

                यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओमकार चांडक, श्री नागरे, कार्यकारी अभियंता (विद्युत) श्री भोसले यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षकांची उपस्थिती होती.

                जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, अहमदनगर येथील रुग्णालयात नुकतीच अपघाताची घटना घडली आहे.  जालना जिल्ह्यात अशी घटना घडु नये यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातुन  जिल्हा रुग्णालयाच्या फायर ऑडीटचे काम येत्या १० दिवसांमध्ये पुर्ण करण्यात यावे तर उर्वरित रुग्णालयांचे काम 30 नोव्हेंबरपर्यंत पुर्ण करुन अहवाल सादर करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

                प्रत्येक शासकीय व खासगी रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक असुन त्यादृष्टीनेही उपाययोजना करण्यात याव्यात.  त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी आगीची घटना घडल्यास अग्निरोधकाच्या मदतीने आग वीझवण्याबाबतचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment