Monday 1 November 2021

मिशन कवचकुंडल मोहिमेच्या दोन टप्प्यात जिल्ह्यात साडेपाच लाखाहुन अधिक लसीकरण जिल्हा प्रशासनाच्या कामाचे पालकमंत्र्यांकडुन कौतुक लसीकरणाचा वेग कमी न होता जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण होण्यासाठी काटेकोर नियोजन करा - पालकमंत्री राजेश टोपे

 



      जालना दि. 1 (जिमाका):-  कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जिल्ह्यात मिशन कवचकुंडल मोहिमेच्या दोन टप्प्यात जिल्ह्यात साडेपाच लाखापेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असुन ही अत्यंत समाधानाची बाब आहे.  लसीकरणाचा वेग कमी न होता याच पद्धतीने संपुर्ण जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

         जालना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.      

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस, उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, डॉ. जयश्री भुसारे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. नार्वेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले,  जिल्ह्यात लसीकरण सुरु झाल्यापासुन केवळ पाच ते दहा हजार लाभार्थ्यांना दैनंदिन लस टोचली जात होती.  परंतु जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातुन लसीकरणाचा आकडा दैनंदिन 30 हजारापर्यंत गेला असुन ही अत्यंत समाधानाची बाब आहे.  जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल तसेच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे हे शक्य होत असुन प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत लसीकरणाची गती कमी होणार नाही यादृष्टीने नियोजन करत येत्या 16 नाव्हेंबर  रोजी संपुर्ण जिल्ह्यात 50 हजार लाभार्थ्यांना लस टोचण्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचनाही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिल्या.

            जिल्हा हा लसीकरणात राज्याच्या तुलनेमध्ये मागे  न राहता राज्याच्या सरासरीच्या पुढे राहील याची काळजी घेत महाविद्यालयांमधुन विशेष कँपचे आयोजन करत विद्यार्थ्यांना लस टोचण्याचे नियोजन करण्यात यावे.  जालना जिल्ह्यात चार गावांमध्ये 100 टक्के लसीकरण पुर्ण करण्यात आले असुन यामध्ये घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, घोन्सीतांडा, बदनापुर तालुक्यातील अंबडगाव तर जाफ्राबाद तालुक्यातील ढोलखेडा   या गावांचा समावेश असुन या गावांनी लसीकरणासाठी केलेल्या कामांची यशकथा तयार करण्यात येऊन इतर गावांना प्रेरणादायी ठरतील अशा पद्धतीने त्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

             आजघडीला जालना जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी कोरोनामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढु नये यासाठी जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्यात यावी.  लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांच्या  चाचण्या करण्यात याव्यात. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींची माहिती पोर्टलवर अपडेट होईल, यादृष्टीनेही काळजी घेण्याच्या सुचना पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केल्या.

            केंद्र शासनाच्या अखत्यारित असेलेले कर्मचारी राज्य बिमा निगम ईएसआयसी हे कामगारांना विविध सेवा, सुविधा देण्याचे काम करते.  ज्या जिल्ह्यामध्ये 30 हजारापेक्षा अधिक कामगारांनी ईएसआयसीमध्ये नोंदणी केलेली आहे अशा ठिकाणी या मजुरांसाठी सर्व सुविधांनीयुक्त असे रुग्णालय उभारण्यात येते.  जालना जिल्ह्यात मोठी औद्योगिक वसाहत असण्याबरोबर जिल्ह्याच्या आठही तालुक्यात 10 पेक्षा अधिक कामगार काम करत असलेल्या अनेक आस्थापना असुन ईएसआयसीचे रुग्णालय जालन्यात व्हावे यासाठी अधिकाधिक कामगारांची नोंदणी करुन घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

*******

 

No comments:

Post a Comment