Monday 13 February 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे


            जालना, – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी, 2017 रोजी मतदान होत असून या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वतोपरी तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.
            जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक 2017 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना श्री जोंधळे बोलत होते.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या एकूण 56 गटासाठी 139 स्त्री तर 131 पुरुष असे एकूण 270 उमेदवार तर पंचायत समितीच्या 112 गणासाठी 259 स्त्री व 239 पुरुष असे एकूण 498 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.  जिल्ह्यात 5 लाख 22 हजार स्त्री मतदार तर 5 लाख 85 हजार 313 असे एकूण 11 लाख 7 हजार 813 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.   या निवडणुकीसाठी 2 हजार 898 कंट्रोल व बॅलेट युनिट पुरविण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी 133 क्षेत्रीय अधिकारी, 1 हजार 497 मतदान केंद्राध्यक्ष, 4 हजार 434 मतदान अधिकारी असे एकूण 6 हजार 119 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर एक व जिल्हाधिकारी कार्यालयात एक असे एकूण 9 आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी दोन भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.  जिल्ह्यात एकूण 18 चेकपोस्ट, 17 व्हिडीओ सर्व्हीलेन्स पथक व 9 खर्च तपासणी पथके कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना दिली.
            मतदानाच्या एक दिवस अगोदर दि. 15 फेब्रुवारी मतदानाचा दिवस 16 फेब्रुवारी व मतमोजणी दि. 23 फेब्रुवारी, 2017 रोजी जिल्ह्यात ड्राय डे पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या असून मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवणे तसेच मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्याबाबत सर्व संबंधितांना सुचना देण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह म्हणाल्या की निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून या कालावधीत 9 उप विभागीय पोलीस अधिकारी, 27 पोलीस निरीक्षक, 79 सहाय्यक पोलीस निरीक्ष आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकाऱ्यांबरोबरच 1 हजार 152 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.   त्याचबरोबर बाहेर जिल्ह्यातील 115 पोलीस कर्मचारी, 240 नवप्रशिक्षणार्थी, एक राज्य राखीव दलाची कंपनी व 600 होमगार्ड यांचीसुद्धा नियुक्ती निवडणुकीसाठी करण्यात आली आहे.           
            निवडणुकीच्या कालावधीमध्ये 107 कलमान्वये 710, कलम 110 अन्वये 165 इसमांवर प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून कलम 149 प्रमाणे 454 इसमांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.  त्याचबरोबर कलम 144 (2) अन्वये 8 इसमांवर कारवाई करण्यात आली असून अवैधरित्या दारुची विक्री व वाहतुक आणि साठवणूक करणाऱ्यांच्या संदर्भात 296 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहितीही पोलीस अधीक्षकांनी यावेळी पत्रकारांना दिली. मतदारांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही श्रीमती ज्योतिप्रिया सिंह यांनी यावेळी केले.
            या पत्रकार परिषदेस विविध वर्तमानपत्राचे प्रतिनिधी, संपादक तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*******

No comments:

Post a Comment