जालना,दि.15 (जिमाका) : राष्ट्रीय
कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग संक्रमण' हे महत्त्वाकांक्षी
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्यात कुष्ठरोगाच्या प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचारासाठी
विशेष सर्वेक्षण मोहीम दि. 16 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात
येणार आहे.
मागील
पाच वर्षांत निदान झालेल्या कुष्ठरुग्णांच्या कुटुंबीय व निकट संपर्कातील सहवासितांचे
सर्वेक्षण (Contact Survey) तसेच Focused Leprosy Campaign (FLC) राबविण्यात येणार
आहे. समाजातील लपलेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधणे, निदान झालेल्या रुग्णांच्या निकट
संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे, विशेषतः बाल कुष्ठरोग, सांसर्गिक कुष्ठरोग
(Multi bacillary) तसेच श्रेणी 1 (Grade-I) व श्रेणी 2 (Grade-II) विकृती असलेल्या
रुग्णांचे प्रमाण कमी करणे आणि संसर्गाची साखळी खंडित करणे, हा या मोहिमेचा प्रमुख
उद्देश आहे. उच्च जोखमीच्या भागांवर विशेष लक्ष Focussed Leprosy Campaign अंतर्गत
14 वर्षा खालील कुष्ठरुग्ण आढळण्याची शक्यता असलेली क्षेत्रे, सांसर्गिक (MB) कुष्ठरुग्णांच्या
संपर्कातील सहवासित, मागील पाच वर्षांत कुष्ठरुग्ण आढळलेल्या कुटुंबांतील व्यक्ती,
विकृती असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील सहवासित तसेच कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असलेली
गावे, पाडे आणि शहरी वॉर्ड यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
शहरी
भागात निवडक क्षेत्रातील सुमारे 200 घरांचा तर ग्रामीण भागात लोकसंख्येनुसार संपूर्ण
गाव अथवा संबंधित रुग्णाच्या परिसरातील सुमारे 300 घरांचा घरभेटीद्वारे सर्वेक्षण करण्यात
येणार आहे. मागील पाच वर्षांतील रुग्णांची यादी (Line List) तयार करून त्यानुसार सर्वेक्षणाचे
नियोजन करण्यात येणार आहे.
संशयीत
कुष्ठरुग्णांची तातडीने तपासणी व उपचार
सर्वेक्षणादरम्यान
त्वचेवरील बधीर चट्टे बाधित मज्जा, हात पायांच्या संवेदनांमध्ये घट आदी कुष्ठरोगाची
लक्षणे असलेल्या संशयित व्यक्तींची पुढील तपासणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार
संबंधित आरोग्य संस्थेकडे संदर्भित करून निदान व उपचाराची कार्यवाही केली जाणार आहे.
तसेच पात्र सहवासितांना प्रतिबंधक औषधोपचार Post Exposure Prophylaxis (PEP), देण्यात
आले आहे किंवा नाही. याची तपासणी केली जाणार असून, पात्र व्यक्तींना नियमानुसार प्रतिबंधक
उपचार PEP देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
आरोग्य
विभागाच्या पथकांमार्फत अंमलबजावणी
या मोहिमेची
प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची
राहणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम (NLEP) अंतर्गत कर्मचारी, वैद्यकीय
अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच आवश्यकतेनुसार इतर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे
सहकार्य घेण्यात येणार आहे, हा उपक्रम नियमित आरोग्य विभागीय कार्याचा भाग म्हणून राबविण्यात
येणार आहे.
सर्वेक्षण
पूर्ण झाल्यानंतर तपासलेल्या घरांची व व्यक्तींची संख्या संशयित व निदान झालेले नवीन
रुग्ण, बाल कुष्ठरुग्ण, सांसर्गिक कुष्ठरुग्ण, विकृती असलेले रुग्ण तसेच PEP प्रतिबंधक
औषधोपचार देण्यात आलेल्या सहवासितांची संख्या यांचा समावेश असलेला अहवाल तयार करण्यात
येणार आहे. कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास विलंब न करता जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी
संपर्क साधावा, लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यास तसेच
विकृती टाळण्यास मदत होते असे आरोग्य सेवा सहाय्य संचालक डॉ. सुधाकर शेळके यांनी
कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment