Thursday, 10 September 2026

*मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत*



जालना,दि.10(जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत सन 2026-27 साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदीसाठी कमाल 3 लाख 50 हजार रुपये किमतीपर्यंत 90 टक्के शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये कमाल 3 लाख 15 हजार रुपयांचे अनुदान अनुज्ञेय असून, उर्वरित 10 टक्के रक्कम म्हणजेच 35 हजार रुपये लाभार्थी बचत गटाचा स्वहिस्सा राहणार आहे.

पात्र बचत गटांनी https://samajkalyanjalna.com या संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करावी. नोंदणीनंतर प्राप्त लॉगिनद्वारे ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करावीत.

ऑनलाइन अर्ज पूर्णपणे भरून अंतिमरित्या सादर केल्यानंतर अर्जाची प्रिंट अथवा मूळ प्रत तसेच ऑनलाइन अर्जासोबत अपलोड केलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रती 30 सप्टेंबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करून त्याची प्रत व कागदपत्रे कार्यालयात जमा न करणाऱ्या अर्जांचा छाननीच्या वेळी विचार केला जाणार नाही, असे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.

योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज भरण्याची सविस्तर प्रक्रिया संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून त्याची प्रत कार्यालयात जमा करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अनिता राठोड, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी केले आहे.


****


No comments:

Post a Comment