जालना,दि.10(जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तसेच शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत शासनाच्या योजनांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने काही विद्यार्थी खोटी, बनावट अथवा फेरफार केलेली कागदपत्रे सादर करीत असल्याच्या बाबी निदर्शनास येत आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित अर्जांची आणि प्रकरणांची सखोल तपासणी करण्यात येणार असून, कागदपत्रे बनावट अथवा खोटी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
स्वाधार योजना किंवा शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी बनावट भाडेकरारनामा, खोटे बोनाफाईड प्रमाणपत्र, बनावट वसतिगृह प्रमाणपत्र, खोटी उपस्थिती, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा अर्ज अथवा प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित विद्यार्थ्याने यापूर्वी स्वाधार योजनेचा किंवा शासकीय वसतिगृहाचा लाभ घेतला असल्यास तो लाभ नियमानुसार रद्द करून शासनाकडून अदा करण्यात आलेली रक्कम वसूल केली जाणार आहे. प्रकरणाच्या स्वरूपानुसार संबंधितांविरुद्ध लागू कायद्यानुसार फौजदारी कारवाईही करण्यात येईल.
स्वाधार योजना किंवा शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरताना इंटरनेट कॅफे अथवा ऑनलाइन सेवा केंद्र चालकांनी बनावट कागदपत्रे तयार करणे, कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, खोटी माहिती अपलोड करणे, बनावट प्रमाणपत्रे तयार करून देणे किंवा विद्यार्थ्यांना शासनाची फसवणूक करण्यास जाणीवपूर्वक मदत करणे आढळल्यास संबंधित कॅफे चालक, मालक किंवा व्यक्तीविरुद्धही नियमानुसार कठोर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
याशिवाय अशा गैरप्रकारात कोणतीही व्यक्ती, संस्था, महाविद्यालयीन अधिकारी किंवा कर्मचारी अथवा इतर संबंधित व्यक्ती सहभागी असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यास, त्यांच्या भूमिकेनुसार संबंधित सक्षम प्राधिकरणामार्फत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृहाच्या योजनांचा लाभ केवळ पात्र विद्यार्थ्यांनाच शासनाच्या नियमानुसार मिळावा, यासाठी प्राप्त अर्ज आणि कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज करताना केवळ खरी, वैध आणि अधिकृत कागदपत्रेच सादर करावीत. बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये आणि शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बनावट कागदपत्रे सादर करणारे विद्यार्थी तसेच अशा गैरप्रकारास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहाय्य करणाऱ्या व्यक्तींवर कोणतीही दयामाया न दाखविता नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment