Friday, 11 September 2026

जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रशासनाची कारवाई

 गौण खनिज, दारू विक्री, वाहतूक नियमभंगाविरोधात कारवाई; वाळूसाठा अवैध दारु व मुद्देमाल जप्त

 

जालना,दि.11(जिमाका): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह अवैध वाळू उत्खनन व वाहतूक, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने संयुक्तपणे धडक मोहीम राबविली. या मोहिमेत गौण खनिज विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई केली.

जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यात आली. परतूर तालुक्यातील रोहिणा बु. येथे कारवाई करून अवैध 12 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मंठा तालुक्यातील इंचा परिसरात कारवाई करून सुमारे 40 ते 50 ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला.

अवैध दारू विक्री व साठवणुकीविरोधात जिल्ह्यात एकूण 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले. अंबड-शहागड रोड, जालना शहरातील विविध परिसर, खरपुडी तसेच भोकरदन परिसरातील हॉटेल्स, पत्री शेड व घरांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत अवैध देशी दारू, 15 लिटर हातभट्टी दारू आणि 200 लिटर रसायन जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत 41 हजार 880 रुपये आहे. या प्रकरणांत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 128 वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 32 वाहनांवर कारवाई करण्यात आली. ओव्हरलोड वाहतूक, विनापरवाना वाहन चालविणे, पीयुसी नसणे, रिफ्लेक्टर, सीटबेल्ट तसेच एचएसआरपी नंबर प्लेट नसणे आदी नियमभंग आढळून आले. या कारवाईत जागेवर वसूल केलेला दंड रु. 1, 78, 000 तर बजावलेले ई-चलान (प्रलंबित दंड) रु. 48, 000 असून, एकूण दंडाची रक्कम रु. 2, 26, 000इतकी आहे.

तसेच जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागामार्फत प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असुन, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. कलम 126 अंतर्गत 1 कारवाई तर  कलम 129 अंतर्गत 1 कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 

****

No comments:

Post a Comment