Thursday, 30 April 2026

विकासाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर - पालकमंत्री पंकजा मुंडे · महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात संपन्न

 










जालना दि.1 (जिमाका): महाराष्ट्राने स्थापने पासूनच सर्वच क्षेत्रामध्ये विकासाच्या प्रक्रियेत मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळेच आपले महाराष्ट्र राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र दिनाच्या 67 वा स्थापना दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्रीमती मुंडे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार डॉ. कल्याण काळे,  आमदार अर्जुन खोतकर, उपमहापौर राजेश राऊत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्य शासन विविध कल्‍याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असून, विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी सदैव उभे आहे. तसेच सर्वच क्षेत्रात विकासाचा दृष्टीकोन ठेवत, राज्य शासनाची वाटचाल सुरु आहे.

जगातील सर्वात मोठी भारताची 2027 ची जनगणना ही देशाची 16 वी जनगणना पहिल्यांदाच 'डिजिटल’ पध्दतीने राबविण्यात येत आहे. ही जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. ही जनगणना अधिक सुलभ, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने नागरिकांना स्वगणना (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या प्रक्रियेमुळे नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली सर्व नागरिकांनी आपली स्वतःची अचूक माहिती स्वतः नोंदविण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.  

तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचा उल्लेख करत पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी नागरिकांना आपल्या मतदार यादीतील माहिती तपासून घेण्याचे आवाहन केले. तसेच ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘साधना सप्ताह 2026’मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवून नवा मानदंड आखल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा 6.0’ मोहिमेचा आढावा देत पालकमंत्री यांनी 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यातील 28 हजारांहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी झाल्याचे सांगितले. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’ अंतर्गत ग्रामीण नागरिकांना रोजगार बळकट करून महाराष्ट्राचा ‘आर्थिक कणा’ बनविण्याचा ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळी-मेंढी पालनासाठी तांत्रिक व आर्थिक मदत देऊन ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढवण्याचा हा उपक्रम असल्याचे पालकमंत्री यांनी नमूद केले.

विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जालना जिल्हा देखील अग्रेसर राहिला आहे. जालना जिल्ह्यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत प्राप्त निधी विविध विकास कामांसाठी शंभर टक्के खर्च झाल्याने पालकमंत्री यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. जालना ड्रायपोर्ट, जालना-नांदेड समृध्दी महामार्ग आणि जालना–जळगाव रेल्वे मार्ग यासारख्या पायाभूत प्रकल्पांचे काम चांगल्या गतीने सुरू असून, त्यामुळे जिल्हय़ातील उद्योग व अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत असुन, या अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात 47 शिबीरे आयोजन करुन, सुमारे 44 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले. तसेच जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल या कालावधीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026’ ही मोहिम जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडली. तसेच कृषी विभागामार्फत महा-डिबीट या पोर्टलद्वारे जिल्ह्यातील 18 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना  82 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत 153 लाभार्थ्यांना सुमारे 10 कोटी रुपयांचे कर्ज तसेच 4 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजने अंतर्गत 2025-26 मध्ये अपघातात मृत्यू झालेल्या, तसेच अपंगत्व आलेल्या एकुण 127 शेतकऱ्यांच्या वारसदारांना 2.53 कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. राज्याच्या उद्योग विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या महत्वकांक्षी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ योजने अंतर्गत जिल्ह्यात यावर्षी 243 नविन उद्योग उभे राहिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

जिल्ह्यात एलपीजी गॅस आणि पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पाणी टंचाईकरिता आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असुन, सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास होणार नाही, याबाबत प्रशासनास सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम अंतर्गत जालना जिल्हा प्रशासनाने ‘घरपोच शासकीय सेवा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयास राज्यस्तरीय कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘जालना मित्र’ या डिजिटल अ‍ॅपद्वारे नागरिकांना घरबसल्या योजनांची माहिती आणि विविध सेवांचा लाभ मिळत असल्याचे सांगितले.

तसेच सद्या राज्यभर तापमानात वाढ झाली असुन, उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे सांगितले. नागरिकांनी जास्त वेळ बाहेर राहणे, योग्यरीतीने पाणी आणि अन्न घेणे, थंड वस्त्रे वापरणे यासारख्या सावधानता बाळगण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केले. पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक नियंत्रण विभाग, गृह रक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशमन दल, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रूग्णवाहिका आदी वाहनांचा संचलनात उत्स्फूर्त सहभाग होता. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या स्फूर्तीदायक महाराष्ट्र गीताच्या वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच पोलीस विभागाला वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास यावेळी स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार व नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


जालना,दि.1(जिमाका): महाराष्ट्र दिनाच्या 67 वा स्थापना दिनानिमित्त जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, श्रीमती पगारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक; पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करावे-पालकमंत्री पंकजा मुंडे

 




        जालना,दि.30(जिमाका) : खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असुन, पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाचे वितरण करुन उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी दिले

जिल्हाधिकारी कार्यालीयातील नियोजन भवन येथे खरीप हंगाम पूर्व नियोजन 2026-27 बैठक पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांची उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, काही दिवसात मान्सून सक्रिय होणार असून खरीप हंगामाचे कामे सुरु होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खते, बियाणे यांची मुबलक उपलब्धता ठेवून शेतकऱ्यांसाठी अतिशय सूक्ष्म नियोजन करावे. तसेच बोगस बियाणे विक्री होणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे. खरीप हंगाम 2026-27 मध्ये जिल्ह्याला 1 लाख 6 हजार  शेतकऱ्यांना 1303 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र आजअखेर फक्त 49 कोटी रुपयांचेच पीक कर्ज वितरित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज केलेल्या कर्ज प्रकरणांना त्वरीत मंजुरी देऊन निधी वितरित करावा. कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व बँकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले.

शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकावर अवलंबून न राहता फळबाग लागवड, भाजीपाला,बिजउत्पादन अशा पिकांना प्राधान्य द्यावे. विशेषत: कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांना प्राधान्य शेतकऱ्यांनी द्यावे. यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्यामध्ये जनजागृती करावी. तसेच शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी व ॲग्रीस्टकची नोंदणी करणे बंधनकारक असून शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

जिल्ह्यात 6 लाख 47 हजार 307 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन असून त्यापैकी 33 टक्के क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाणार आहे. सोयाबीनसाठी 1 लाख 62 हजार 162 क्विंटल बियाण्याची आवश्यकता असुन खुल्या बाजारात जवळपास 60 हजार क्विंटल बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ व इतर खाजगी कंपन्या यांच्याकडून उपलब्ध होईल. तसेच उर्वरित 1 लाख क्विंटल बियाणे शेतकरी  घरचे बियाणे वापरत असल्याने बियाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. तसेच कापूस हे प्रथम क्रमांकाचे मुख्य पीक असून 45 टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होणार आहे. त्यासाठी 11 लाख 2 हजार बियाणे पाकिटांची आवश्यकता असून दरवर्षी प्रमाणे चालू हंगामासाठी 13 लाख पेक्षा जास्त कापूस बियाणे पाकिटे उपलब्ध होणार आहेत.  तूर, मुग, उडीद, मका, ज्वारी आदी पिकांची लागवड  1 लाख 43 हजार 231 हेक्टर क्षेत्रावर होणार असून त्यासाठीही बियाण्याचा पुरेसा साठा असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी दिली.

खरीप हंगामासाठी 2 लाख 2 हजार मेट्रिक टन खताचा वापर होतो. खरीप हंगामासाठी 2 लाख 43 हजार 500 मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. सध्या 1 लाख 24 हजार 932 मेट्रिक टन खत साठा जिल्ह्यात उपलब्ध असून, टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेचा वापर करून संतुलित खत मात्रा वापरावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

खरीप हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा भरारी पथक, जिल्हा तक्रार निवारण कक्ष तसेच तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात व पंचायत समिती स्तरावर प्रत्येकी एक तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. याशिवाय, अतिवृष्टी, गारपीट, वादळ यामुळे जिल्ह्यात 4 लाख 64 हजार 357 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, 6 लाख 26 हजार 926 शेतकऱ्यांना एकूण 437 कोटी 39 लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली

यावेळी बैठकीत पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते पिक स्पर्धा योजनामध्ये विविध पिकाच्या उत्पादनात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-*-

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षेत पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न

 

 

जालना,दि.30(जिमाका) : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, उपलब्ध साठे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालीयातील नियोजन भवन येथे बैठकीत यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांची उपस्थिती होती.

यावेळी बैठकीत जिल्ह्यातील विविध भागांतील पाणीपुरवठा योजनांची स्थितीचा आढावा घेण्यात आला. टंचाईग्रस्त गावांमध्ये तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांचे पुनर्भरण करण्यासाठी उपाययोजना राबवण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच प्रशासनाला नागरिकांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याचे सांगुन पाणी वापरात काटकसरी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. ज्या गावात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिल्या.यावेळी बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

नागरिकांना एकत्रित आयुष्यमान भारत, जनआरोग्य योजनेतून आरोग्य संरक्षण-पालकमंत्री पंकजा मुंडे

 

 

जालना,दि.30(जिमाका) : राज्यातील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून आरोग्य संरक्षण देण्यात येत आहे. या योजनेतून राज्यातील नागरिकांना उत्तम व मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होत असून, वैद्यकीय खर्च शून्यावर येण्यासाठी मदत झाली आहे. पात्र व गरजू रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी आज दिले.

जिल्हास्तरीय जनआरोग्य संरक्षण कार्यकारिणीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, संतोष दानवे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कंवरिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भुसारे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना संपूर्णपणे कागदविरहित आणि संगणक प्रणालीद्वारे राबवली जाते. ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना लागू आहे. आता सर्व ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे या योजनेंतर्गत समाविष्ट केली जात आहेत, ज्यामुळे गरीबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ होऊन, त्यांना आरोग्य संरक्षण मिळावे, यासाठी आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी निर्देश दिले.

पात्र व गरजू रूग्णांना उपचार मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने काम करणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती अधिक सक्रिय ठेवावी. रुग्णालयांनी लाभार्थ्यांशी संवेदनशीलतेने वागावे आणि उपचार प्रक्रियेत पारदर्शकता राखावी. योजनांचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी ग्रामस्तरापर्यंत जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश देताना, प्रत्येक पात्र नागरिकाला योजनेचा लाभ मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून यासाठी तालुका स्तरावर वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याबाबत तसेच आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी या एकत्रित योजनेची जिल्ह्यात केलेल्या अंमलबजावणीचा सादरीकरणाद्वारे आढावा सादर केला.

नागरिकांनी ग्रामपंचायत, रेशन दुकानदार, आशा सेविका, योजनेतील अंगीकृत रुग्णलयातील आरोग्य मित्र यांच्या संपर्क साधुन आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे असे आवाहन पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी या एकत्रित योजनेची जिल्ह्यात केलेल्या अंमलबजावणीचा सादरीकरणाद्वारे आढावा सादर केला.

-*-*-*-*-*-

जिल्हास्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026” चा समारोप

 




जालना,दि.30(जिमाका) : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा-2026 या उपक्रमाचा जिल्हास्तरीय समारोप सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमास खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खासदार डॉ. काळे यांनी, जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करत, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले. तसेच जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर देत, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. जलस्रोतांचे जतन, पाण्याचा योग्य वापर आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी पाणी संवर्धनाचे महत्त्व सांगुन, पाणीटंचाई टाळण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन आणि प्रभावी व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.

पंधरवड्याच्या कालावधीत जिल्हाभरात जलस्रोतांची स्वच्छता, गाळ काढणे, नाला खोलीकरण, बंधारे दुरुस्ती, वृक्षारोपण आणि पाणी अडवा–पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

या उपक्रमांमुळे जलसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली असून, पाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण झाली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला.

हा पंधरवडा जिल्ह्यात जलसाक्षरता वाढविण्यास आणि पाणी बचतीच्या चळवळीला बळ देण्यासाठी प्रभावी ठरल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी बांधव, जिल्ह्यातील जलदूत  व दोन्ही पाटबंधारे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यामध्ये पाटबंधारे विभागामार्फत पाणीबचत, जलसंवर्धन, शेतकरी/पाणी वापर संवाद, भूसंपादन व पुनर्वसन अडचणी निराकरण , जल लेखापरीक्षण इत्यादी विषयावर प्रबोधन करण्यात आले. यासोबतच ग्रामपंचायत चावडी, शाळा, बस स्थानके, इत्यादी ठिकाणी जल प्रतिज्ञा व पथनाट्याद्वारे जलजागृती करण्यात आली. जालना पाटबंधारे विभागामार्फत आयोजित सर्व कार्यक्रमास नागरिक , शेतकरी  यांचा सहभाग लाभला तसेच इतर विभागांचा सहकार्य लाभले. यावेळी कार्यक्रमास नागरिक, विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

 

जालना जिल्ह्याच्या प्रगतीचा गौरवशाली टप्पा : ‘रायझिंग जालना’ कार्यक्रमाचे आयोजन • जालना जिल्ह्याच्या 45 वर्षांच्या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी, विकास आगामी योजनांचे सादरीकरण • ‘गरजा महाराष्ट्र’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन • विविध विभागाचे 50 हून अधिक स्टॉल्स

 


जालना,दि.30(जिमाका) : जालना जिल्ह्याच्या स्थापनेला 45 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘रायझिंग जालना’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगती, नवोन्मेष, एकता आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल दर्शविणारा हा कार्यक्रम जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेणारा आणि भविष्यातील दिशा ठरविणारा ठरणार आहे. हा भव्य कार्यक्रम 1 मे 2026रोजी सकाळी 10 वाजल्यापासून महाराजा अग्रसेन फाउंडेशन, जालना येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून आमदार सर्वश्री विक्रम काळे, राजेश राठोड, महापौर श्रीमती वंदना मगरे, खासदार सर्वश्री कल्याण काळे, संजय जाधव, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, नारायण कुचे, संतोष दानवे, हिकमत उढाण, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

जालना जिल्ह्याच्या 45 वर्षांच्या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी, विविध विकास प्रकल्प, तसेच आगामी योजनांचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. तसेच जालन्याच्या विकासाचा आढावा घेत भविष्यातील दृष्टीकोन सादरीरकरण करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाला विशेष प्राधान्य देत या कार्यक्रमात विविध अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेण्यात येणार असून, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील प्रगती अधोरेखित केली जाणार आहे. तसेच, नागरिकांच्या सहभागातून विकासाला गती देण्यावर भर दिला जाणार आहे.

तसेच स्थानिक उद्योग, स्टार्टअप्स, कृषी उत्पादने, विविध शासकीय योजना, स्थानिक खाद्यपदार्थाचे 50 हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध गायक सरकाटे ग्रुपद्वारे सादर करण्यात येणाऱ्या ‘गरजा महाराष्ट्र’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमद्वारे जालनाकरांना एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, वैभवशाली संस्कृती, विविध लोककला आणि गौरवशाली इतिहास यांचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे.

हा सोहळा केवळ 45 वर्षांच्या वाटचालीचा उत्सव नसून, जालन्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचा आणि नवा संकल्प करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून जिल्ह्याच्या प्रगतीच्या प्रवासाचा भाग होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

-*-*-*-*-*-

 

 

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


मुंबई दि. 30 : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.

 

या संदर्भात 13 जुलै 2017 रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या 150 अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळांच्या उपक्रमाचे स्वागत करत महाराष्ट्राला योग्य वाटा देण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्रात देशाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर आणि राज्याची राजधानी मुंबई येथे राज्यस्तरीय प्रयोगशाळा तसेच राज्यातील विविध विभागांतील दहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.

 

केंद्र शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे राज्यस्तरीय विषाणू प्रयोगशाळा मंजूर केली. याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर तसेच अकोला, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धुळे आणि मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता देण्यात आली.

 

या योजनेसाठी केंद्र शासनाकडून एकूण 29 कोटी 21 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या. कोविड-19 महामारीच्या काळात या प्रयोगशाळांनी आरटी-पीसीआर चाचण्यांद्वारे मोठी भूमिका बजावली.

 

याशिवाय, या प्रयोगशाळांमुळे विविध विषाणूजन्य आजारांचे निदान करणे शक्य झाले आहे. आतापर्यंत कोविड-19 (37,21,154), डेंग्यू (88,327), चिकनगुनिया (39,817), झीका (3,923), स्क्रब टायफस (7,091), इन्फ्लुएंझा (27,536), एचबीव्ही (1,53,180), रोटाव्हायरस (651) अशा एकूण 40,41,689 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

 

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळाली असून भविष्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी राज्य अधिक सक्षम झाले आहे.

-*-*-*-*-

 

 

Wednesday, 29 April 2026

दिव्यांगांच्या हितासाठी प्रशासनाचे सकारात्मक पाऊल; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची दिव्यांग पुनर्वसन केंद्राला भेट

 




 

जालना,दि.29(जिमाका) : जालना शहरातील गांधी चमन परिसरात सुरू होत असलेल्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज भेट देवून केंद्राच्या पूर्वतयारीची पाहणी केली. दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांना सक्षम व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या या केंद्रामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केंद्रातील सुविधा, उपलब्ध होणाऱ्या सेवा तसेच सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. दिव्यांगांना दर्जेदार सेवा आणि आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गांधी चमन येथील मध्यवर्ती ठिकाणी सुरू होणाऱ्या या दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी समुपदेशन, प्रशिक्षण, पुनर्वसन आणि विविध मार्गदर्शन सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या केंद्रामुळे दिव्यांगांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

येणाऱ्या 1 मे रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला असून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या भेटीमुळे कामकाजाला अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाकडून उचलले जात असलेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, सामाजिक बांधिलकी जपणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून या केंद्राकडे पाहिले जात आहे.

 

-*-*-*-*-*-*-

4 मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 

जालना, दि.29  (जिमाका) :-   जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याचे पहिल्या सोमवारी करण्याबाबत निर्देश आहेत. तरी जालना जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 4 मे 2026  रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे. या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना त्यांनी संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व या तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यात दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा. ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही, अशा अर्जदाराचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे कार्यालयाकडुन सुचित करण्यात येत आहे. लोकशाही दिनात न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व,अपील, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाशी तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये. तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्याचा अर्ज  http://jalna.nic.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण


            जालना, दि.29 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा स्थापना  दिन समारंभानिमित्त गुरुवार दि.1 मे 2026  रोजी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 8.00 वाजता जालना येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. तरी नागरिकांनी तसेच सर्व शासकीय, निमशासकीय आणि सहकारी संस्थेच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात ध्वजारोहणास उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 

            जालना,दि.29 (जिमाका):  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे बुधवार, दि. 30 एप्रिल, 2026 रोजी दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण्. सायंकाळी 4.10  ते सायंकाळी 5.25 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित खरीप हंगाम 2026 पुर्व तयारी आढावा बैठक/ पाणी टंचाई आढावा बैठक/जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण कार्यकारीणी बैठकीस उपस्थिती, सायंकाळी 5.30 ते सायंकाळी 6.30 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात  जनता दरबार (अभ्यंगतांच्या भेटी व नागरिकांशी संवाद), सायंकाळी 6.35 वाजता विश्रामगृहाकडे प्रयाण करतील.

 तसेच शुक्रवार, दि. 1 मे, 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण व विविध कार्यक्रम तसेच जिल्हा पोलीस दलाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण  सोहळयास उपस्थिती. तसेच सकाळी 9.00 ते 10.45 वाजता मोतीबाग चौपाटी (बदनापूर रोड) कडे प्रयाण, दिव्यांग केंद्राचे लोकर्पण स्थळ – जिल्हा रुग्णालय शेजारी. सकाळी 11.00 वाजता अग्रेसन भवन येथे आयोजित रायझिंग जालनाया कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळयास उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता दैनिक दिव्य मराठी ग्रुपच्या वतीने आयोजित जालना पोलीस सन्मान सोहळयास उपस्थिती स्थळ हॉटेल अतिथी, मंठा रोड दुपारी 2.15 वाजता शासकीय वाहनाने परळी वैजनाथ जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-*-

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क ; जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे निर्देश

  जालना,दि.29(जिमाका): भारतीय हवामान विभागाने 2026 वर्षासाठी ‘एल-निनो’ परिस्थितीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुसंवर्धन विभागाने सज्जता वाढवली असून, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई टाळण्यासाठी सर्व जिल्ह्यांना जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा आराखडा तातडीने तयार करून अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यातील एकूण पशुधनापैकी सुमारे 43.5 टक्के जनावरे सुका चारा आणि 25.92 टक्के हिरव्या चाऱ्यावर अवलंबून आहेत. ‘एल-निनो’ मुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून जिल्हा प्रशासनांना चारा उपलब्धतेचा आढावा घेऊन नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात गावपातळीवर चारा बँक उभारणी, शेतकऱ्यांना कमी पाण्यात होणाऱ्या चारा पिकांकडे वळवणे, तसेच चारा साठवणूक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. टंचाई भासल्यास तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची तयारी ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

यासोबतच जनावरांच्या आरोग्य व पोषणासाठी पूरक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पशुवैद्यकीय सेवा बळकट करणे, रोगनियंत्रण मोहिमा, तसेच पशुखाद्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. चारा उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हरित चारा लागवड आणि टोटल मिक्स्ड रेशन (TMR) सारख्या पद्धतींचा प्रसार करण्यावर भर देण्यात येणार आहे.

 

विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखड्याचे मुद्दे :

·         पडणाऱ्या पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून पर्यायी चारा पिकांचे नियोजन.

·         टंचाई भासल्यास त्वरित चारा छावण्या सुरू करण्यासाठी पूर्वतयारी.

·         जनावरांसाठी आवश्यक पोषणमूल्यांचा साठा सुनिश्चित करणे.

·         स्थानिक पातळीवर चारा साठवणूक व वितरण यंत्रणा सक्षम करणे.

 

पशुसंवर्धन विभागाने जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यात ‘एल-निनो’चा संभाव्य परिणाम लक्षात घेता, चारा टंचाई टाळण्यासाठी विभागाने सर्वंकष नियोजन सुरू केले असून, पशुधन संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत आहेत.

 

****

 

जालना जिल्ह्याच्या 45 वर्षपूर्तीनिमित्त ‘रायझिंग जालना’ सोहळ्याचे आयोजन

 


 

जालना,दि.29(जिमाका) : जालना जिल्ह्याच्या स्थापनेला 1 मे रोजी 45 वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक टप्प्याच्या निमित्ताने ‘रायझिंग जालना’ या नावाने 1 मे रोजी महाराजा अग्रसेन फाउंडेशन येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत सकाळी 10 ते 1 या वेळेत सांस्कृतिक व औपचारिक कार्यक्रम पार पडणार असून, त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून आयोजित केला जात असून, जालन्याच्या समृद्ध इतिहासाचा गौरव करताना उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचा व संकल्प करण्याचा उद्देश आहे. जालन्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या उपक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी 50 हून अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार असून, त्यामध्ये स्थानिक उत्पादने, स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्र, विविध शासकीय योजना, स्थानिक खाद्यपदार्थ व मनोरंजनात्मक उपक्रम यांचा समावेश असणार आहे. तसेच नागरिकांसाठी एक उत्साही व कुटुंबासह अनुभव घेण्यासाठी विविध मनोरंजनात्मक सदृश वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

****

 

Tuesday, 28 April 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा · जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांचा राज्यस्तरीय सन्मान

 






जालना,दि.28(जिमाका) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि पारदर्शकपणे मिळाव्यात यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित ‘सेवा हक्क दिन’ कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी श्रीमती देशपांडे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसिलदार श्रीमती तायडे, तहसिदार श्री. अनिल नव्हाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ म्हणाले की, "सेवा हक्क कायद्याचा मुख्य उद्देश प्रशासनाला लोकाभिमुख करणे आहे. नागरिकांनी जागरूक होऊन आपला हक्क मागावा. सेवा मिळण्यास विलंब झाल्यास अपील करण्याची तरतूद देखील कायद्यात आहे."

प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे म्हणाल्या की, सेवा हक्क दिनानिमित्त, प्रशासनाने नागरिकांना अर्ज करण्यासाठी आणि सेवा ट्रॅक करण्यासाठी 'आपले सरकार' पोर्टल व मोबाईल ॲप वापरण्याचे आवाहन केले. या डिजिटल माध्यमामुळे पारदर्शकता वाढली असून, प्रशासकीय कामे अधिक गतिमान झाली आहेत. 'आपले सरकार पोर्टल' वर 500 हून अधिक सेवाद्वारे ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचत असून शासकीय कामकाजातील कार्यक्षमता वाढली आहे.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अधिनियमाचे उद्दिष्ट्ये, डिजिटल सेवा आणि ऑनलाइन प्रक्रियेविषयी प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना सुलभ सेवा कशा मिळू शकतात याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व उपस्थित विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'सेवा हक्क दिना'निमित्त शपथ घेतली. यावेळी वेळेत सेवा देणाबाबत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱी आणि निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कारही करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 

जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांचा राज्यस्तरीय सन्मान

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या सोहळ्यात राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात आला आहे.

जालना जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल यांनी ‘घरपोच शासकीय सेवा’ हा उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि परिणामकारक सेवा मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी झाली असून, सेवा वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली आहे. राज्यभरातील इतर जिल्ह्यांसाठी हा उपक्रम आदर्श ठरणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

****

कामगारांची उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

 


जालना,दि.28(जिमाका) : राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने सर्व आस्थापना मालकांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे आवाहन केले आहे. कामगार व मजूर विविध क्षेत्रांत काम करत असताना उष्णतेच्या लाटेचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

श्रम व रोजगार मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत, राज्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व उद्योग, कारखाने, दुकाने, बांधकाम स्थळे, हॉटेल, व्यापारी आस्थापना, मॉल, शॉपिंग सेंटर्स आणि इतर संस्थांनी विशेष दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी खालील उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत :

·  कामगारांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी.

·  कामाच्या ठिकाणी सावलीची किंवा विश्रांतीची जागा उपलब्ध करून द्यावी.

·  दुपारी 12 ते 4 या वेळेत उघड्यावर काम टाळावे; आवश्यक असल्यास कामाच्या वेळांत बदल करावा.

·  उष्माघात व उष्णतेच्या परिणामांविषयी जनजागृती करावी.

·  प्राथमिक उपचार व आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवाव्यात.

·  या कालावधीत जड शारीरिक श्रम टाळण्याचे निर्देश द्यावेत.

·  बांधकाम व इतर श्रमिक कामांमध्ये आवश्यक त्या सुविधा, जसे की आईस पॅक व थंडावा देणारी साधने उपलब्ध करावीत.

·  कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्य विभागाशी समन्वय साधावा.

·  उष्णतेच्या लाटेचे धोके व प्रतिबंधात्मक उपायांविषयी मार्गदर्शन करावे.

·  कामाच्या ठिकाणी सूचना फलक, पोस्टर्स व आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रदर्शित करावेत.

या उपाययोजनांची अंमलबजावणी करून कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सर्व आस्थापनांची जबाबदारी आहे. सर्व संबंधितांनी या सूचनांचे काटेकोर पालन करून कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ. मा. जाधव यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-