Thursday, 9 April 2026

मार्च अखेरचे 'ई-आर 1' विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 9 (जिमाका) :- सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना मार्च 2026 या तिमाहीचे मनुष्यबळ विवरणपत्र (ई-आर 1) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदांची सूचना देणे सक्तीचे) कायदा 1959 नुसार, हे विवरणपत्र दि.30 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन भरणे बंधनकारक असून यात कसूर करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.  नियोक्त्यांनी आपली माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सादर करावी. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी दिली आहे.

केंद्र व राज्य शासनाची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती) तसेच खासगी क्षेत्रातील ज्या आस्थापनांमध्ये 25 किंवा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा सर्व कारखाने आणि उद्योगांना हे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विवरणपत्र भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास नियोक्त्यांनी कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते संध्याकाळी 6 सुटीचे दिवस वगळून) ०२४८२-२९९०३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 162                                                                दि.9 एप्रिल, 2026

नवउद्योजकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

जालना, दि. 9 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून राज्यभरात सामाजिक समता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत शुक्रवार दि. 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी कार्यशाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण मार्गदर्शनासह विविध योजनांच्या लाभांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 30 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार, दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत संपूर्ण राज्यात सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये जनमानसात रुजवण्यासाठी आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी वित्तीय सहाय्य आणि मार्जिन मनी योजनेची सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले जाईल. असेही कळविले आहे.

 

-*-*-*-*-

वृत्त क्र. 163                                                              दि.9 एप्रिल, 2026

 

सामाजिक समता सप्ताह उत्साहात;

स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप

जालना, दि. 9 (जिमाका) :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आला. यावेळी विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मिनी ट्रॅक्टर योजना या योजनांमधील निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. श्रीमती मोदाळे यांनी प्रास्ताविकात शासनाच्या या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री महोदयांनी सन 2026-27 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे 150 वे वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष साजरे करण्याचा संकल्प सोडला आहे. महाडचा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी होता, हा डॉ. बाबासाहेबांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. शासन निर्णयानुसार,दि.8 ते 14 एप्रिल या काळात जिल्हाभरात व्याख्याने, निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिरे आणि शासकीय योजनांच्या जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात निवडपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बदनापूर येथील शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. दिलीप गिरी यांनी केले. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमधील कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. अंबोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 164                                                               दि.9 एप्रिल, 2026

 

जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रस्तरावर दि. 9 एप्रिलपासून 8 वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बालकाचा शारीरिक विकासासोबतच मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा, यासाठी कुटुंब आणि समुदायामध्ये योग्य पद्धतींचा सराव व्हावा, हा या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे. दि. 23 एप्रिल 2026 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आणि लाभार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यंदाचा पोषण पंधरवडा १). माता व बालकाचे पोषण: गरोदर माता आणि बालकांच्या आहाराबाबत मार्गदर्शन. २). मेंदू विकास (० ते ३ वर्षे): लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी पूर्व उद्दीपन. ३). खेळातून शिक्षण (३ ते ६ वर्षे): मुलांसाठी खेळ आधारित पूर्व शालेय शिक्षण. ४). स्क्रीन टाइमवर नियंत्रण: मुलांचे मोबाईल व टीव्हीचे व्यसन कमी करण्यासाठी पालकांची भूमिका. ५). सक्षम अंगणवाडी: अंगणवाडी केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभाग वाढवणे. या विषयावर प्रामुख्याने आधारित असेल. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 165                                                              दि.9 एप्रिल, 2026

 

अमृततर्फे व्यापक कौटुंबिक सर्वेक्षणाचे आयोजन

 

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेने आता पुढाकार घेतला आहे. ज्या जातींना अद्याप कोणत्याही स्वतंत्र शासकीय विभाग किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा 25 जातींच्या प्रगतीसाठी अमृततर्फे आता व्यापक कौटुंबिक सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून समाज घटकांच्या अपेक्षा आणि उपलब्ध स्थानिक संसाधने यांचा मेळ घालून नवनवीन योजनांची आखणी केली जाणार आहे.

सध्या अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा 25 जातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात होणाऱ्या सर्वेक्षणाअंती या यादीत आणखी काही जातींची भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केवळ सरकारी योजना लादण्यापेक्षा, संबंधित समाजातील कुटुंबांची नेमकी संख्या किती? त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? आणि स्थानिक पातळीवर कोणती कौशल्ये उपलब्ध आहेत? याचा सखोल अभ्यास या सर्वेक्षणातून केला जाणार आहे. असे व्यवस्थापक, अमृत कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 166                                                              दि.9 एप्रिल, 2026

 

क्रांतीचा साक्षीदार एकपात्री प्रयोगातून

उलगडणार महात्मा फुलेंचा जीवनप्रवास

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने जालना शहरात एका विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे क्रांतीचा साक्षीदार या एकपात्री नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने दि. 8 ते 14  एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. महात्मा फुले यांचे हे 150 वे जयंती वर्ष (द्विशताब्दी वर्षाकडे वाटचाल) असून, त्यांच्या गौरवशाली जीवनप्रवासावर आधारित हे नाटक सादर केले जाणार आहे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल हा क्रांतीचा विचार या प्रयोगातून मांडला जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी (सामान्य) नम्रता चाटे आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जालना यांनी या ऐतिहासिक आणि वैचारिक कार्यक्रमासाठी जालना शहरातील नागरिक, विचारवंत आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment