जालना, दि. 21 (जिमाका) :- राज्यातील
पशुपालक, शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक बळ
देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डयोजना प्रभावीपणे
राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या
संगोपनासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल आकर्षक
व्याज सवलतीसह उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ज्या
शेतकऱ्यांकडे अद्याप क्रेडिट कार्ड नाही, त्यांना 1.60 लाखांपर्यंतचे कर्ज
कोणत्याही तारणाशिवाय मिळेल. दूध संघाने हमी दिल्यास ही मर्यादा 3 लाखांपर्यंत
वाढवता येईल. कर्जाचा मूळ व्याजदर 9 टक्के असला तरी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना
केंद्र व राज्य सरकारकडून एकूण 7 टक्के व्याज सवलत मिळणार आहे. त्यामुळे जागरूक
पशुपालकांसाठी हे कर्ज प्रत्यक्ष शुन्य
टक्के व्याजदराने उपलब्ध होऊ शकते.
या योजनेचा
लाभ घेण्यासाठी पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी असणे अनिवार्य आहे. तसेच
लाभार्थ्याने यापूर्वी कोणत्याही सरकारी अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
राज्यातील 10 लाख पशुपालकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. अधिक
माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा 1962 या हेल्पलाइनवर संपर्क
साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले
आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 183
दि.21 एप्रिल, 2026
प्रधानमंत्री
इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जालना, दि. 21 (जिमाका) :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार
तरुण-तरुणींना उद्योगांमधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता यावा आणि त्यांच्या रोजगाराच्या
संधी वाढाव्यात, यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबविण्यात येत
आहे. या योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
शिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योग जगतातील कौशल्यांमधील दरी
कमी करणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. युवकांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊन देशासाठी
कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वय 18 ते 25 वर्षे,
6 ते 9 महिने नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9 हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळेल तसेच यशस्वी
पूर्णतेनंतर अधिकृत अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी
जालना येथील मॉडेल करिअर सेंटर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 184
दि.21 एप्रिल, 2026
मधुमित्र
आणि मधुसखी पुरस्कारांसाठी अर्ज करावेत
जालना, दि. 21 (जिमाका) :- राज्यातील
मधमाशीपालन व्यवसायाला आधुनिक गती देण्यासाठी आणि या क्षेत्रात अहोरात्र कष्ट
करणाऱ्या मधपाळांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग
मंडळाच्या वतीने वर्ष 2026 चे मधुमित्र
व मधुसखी पुरस्कार जाहीर करण्यात
आले आहेत. या मानाच्या पुरस्कारांसाठी मंडळाने पात्र उमेदवारांकडून नामांकने
मागविली असून दि.4 मे 2026 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
गेल्या तीन
वर्षांपासून मंडळाने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. मधमाशीपालनात अनेक
वर्षांपासून सातत्यपूर्ण आणि यशस्वी कार्य करणाऱ्या मधपाळांना या पुरस्काराद्वारे
प्रोत्साहन दिले जाते. विशेष म्हणजे, महिला मधपाळांच्या कर्तृत्वाला दाद
देण्यासाठी एक पुरस्कार मधुसखी या
नावाने राखीव ठेवण्यात आला आहे.
इच्छुक
उमेदवारांना या पुरस्कारासाठीचे नामांकन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mskvib.org उपलब्ध करून देण्यात आले
आहेत. तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही, त्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या खादी
ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज मिळू शकतील. पूर्ण भरलेले अर्ज मुदतीत संबंधित जिल्हा कार्यालयात जमा करणे
आवश्यक आहे. असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले
आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. 185
दि.21 एप्रिल, 2026
विशेष वृत्त
महिलांच्या
जीवनात सकारात्मक क्रांती घडविणारी प्रेरणादूत
जालना, दि. 21 (जिमाका) :- केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष
कृतीतून समाजपरिवर्तन कसे घडवता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जालना येथील सामाजिक
कार्यकर्त्या आणि बालकल्याण समितीच्या सदस्या सौ. विद्या लंके-कानडे. गेल्या दोन दशकांपासून ग्रामीण आणि शहरी भागातील
महिलांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे पेरण्याचे काम त्या सातत्याने करत आहेत. त्यांच्या
निष्ठेमुळे आज हजारो महिला उंबरठा ओलांडून आत्मनिर्भरतेच्या वाटेवर चालू लागल्या आहेत..
बचतगटांतून फुलाली आर्थिक क्रांती सौ. विद्या लंके-कानडे यांच्या
कार्याची पायाभरणी महिला बचतगटांच्या माध्यमातून झाली. केवळ पैसे साठवणे इथपर्यंत मर्यादित
न राहता, त्यांनी या गटांना आर्थिक शिस्त लावली. गृहउद्योगांच्या माध्यमातून त्यांनी
महिलांना पापड, मसाले, लोणची आणि सौंदर्यप्रसाधने
यांसारख्या उत्पादनांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले. केवळ उत्पादनच नव्हे, तर मार्केटिंग,
पॅकेजिंग आणि ब्रँडिंगचे धडे मिळाल्याने आज अनेक महिला यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपास
आल्या आहेत.
सामाजिक परिवर्तनासाठी एल्गार आर्थिक प्रगतीसोबतच त्यांनी सामाजिक
प्रश्नांनाही हात घातला. ग्रामीण भागातील महिलांना संघटित करून अनेक गावांत दारूबंदीचे ठराव मंजूर करून घेण्यात त्यांनी
यश मिळवले. हिंसाचाराविरोधात खंबीर आधार
गेल्या 10 वर्षांपासून समुपदेशक म्हणून काम करताना त्यांनी कौटुंबिक हिंसाचाराने खचलेल्या
महिलांना केवळ मानसिक आधारच दिला नाही, तर त्यांना कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठीही
लढा दिला. सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा विधी
सेवा प्राधिकरण आणि मनोधैर्य योजना यांसारख्या शासकीय योजनांची माहिती तळागाळातील
महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणले.
आरोग्य आणि शिक्षणावर भर मासिक पाळीसारख्या विषयावरील
सामाजिक गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी विशेष मोहिमा राबवल्या. मुलींच्या शिक्षणाला
प्रोत्साहन देत, त्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती
घेतले.
बचतगट, गृहउद्योग आणि कौशल्य विकास प्रशिक्षण, दारूबंदी,
बालविवाह प्रतिबंध, ग्रामसभा सहभाग, मासिक पाळी जनजागृती, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन,
कौटुंबिक हिंसाचार समुपदेशन, शासकीय योजनांची अंमलबजावणी आदि क्षेत्रात त्यांनी योगदान
दिले आहे.
महिला केवळ
घरापुरती मर्यादित न राहता तिने आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सक्षम व्हावे,
हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. भविष्यातही हा सक्षमीकरणाचा लढा अधिक व्यापक
स्तरावर नेण्याचा माझा निर्धार आहे.- सौ.
विद्या लंके-कानडे (सामाजिक कार्यकर्त्या व सदस्य, बालकल्याण समिती,
जालना)
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment