Wednesday, 15 April 2026

शासकीय शांतीकुंज महिला राज्यगृहाचा लाभ घेण्याचे आवाहन

 


 

जालना, दि. 15 (जिमाका) :-  कौटुंबिक समस्या, सामाजिक परिस्थिती किंवा अन्य कारणांमुळे निराधार, निराश्रित आणि नैतिकदृष्ट्या आपदग्रस्त ठरलेल्या महिलांसाठी जालन्यातील शासकीय शांतीकुंज महिला राज्यगृह आशेचा किरण ठरत आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत या राज्यगृहाचे कामकाज चालवले जात असून, गरजू महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

समाजातील अशा गरजू महिलांनी या शासकीय सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच, नागरिकांना आपल्या परिसरात अशा प्रकारच्या गरजू किंवा संकटग्रस्त महिला आढळून आल्यास, त्यांना या योजनेची माहिती देऊन केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी. अधिक माहितीसाठी शासकीय शांतीकुंज महिला राज्यगृह, जालना हॉस्पिटलच्या बाजूला, अंबड चौफुली, जालना येथे संपर्क साधावा. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 173                                                                   दि.15एप्रिल, 2026

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

 

जालना, दि. 15 (जिमाका) :-  भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके आणि सर्व सहभागींना प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. याच विचारांचा प्रसार करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य हा विषय या स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आला आहे. स्पर्धक https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8 या लिंकवर किंवा दिलेल्या क्यू आर कोडद्वारे नोंदणी करू शकतात.अधिक माहितीसाठी ९१५२२३०१९३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 174                                                                  दि.15एप्रिल, 2026

सामाजिक समता सप्ताहाचा समारोप

 

जालना, दि. 15 (जिमाका) :-  भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक समता कार्यक्रमाचा मंगळवार दि. 14 एप्रिल 2026 रोजी जालना येथे उत्साहात समारोप झाला. या निमित्ताने आयोजित भीमगीते आणि पोवाड्यांच्या कार्यक्रमाने उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले.

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित खास सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर आप्पासाहेब उगले आणि पार्टी यांनी आपल्या खड्या आवाजात भीमगीते आणि पोवाडे सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी केला होता, हा विचार शाहीरांनी आपल्या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडला. बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलू आणि त्यांनी आधुनिक भारताच्या विकासासाठी रचलेला पाया यांचा गौरव या गाण्यातून करण्यात आला.

या कार्यक्रमाला विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे, नगरसेविका सुलोचना गोरडे, प्रा. गोरडे, ज्येष्ठ नागरिक श्री. बुलबुले, श्री. वाघमारे  यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 175                                                                 दि.15एप्रिल, 2026

 

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

जालना, दि. 15 (जिमाका) :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार, जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, दि. 9 मे 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या प्रलंबित वादांत तडजोड करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा मोहिते यांनी केले आहे.

            दिवाणी व फौजदारी: सर्व दिवाणी आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे., कौटुंबिक वाद: कौटुंबिक न्यायालयातील वैवाहिक व इतर वाद,  अपघात व वीज देयके: मोटार अपघात नुकसान भरपाई आणि वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे,  बँक व थकीत देयके: बँकांची येणेबाकी आणि दाखलपूर्व  प्रकरणे.  इतर न्यायालये: औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणे आदि प्रकरणे लोकअदालतीत मिटवता येतील. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment