Friday, 29 May 2026

गतीमान प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा –अपर मुख्य सचिव विकास खारगे

 




 

जालना,दि.29(जिमाका): महसूल विभाग हा समाजासाठी काम करणारा महत्त्वाचा घटक असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखुन काम करत, गतिमान प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसुल विभागाच्या आढावा बैठकीत श्री. खारगे बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, सुकेशिनी पगारे, सह जिल्हा निबंधक रामेश्वर रोडगे, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख एम. पी. मगर, तहसिलदार छाया पवार  यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अपर मुख्य सचिव श्री. खारगे पुढे म्हणाले की, नागरीकांना पारदर्शकपणे सेवा देण्यासाठी तसेच शासकीय कामकाजात गती आणुन कामाकाजातील प्रलंबितता कमी करण्यासाठी सर्व महसुल यंत्रणांनी ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे. शासनने ईज ऑफ डुइंग बिझनेसचे धोरण स्विकारले आहे. तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस क्षेत्रीय दौरा करावा. यामुळे नागरिकांचे प्रश्न समजावून घेण्यास मदत होते. तसेच त्यांनी दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक कारवाई करावी. तसेच विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करुन, गुणवत्ता जाणून घेण्यास मदत होते. प्रशासनाने नागरिकामध्ये जावून काम करण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करुन त्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा घ्यावा. कोणताही पाणंद रस्ता घेण्यापूर्वी तो अतिक्रमणमुक्त असावा, तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडून त्याचे सीमांकन करुन घ्यावे. पाणंद रस्त्यांच्या दर्जेदार कामांवर लक्ष ठेवण्याचे आणि पावसाळ्यापूर्वी जास्तीत-जास्त रस्ते पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच शासकीय जमिनी अतिक्रमण विरहित कशा राहतील तसेच त्यांचे व्यवस्थापन कसे करता येईल याचे नियोजन करावे. शासकीय आणि खाजगी जागेची जबाबदारी महसुल विभागाकडे आहे. याकरीता सर्व सातबारा आणि मिळकत पत्रिका व्यवस्थित सुरक्षित ठेवाव्यात. तसेच नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, यासाठी सर्व अर्जांची वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्तता करण्याचे आवाहन केले.

यावेळी अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी त्यांनी जनगणना, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान, शासकीय जमिनी वाटप व शर्तभंग प्रकरणे,पर्यायी वनीकरण,वन जमिनीचे 7/12 अद्ययावत करणे, सिलिंग जमिन प्रकरणे, शेत व पाणंद रस्ते योजना, ई-पीक पाहणी, फेरफार नोंदी, वनहक्क दावे, अवैध गौण खनिज, घरकुलांना वाळू उपलब्ध करुन देणे आदी विषयांसह महसूल विषयक इतर कामांचाही आढावा घेतला. तसेच महसूल विभागातील प्रलंबित कामे, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम करण्याच्या सूचना दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सादरीकरणांद्वारे महसुल विभागातील विविध विषयांचा सविस्तर माहिती सादर केली. यावेळी बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपअधिक्षक भूमि अभिलेख, सह दूय्यम निबंधक यांची ऑनलाईन उपस्थिती होती.

 

****

महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे; विविध प्रकल्पास भेट व कार्यालयांची पाहणी


 




जालना,दि.29(जिमाका): ज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे हे आज (दि. 29 मे) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी आज विविध विकास प्रकल्प आणि शासकीय कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून कामांची पाहणी केली.

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या दौऱ्याची सुरुवात दरेगाव (ता. जालना) येथील ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या पाहणीने झाली. या प्रकल्पाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा तसेच भविष्यातील नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रकल्पाच्या कामांमध्ये गती आणण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

त्यानंतर त्यांनी जालना शहरातील मोतीबाग चौपाटी येथे सुरू असलेल्या सुशोभिकरण कामांची पाहणी केली. कामाची गुणवत्ता, प्रगती आणि नागरिकांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. शहर सौंदर्यीकरणाच्या कामांमध्ये दर्जा राखण्याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना केल्या.  यानंतर जालना येथील सिरसवाडी रोडवरील जिल्हा रेशीम कोष बाजारपेठेस भेट देऊन बाजारपेठेतील सुविधा आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली.

तसेच यावेळी त्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सह दुय्यम निबंधक कार्यालयास, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना तहसिल कार्यालय, जालना, आपले सरकार सेवा केंद्र तहसिल कार्यालय, जालना येथे भेट देऊन येथील उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी केली. तसेच संबंधीत कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची देखील माहिती घेतली. तसेच त्यांनी बदनापुर येथील कृषी विज्ञान/संशोधन केंद्रास भेट दिली. कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

-*-*-*-*-*-*-

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन • नामांकने पाठवण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026 • नामांकने, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर, ऑनलाईन सादर करता येणार

 

 

जालना,दि.29(जिमाका): राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीसी) 2026 साठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रात, अद्वितीय, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांचा, हे पुरस्कार देऊन, सन्मान केला जातो.

 पाच वर्षे वयाच्या पुढचे आणि 18 वर्षांपर्यंतचे (31 जुलै, 2026 रोजी) कोणतेही मुले/मुली या पुरस्कारासाठी पात्र आहेत. मात्र, ते भारतीय नागरिक आणि भारतात वास्तव्य करणारे असणे आवश्यक आहे.

नागरिकांनी मानांकने केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वरुनच भरावीत. स्वयं-नामांकन आणि कोणीही केलेल्या शिफारसी स्वीकारल्या जातीत. ऑनलाइन आवेदने पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै, 2026 आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी,  कृपया राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्या. (https://awards.gov.in).

 

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद येथे जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्ताने शपथ

 


 

जालना,दि.29(जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सहारा सामाजिक विकास संस्था, तेजस जनविकास संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्ताने जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकारी, कर्मचारी यांना तंबाखु मुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी- नशा मुक्त भारत अभियांनाची या कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या वतीने पोस्टर प्रदर्शने करण्यात आले. जिल्हा संघटक तथा सहारा संस्थेचे अध्यक्ष बिस्मिल्ला सय्यद यांनी तंबाखू विरोधी दिनाचे महत्त्व अधोरेखित करुन तंबाखूचे दुष्परिणाम व व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आजार विषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे संचलन तेजस जनविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे यांनी केले तर आभार समाजकल्याणचे राम मांटे यांनी व्यक्त केले. समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

 

जिल्हा प्रशासनाचे आवाहन नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने दक्षता घ्यावी

 


 

 जालना, दि.29 (जिमाका) :- प्रादेशिक हवामानशास्‍त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्‍ह्यात दि. 31 मे ते 2 जुन 2026 या कालावधीत  अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्‍या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी दि. 31  मे ते 2 जुन 2026 रोजी पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्‍या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्‍या ते मध्यम स्‍वरुपाच्‍या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. तसेच दि. 31 मे ते 2 जुन 2026 रोजी पर्यंत  यलो अलर्ट जारी केला असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्‍या ते मध्यम स्‍वरुपाच्‍या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती दक्षता बाळगावी,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 मेघगर्जनेच्‍या वेळी, विज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.  गडगडाटीच्या वादळादरम्यान व विज चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल,  सायकल यांच्यापासून दूर रहावे.  मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी किंवा झाकून ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्‍हाधिकारी कार्यालयातील जिल्‍हा नियंत्रण कक्ष तसेच नजीकच्या तहसील कार्यालयात, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

Wednesday, 27 May 2026

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांचा जालना जिल्हा दौरा

 


 

जालना, दि.26 (जिमाका):  राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे हे  दि. 29 मे 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे

             शुक्रवार दि. 29 मे,2026 रोजी सकाळी 8.00 वाजता ड्रायपोर्ट प्रकल्प दरेगाव, ता. जालना येथे भेट देवून पाहणी करणार आहेत. सकाळी 9.00 वाजता मोतीबाग चौपाटी येथे आगमन व सुशोभिकरण कामाला भेट व पाहणी करणार आहेत. सकाळी 9.15 वाजता जिल्हा रेशीम कोष बाजारपेठ, सिरसवाडी रोड, जालना येथे आगमन भेट व पाहणी करणार आहेत. सकाळी 10.00 ते 11.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जालना येथे राखीव.

सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आढावा बैठक व पाहणी.  दुपारी 12.30 वाजता उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय, प्रशासकीय इमारत दुसरा मजला, जालना येथे भेट व पाहणी. दुपारी 1.15 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना येथे भेट व पाहणी. दुपारी 2.00 वाजता कृषी पर्यटन केंद्र लालवाडी, ता. अंबड येथे आगमन व भोजन.

दुपारी 3.00 वाजता तहसिल कार्यालय, अंबड व आधार केंद्र, तहसिल कार्यालय परिसर तसेच महा -ई -सेवा केंद्र अंबड येथे भेट व पाहणी.  दुपारी 3.45 वाजता सह दुय्यम निबंधक कार्यालय, अंबड येथे भेट व पाहणी. सायंकाळी 4.30 वाजता उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय, अंबड येथे भेट व पाहणी. सायंकाळी 5.30 वाजता सुपर फिफ्टी उपक्रमास भेट (स्थळ- प्रियीयम इन्स्टीट्युट ऑफ सायन्स, मंठा चौफुली, जालना) सोईनुसार छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

पद्म पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना दि.27 (जिमाका) : प्रजासत्ताक दिन दि. 26 जानेवारी, 2027 रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्काराकरिता (पद्मश्री, पद्म भूषण, पद्मविभूषण) शिफारशी केंद्र शासनामार्फत नामांकन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

पद्म पुरस्कार हे सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते अतिशय प्रतिष्ठेचे आहेत. याबाबतचे अधिनियम आणि नियम केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या  www.padmaawards.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यानुसार जालना जिल्ह्यातील पद्म पुरस्कारासाठी पात्र व इच्छुक मान्यवरांची वैयक्तीकरीत्या ऑनलाईन नामांकन पोर्टलवर दि. 31 जुलै 2026 पर्यंत सादर करण्यासाठी  जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, यांनी आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-*-

शासकीय मुलींचे वसतिगृह येथे विनामुल्य प्रवेश अर्ज वाटप सुरु

 

 

 

जालना दि.27 (जिमाका) :  सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात मुलींचे शासकीय वसतिगृह जालना/मंठा व संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतिगृह जालना/मंठा येथे विनामुल्य प्रवेश अर्ज  कार्यालयीन वेळेत वसितगृहात उपलब्ध आहेत.  इच्छुक विद्यार्थिनींनी प्रवेश स्वीकारण्याचे आवाहन मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह अधिक्षिका प्रियंका लोंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. संपर्क क्र. 9822649741

-*-*-*-*-*-*-

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

            जालना दि.27 (जिमाका) :  समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह जालना, भोकरदन, अंबड, बदनापुर, घनसावंगी, संत रामदास शासकीय वसतिगृह, जालना व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, जालना, अंबड, मंठा, भोकरदन या शासकीय वसतिगृहामध्ये सन  2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. याकरीता गरजु व पात्र विद्यार्थ्यांनी आजच https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच शालेय विद्यार्थ्यांना दि. 30 जुन 2026 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे. तर इयत्ता 11 वी आणि बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी दि. 15 जुलै 2027 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.

यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामुल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने गुणवत्तेनुसार देण्यात येणार आहे. जर गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तरच त्याला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज सादर करता येईल. जे विद्यार्थी वसतिगृह योजनेचा अर्ज भरणार नाहीत त्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व वसतिगृह दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृहे नाहीत अशा तालुक्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी सदर नियम शिथील केला आहे.

शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय इत्यादी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तरी गरजु विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज करण्यासाठी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज

-*-*-*-*-*-

मिशन लक्षवेध अंतर्गत ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

 


जालना दि.27 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत मिशन लक्षवेध योजना ही धोरणात्मक योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत ॲथलेटिक्स़ या क्रीडा प्रकाराकरिता जिल्हा प्रतिभा विकास केंद्र जालना येथे स्थापन करणे प्रस्तावित आहे.

           जिल्हा प्रतिभा विकास  निपुणता केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करणे प्रस्तावित असून तूर्तास ॲथलेटिक्स़ या क्रीडा प्रकाराची खेळाडू निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे.

तरी दि.15 जुन 2026 रोजी पर्यंत सर्व पात्र खेळाडुनी खाली नमुद केलेले आवश्यक कागदपत्रे व अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी , कार्यालय जालना येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे.

खेळाडू निवड चाचणी दि 17 जुन 2026 रोजी घेण्यात येणार आहे. याकरीता निकष खालील प्रमाणे आहेत

ॲथलेटिक्स़ :- जिल्हा प्रतिभाविकास केंद्र निपुणता केंद्रस्तरावरील खेळाडु निकष 

वयोमर्यादा 25 वर्षाआतील मुले /मुली (वर्षाच्या 31 डिसेंबर 2026 रोजी ).

आवश्यक कागदपत्रे -जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ,अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड , मागील 02 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र , पासर्पार्ट साईज 03 फोटोग्राफ शाळा महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र पालकांचे संमती पत्र इ.

अधिवास- महाराष्ट्र राज्यातील खेळाडु असणे आवश्यक  (अधिवास प्रमाणपत्र).

क्रीडा कामगिरी-Top 3 Rank Players in AITA, National Ranking Player, राज्यस्तरावरील पदक प्राप्त खेळाडु किंवा राष्ट्रीय स्तरवरील सहभागी खेळाडु (SGFI,AFI,Khelo India National Only ) गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यामापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती (Fitness)चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक.

वैद्यकीय तपासणी- शासन मान्यता प्राप्त डॉक्टरांकडुन दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे.

जिल्ह्यातील खेळाडुने निवडचाचणीसाठी सहभागी होण्याचे अहवान जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नरेंद्र पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे क्रीडा मार्गदर्शक, श्री.अशिष जोगदंड 8888346828 यांच्याशी संपर्क साधावा.

-*-*-*-*-*-

 

 

Tuesday, 26 May 2026

जालना एमएमएलपीत पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे आगमन; मराठवाड्यात लॉजिस्टिक क्रांतीची नांदी

 






 

जालना, दि.26 (जिमाका):  जिल्ह्याच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा महत्त्वपूर्ण मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क (एमएमएलपी) अर्थात ड्राय पोर्ट प्रकल्पात 25 मे 2026 रोजी पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे यशस्वी आगमन झाले. या पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वागत केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जालना ड्रॉयपोर्टचे व्यवस्थापक विकास मलिक यांच्यासह अधिकारी आणि उद्योजकांची उपस्थिती होती.

            यामुळे जालना आणि संपूर्ण मराठवाडा विभागात रेल्वे-संलग्न मालवाहतूक सेवांची औपचारिक सुरुवात झाली आहे.पहिली इनबाउंड कंटेनर रेक ‘पोलाद स्टील’ कंपनीसाठी स्पंज आयर्न घेऊन एमएमएलपी जालना येथील रेल्वे सायडिंगवर दाखल झाली. या यशस्वी ट्रायलमुळे उद्योगांसाठी रेल्वे, रस्ता आणि बंदर यांचा समन्वय साधणाऱ्या एकात्मिक मल्टी मॉडेल मालवाहतुकीची नवी दारे खुली झाली आहेत.

विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स व्यवस्थापन लिमिटेड (NHLML) या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीमार्फत आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेला हा देशातील पहिलाच ड्राय पोर्ट/मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क प्रकल्प आहे. महाराष्ट्र एमएमएलपी प्रायव्हेट लिमिटेड (MMPL) या विशेष उद्देश वाहन (SPV) अंतर्गत हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या ‘पीएम गतिशक्ती’ आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणांतर्गत विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होणे, मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढणे, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होणे, कार्बन उत्सर्जनात घट आणि इंधन बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. पर्यावरणपूरक आणि शाश्वत मालवाहतूक व्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुमारे 64.51 एकर क्षेत्रात कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच, आयात-निर्यात (EXIM) व्यवहारांसाठी आवश्यक असलेली सीमाशुल्क विभागाची वैधानिक मान्यता देखील या प्रकल्पाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता जालन्यासह मराठवाड्यातील उद्योगांना थेट आयात-निर्यात माल हाताळणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

एमएमएलपी जालना प्रकल्पामुळे मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून, अंतर्गत महाराष्ट्रातील निर्यात-आयात व्यापाराला नवी गती मिळेल. जालना ते जेएनपीए बंदर तसेच राष्ट्रीय लॉजिस्टिक्स कॉरिडॉरशी थेट जोडणी झाल्याने उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

या प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी भारतीय रेल्वे, सीमाशुल्क विभाग, महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणा तसेच संबंधित सर्व भागधारकांनी केलेल्या समन्वित प्रयत्नांचे जालना जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे.

पहिल्या ट्रायल कंटेनर रेकच्या यशस्वी आगमनामुळे जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा विभागात लॉजिस्टिक-आधारित औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

-*-*-*-*-*-*-

जनगणना 2027 अंतर्गत दिल्ली येथील महारजिस्ट्रार कार्यालयाच्या पथकाची जालना जिल्ह्यास भेट दिल्ली येथील पथकाकडून जालना जिल्ह्यातील जनगणनेच्या कामकाजाचे कौतुक

 







 

जालना दि.26 (जिमाका) : जनगणना 2027 अंतर्गत दि. 16 मे ते 14 जून, 2026 या कालावधीत महाराष्ट्रात घरसूचीकरण व घरगणना यादी (House Listing Operation) कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथील केंद्र शासनाच्या जनगणना कार्यालयाचे अतिरिक्त महानिबंधक संजीव कुमार, आणि उपसंचालक (O.R.G.I) संदिप राय हे (दि. 26 मे) आजरोजी जालना जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी जालना तालुक्यातील मौजे धारकल्याण, बदनापूर नगर पंचायत, बदनापूर तालुक्यातील मौजे शेलगाव, तसेच जालना शहर महानगर पालिकेच्या ह‌द्दीतील जांगडानगर (ढवळेश्वर) येथे प्रत्यक्ष भेटी देऊन सुरु असलेल्या जनगणनेच्या कामकाजाचा आढावा घेतला.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे स्थापन करण्यात आलेल्या जनगणना कक्षास भेट देऊन सर्व अधिकारी /कर्मचारी यांची बैठक घेवून जनगणनेच्या कामाबाबत महत्वाच्या सूचना देत मार्गदर्शन केले. जिल्ह्याच्या प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुरु असलेल्या जनगणनेच्या कामकाजाबाबत दिल्ली येथील पथकाने कौतुक करून समाधान व्यक्त.

-*-*-*-*-*-*-

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही

 

 

जालना दि.26 (जिमाका) : भारत निवडणुक आयोग नवी दिल्ली यांचे दि. 18 मे,2026 रोजीच्या पत्रान्वये  महाराष्ट्र विधान परिषदेची व्दिवार्षिक निवडणुक ची आदर्श आचारसंहिता दि. 18 मे,2026 पासुन लागू केलेली असून ती विधान परिषदेची व्दिवार्षिक निवडणुक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत म्हणजे दि.25 जुन, 2026 पर्यंत लागू राहणार असल्याचे निर्देशित केलेले आहे.

आचारसंहिता कालावधीत निवडणुकीचे वेळापत्रक घोषीत केल्याच्या दिनांकापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत या कार्यालयास प्रत्येक महिन्याचा पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन शासन परिपत्रक दि. 26 सप्टेंबर 2012 मधील परिच्छेद क्र. 5.7 च्या तरतुदीनुसार आयोजित करण्यातयेणार नाही.

-*-*-*-*-*-*-

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


जालना दि.26 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 26 मे व 28 मे 2026 रोजी यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा  (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 27 मे 2026 रोजी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील नागरिकांना दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, विज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांच्यापासून दूर रहावे, मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफार्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्याच्यामध्ये झाकावेत, जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                                    -*-*-*-*-*-     

Monday, 25 May 2026

*दिव्यांग सक्षमीकरणासाठी जालना येथे विशेष शिबिर*

*जिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम*





जालना,दि.25(जिमाका): दिव्यांग व्यक्तींना सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय जालना, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा परिषद प्रशाला, स्टेशन रोड येथे जालना जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, कृत्रिम पाय तसेच पोलिओग्रस्त व्यक्तींना कॅलिपर्सचे वाटप विशेष सहाय्य वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, जवळपास 80 लाभार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत योग्य नियोजन व उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित दिव्यांग बांधवांनी प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच बुधवार, दि. 26 मे 2026 रोजी हे विशेष शिबिर सुरू राहणार असून अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी केले.

यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री. खरात यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.


****



बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

जालना,दि.25(जिमाका): राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023” लागू केला असून, या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी अधिनस्त अधिकारी वर्गाला दिले आहेत.

राज्यात या कायद्याची अंमलबजावणी दि. 5 डिसेंबर, 2024 पासून सुरू झाली आहे. कृत्रिम रेतन प्रक्रियेद्वारे उत्तम दर्जाच्या व उच्च वंशावळीच्या वळूंचा वापर करून दुधाळ जनावरांची पैदास वाढविणे तसेच प्रजनन प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.

या अधिनियमांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्रे, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था व सेवा पुरवठादारांना महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित संस्थांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रेत प्रजननासाठी वापरण्याची परवानगी राहणार आहे.

या सर्व प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले असून, प्राधिकरणाला संबंधित केंद्रांची तपासणी, झडती तसेच नियमबाह्य साहित्य जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. क्षेत्रीय स्तरावर अनेक खाजगी कृत्रिम रेतन सेवा पुरवठादार व संस्था यांनी अद्याप प्राधिकरणाकडे नोंदणी केलेली नसल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर अधिनियमांतर्गत नियमोचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर प्राधिकरणाकडे नोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन यांनी केले आहे.

*दंड व शिक्षेच्या तरतुदी :*

कलम 4 व 5 अन्वये नोंदणी प्रमाणपत्रधारक व्यक्तीने विहित मानकांचे पालन न केल्यास दोष सिद्ध झाल्यावर रु. 50 हजारांपर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्राविना गोजातीय प्रजनन क्रिया करणे अथवा प्रमाणित वळूव्यतिरिक्त इतर वळूंपासून गोठवलेले रेत उत्पादन करणे किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास दोष सिद्ध झाल्यावर रु. 1 लाखांपर्यंत दंड आकारण्यात येईल. नोंदणी प्रमाणपत्रानुसार मंजूर सेवांबाबत चुकीची किंवा दिशाभूल करणारी जाहिरात अथवा प्रसिद्धी केल्यास दोष सिद्ध झाल्यावर सहा महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा रु. 2 लाखांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

*शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :*

फक्त प्रमाणित व अधिकृत विर्यामात्रांचाच वापर करावा. सेवा घेण्यापूर्वी तंत्रज्ञाचा नोंदणी क्रमांक तपासून नोंदणीकृत तंत्रज्ञांकडूनच सेवा घ्यावी. कोणतीही अनियमितता आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवून पशुधनाचे संरक्षण करावे.

*शेतकऱ्यांना होणारे फायदे :*

सुधारित व उच्च उत्पादनक्षम वंशामुळे अधिक दूध उत्पादन मिळणार आहे. उत्तम प्रजनन कार्यक्षमतेमुळे जनावरांची संख्या व गुणवत्ता वाढणार आहे. वैज्ञानिक व नियंत्रित प्रजननामुळे दीर्घकालीन पशुधन विकास साध्य होणार आहे. दुग्ध व्यवसायात स्थैर्य निर्माण होऊन आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे.


****


“कुपोषणमुक्त जालना” साठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 


 

मिशन न्युट्रीशन जालना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

 


जालना,दि.25(जिमाका): मिशन न्युट्रीशन जालना अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय, जालना येथे दि. 25 मे ते 7 जून, 2026 या कालावधीत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 25 मे रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग तसेच सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करून बालकांचे आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांना पोषण आहार, संतुलित आहार, माता व बालकांच्या आरोग्याची काळजी तसेच कुपोषण प्रतिबंध याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी आयआयटी मुंबई यांच्या माध्यमातून पोषण आहारासंदर्भातील शैक्षणिक व्हिडिओचा उपयोग करण्यात येत असून व्हील ग्लोबल फाऊंडेशन यांच्या सहकार्याने प्रशिक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत सुमारे 250 प्रशिक्षणार्थींना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थीने 1:3 या प्रमाणात मातां व बालकांना दत्तक घेऊन त्यांचे समुपदेशन करायचे आहे. यामध्ये पोषण आहाराचे महत्त्व, संतुलित आहार, बालकांच्या वाढीचे निरीक्षण आणि कुपोषण टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 2 हजार 250 माता व बालकांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, डॉ. प्राची तापशेटीवार, डॉ. जी. डी. म्हस्के, महिला व बाल विकास विभागाच्या श्रीमती कोरे, जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप गुसाळे, साक्षी उगले तसेच आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

****

Friday, 22 May 2026

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुतळा समितीची’ आढावा बैठक संपन्न

 



जालना, दि.22 (जिमाका): जिल्ह्यातील पुतळे आणि स्मारकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘पुतळा समिती’ची  आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल तसेच विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत मुख्यत्वे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पुतळ्यांच्या परिसरातील कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संवेदनशील ठिकाणांवर विशेष पोलीस गस्त ठेवण्याबाबत तसेच सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित करण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली.

जिल्हाधिकारी यांनी महापुरुष आणि क्रांतीकारकांच्या पुतळ्यांच्या परिसराची नियमित स्वच्छता, रंगरंगोटी व योग्य देखभाल राखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने आवश्यक सूचना देण्याचे निर्देश दिले. याशिवाय, कोणत्याही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून किंवा विनापरवाना पुतळे उभारले जाणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

बैठकीत प्रशासनाने पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी देखील या नियमांचे पालन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

-*-*-*-*-*-

जालना जिल्हा घरगणना मोहिमेत राज्यात अव्वल हाऊस लिस्टिंग ऑपरेशनमध्ये 94.59 टक्के प्रगती

 


 

जालना, दि.22(जिमाका) : जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घरगणना (House Listing Operation) कार्यक्रमात जालना जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत जालना जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक प्रगती साधली आहे.

 

राज्यस्तरीय आढाव्यानुसार, जालना जिल्ह्यातील एकूण 2863 HLB पैकी 2708 HLB चे काम पूर्ण झाले असून, जिल्ह्याने तब्बल 94.59 टक्के प्रगती साधली आहे. ही प्रगती राज्यातील सर्वाधिक असून, जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीची आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयाची ही मोठी पावती मानली जात आहे.

 

जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा जनगणना कक्ष, पर्यवेक्षक, प्रगणक अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत ही कामगिरी साध्य केली आहे. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे घरगणना मोहिमेला वेग मिळाला असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

या यशाबद्दल जिल्हाधिकारी  आशिमा मित्तल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, उर्वरित कामही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जनगणना-2027 ही देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मोहीम असल्याने नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

-*-*-*-*-*-