Tuesday, 19 May 2026

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी अमृतद्वारे ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण

 

जालना,दि.19(जिमाका): खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांसाठी अमृत या संस्थेमार्फत मोफत ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत परवानाही दिला जाणार आहे.

या प्रशिक्षणामुळे शेती, एरियल फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, भू-सर्वेक्षण, पीक सर्वेक्षण, सरकारी प्रकल्प निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आदी क्षेत्रांमध्ये करिअर आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रशिक्षणासाठी मोठ्याप्रमाणत खर्च येतो; परंतू अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकांसाठी तो पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रशिक्षणादरम्यान राहण्याची व जेवणाची व्यवस्था देखील संस्थेकडून करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ड्रोन खरेदी करून व्यवसाय सुरू करण्यासाठी अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ खुल्या घटकातील ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार आदी 25 जातींना मिळणार आहे.

पात्र उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून वय 18 ते 55 वर्षांदरम्यान असावे. उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून वैद्यकीय अधिकाऱ्याकडून फिटनेस दाखला सादर करणे बंधनकारक आहे. योजनेविषयी अधिक माहिती अमृत जिल्हा कार्यालय, दूसरा, मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्याशी संपर्क साधवा. तसेच https://mahaamrut.org.in या लिंकचा वापर करावा असे अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment