Wednesday, 13 May 2026

एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

 


जालना,दि.13(जिमाका) : राज्यात संभाव्य एल निनो परिस्थितीचा परिणाम लक्षात घेता पाणीटंचाई, कृषी तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक पार पडली. याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधीत विभाग प्रमुखांची आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्‍णकांत कनवारिया, महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडगे यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग यांची उपस्थिती होती.

यावेळी बैठकीत भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता व्यक्त केली असून, राज्यातील काही भागांमध्ये पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव यांनी पूर्वतयारी अधिक प्रभावी करण्याचे निर्देश  जिल्हा प्रशासानाला दिले असल्याचे सांगुन  जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यावेळी म्हणाल्या की, जलसंपदा विभागाला सर्व प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियमित नियोजन करावे. ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकर नियोजन, विहिरींचे पुनर्भरण, जलसंधारणाची कामे आणि गावनिहाय कृती आराखडे तातडीने तयार करावेत. जिल्ह्यातील सर्व के.टी. वेअर, बंधारे आणि जलसाठा संरचनांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. तसेच संबंधित विभागांनी नाले, तलाव आणि बंधाऱ्यांमधील गाळ काढणे व खोलीकरणाची कामे त्वरित हाती घ्यावी. गाळ काढण्याच्या मोहिम तात्काळ सुरु करुन, याकरीता सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तींचा सहभाग वाढवून लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारण्याचे काम करावे. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नियोजन तातडीने करण्यावर भर द्यावा. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पर्यायी पाण्याचे स्रोत उपलब्ध ठेवण्यात यावे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी गावस्तरीय कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करावे. गावनिहाय आणि शेतकरीनिहाय सविस्तर सर्वेक्षण करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचविण्यात यावी. तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. कृषी कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर अधिक सक्रिय राहून, प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यवाही करावी. गावपातळीपर्यंत हवामान बदल, एल निनो परिस्थिती आणि अनियमित पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत, माहिती पोहोचवावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. तसेच शेतकऱ्यांना कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांबाबत मार्गदर्शन करावे. तसेच बियाणे, खत आणि सूक्ष्म सिंचन योजनांचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती तसेच पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करुन ठेवावी, असे निर्देशही  जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी यावेळी दिले.

बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांनी 100 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते, असे सांगितले. तसेच हवामान आधारित कृषी सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. फळबाग क्षेत्रात पाण्याची बचत आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे. तसेच संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने पूर्णतः सज्ज राहावे, असे निर्देश दिले.

यावेळी बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, आरोग्य विभाग आदींची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment