जालना,दि.14(जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, जालना यांच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड
निर्माण होऊन शारीरिक क्षमता व कौशल्य विकास व्हावा या उद्देशाने विविध खेळांच्या
मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये
जिम्नॅस्टिक, रायफल शूटिंग, तलवारबाजी, खो-खो, लॉन टेनिस, सॉफ्ट टेनिस, ज्युदो,
टेनिक्वाईट, नेटबॉल, सॉफ्ट टक्का, आर्चरी, सॉफ्टबॉल आणि बेसबॉल या खेळांचा समावेश
करण्यात आला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात खेळांचा प्रचार व प्रसार होऊन
अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विशेषतः 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक क्षमतेच्या
विकासासाठी प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर देण्यात येणार आहे.
ही प्रशिक्षण शिबिरे दि. 19
मे ते 30 मे, 2026 या कालावधीत सकाळी 6.30 ते 9.00 आणि सायंकाळी 5.00 ते 7.00 या
वेळेत आयोजित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या शिबिरांचा
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
शिबिरासाठी विविध खेळांचे
प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले असून विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार
आहे. जिम्नॅस्टिकसाठी सिद्धेश कदम, रायफल शूटिंगसाठी आशिष जांगडे, तलवारबाजीसाठी
विजय गाडेकर, खो-खोसाठी सचिन मोहिते, लॉन टेनिस आणि सॉफ्टटेनिस साठी विकास काळे,
ज्युदोसाठी अमोल मोहिते, टेनिक्वाईटसाठी शेख चाँद पी.जे., आर्चरीसाठी सचिन टेकुर
तसेच सॉफ्टबॉल आणि बेसबॉलसाठी एकनाथ सुरशे हे प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहणार
आहेत.
प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन
जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे करण्यात आले असून काही खेळांचे प्रशिक्षण शिशु
विहार इंग्लिश स्कूलजवळील मैदान, रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ, सी.पी. कॉलेज
परिसर तसेच ज्ञानसागर विद्यालय, सिपोरा अंबोरा (ता. जाफ्राबाद) येथे होणार आहे.
शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित क्रीडा मार्गदर्शकांशी
संपर्क साधून नाव नोंदणी करावी व दि. 19 मे रोजी सकाळी 6.30 वाजता उपस्थित राहावे,
असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment