Wednesday, 30 September 2026

ऊसतोड कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल शेतकऱ्यांच्या बांधावर सेवा संकल्प अभियानांतर्गत अंबड येथे ऊसतोड कामगारांचे शिबिर; ऊसतोड कामगारांचा सहभाग

 






 

जालना,दि.30 (जिमाका): ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी अंबड महसूल उपविभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत ऊसतोड कामगार समस्या निराकरण व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शिबिराला भेट देऊन कामगार, विद्यार्थी व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शिबिराचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी केले. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, कुपोषण, महिलांचे आरोग्य, घरकुल तसेच विविध शासकीय कागदपत्रे व योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी त्यांनी मांडल्या. कामगारांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे पारधी यांनी यावेळी सांगितले. हे शिबिर केवळ एक दिवसापुरते मर्यादित न राहता कामगारांच्या प्रश्नांवर पुढील काळातही प्रशासनाकडून काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ऊसतोडीसाठी जिल्ह्याबाहेर किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यापूर्वी कामगारांनी जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या ‘ऊस मित्र’ ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच, कामावर जाण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये स्थलांतराची नोंद करावी, असेही सांगण्यात आले. कामगारांची नोंद प्रशासनाकडे उपलब्ध झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत शासकीय योजना, मदत आणि आवश्यक सेवा पोहोचविणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिबिरात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी ऊसतोड महिलांशी संवाद साधला. ऊसतोडीसाठी होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी महिलांनी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. अल्प कालावधीत मोठ्या संख्येने कामगारांना एकत्र करून शिबिराचे आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले.

शिबिरानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी अंबड शहरातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या शाळा व वसतिगृहाला भेट दिली. तेथील सुमारे १०० विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तसेच इतर सुविधांची त्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका डॉ. कविता गित्ते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण प्रभावित होऊ नये, यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.

शिबिरानंतर जिल्हाधिकारी मित्तल यांनी अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री शिवाराला भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पावसाअभावी तालुक्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, चारा टंचाई आणि पाणीटंचाईच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. आगामी काळातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबतही ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.

पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी केले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संकटाच्या काळात प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

अंबड येथील स्थानिक कार्यालयात झालेल्या या शिबिराला दीड ते दोन हजार ऊसतोड कामगार उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी अंबडचे तहसीलदार सोमेश मोहिते आणि घनसावंगीचे तहसीलदार रमेश पागोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. अखिल भारतीय शबरी माता संघटनेचे दीपक बर्डे, गजानन बर्डे, भाऊसाहेब बर्डे, हरीशभाऊ राठोड तसेच अंबड तालुक्यातील बाजिंदर मोरे यांनीही आयोजनात सहभाग घेतला.

शिबिराला विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ऊसतोड कामगारांच्या समस्या, त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत प्रशासनाने एकाच दिवशी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांशी संवाद साधला.

-*-*-*-*-

संकल्प अभियान’ अंतर्गत योग व ध्यान शिबिर उत्साहात

 





जालना,दि.30 (जिमाका) :   जिल्ह्यात सेवा, समर्पण आणि समाजकल्याणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन जालना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालाय येथे योग व ध्यान शिबिर आज (दि.30) रोजी उत्साहात पार पडले. या उपक्रमात निरोगी आरोग्यासाठी योग आणि ध्यान याचे दैनंदिन जीवनातील मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिक करण्यात आले.

या योग व ध्यान शिबिराचे अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुकेशिनी पगारे, पतंजली योग समितीचे योगसाधक प्रल्हाद हरबक यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, विविध कार्यालयांतील कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

योगसाधक प्रल्हाद हरबक यांनी योग व ध्यान ही केवळ व्यायामाची पद्धत नसून निरोगी, शिस्तबद्ध आणि सकारात्मक जीवन जगण्याची संस्कृती असल्याचे सांगत, दैनंदिन जीवनात योग व ध्यानाचा अंगीकार करून निरोगी समाजनिर्मितीस हातभार लावावा असे मार्गदर्शन केले.

शिबिराच्या प्रारंभी उपस्थितांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगण्यात आले. योग प्रशिक्षकांनी सहभागींकडून विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाच्या पद्धती करून घेतल्या. योग व ध्यानाच्या माध्यमातून निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश पोहोचविण्यात आला.

 

****

मंठा नगर पंचायत मध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 




 

जालना,दि.30(जिमाका): स्वच्छता ही सेवा २०२६ व सेवा संकल्प अभियानांतर्गत मंठा नगर पंचायत यांच्या वतीने शहरातील सफाई मित्रांच्या आरोग्याची काळजी घेत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई मित्रांच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात सफाई मित्रांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, वजन तसेच इतर आवश्यक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. आरोग्याशी संबंधित काही तक्रारी आढळून आल्यास संबंधितांना डॉक्टरांकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दैनंदिन कामकाजात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, स्वच्छता काम करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबतही आरोग्य कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

सफाई मित्र हे शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखण्याचे काम ते नियमितपणे करीत असतात. कचरा संकलन, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यासारखी विविध कामे करताना त्यांना अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरामुळे सफाई मित्रांना आरोग्यविषयक तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. सफाई मित्रांनीही आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

****

 

जालना जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’तून आरोग्य जनजागृती शाळांमध्ये लसीकरण, गर्भवतींचे समुपदेशन; एचपीव्ही लसीकरणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 





 

जालना,दि.30(जिमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत जालना जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून आरोग्य, लसीकरण, मातृ आरोग्य, पोषण तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत जिल्ह्यात विविध आरोग्य विषयक उपक्रम घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात शाळा तसेच आरोग्य केंद्रांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दासला येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. हिना नवाब आणि डॉ. बिलाल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या उपक्रमात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टीडी (Td) लस देण्यात आली. यामध्ये ८४ मुला-मुलींना टीडी लसीचा लाभ मिळाला. किशोरवयीन विद्यार्थ्यांना आवश्यक लसीकरण करून घेण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच सावंगी येथील एएनसी (ANC) क्लिनिकमध्ये गर्भवती महिलांची तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. गर्भावस्थेतील महिलांना सकस आहार, पौष्टिक अन्न, आरोग्य व स्वच्छता याबाबत माहिती देण्यात आली. तसेच गर्भावस्थेत तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.  ग्रामीण आणि दुर्गम भागातील गर्भवती महिलांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध होण्यासाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचा उपयोग होत आहे.

            प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारझरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा अंबा येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत माहिती व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना एचपीव्ही विषाणूमुळे होणारे आजार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि त्याच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी असलेले गैरसमज दूर करून ‘प्रतिबंध हाच उपचारापेक्षा उत्तम मार्ग’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती देत आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यात आली.

 ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जनजागृती यांना प्राधान्य दिले जात आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण, किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता, गर्भवती महिलांचे समुपदेशन आणि कर्करोग प्रतिबंधाबाबत माहिती अशा विविध उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील आरोग्यविषयक जागरूकता होत आहे.

****

जालना जिल्ह्यात चारा वाहतुक व विक्रीस बंदी हिरवा चारा, कडबा, कुट्टी, पेंढा, टीएमआरसह पशुखाद्याच्या वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

 

जालना,दि.30(जिमाका): जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ (प्रथम टप्पा) दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपलब्ध असलेला चारा बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्याच्या हद्दीतून अन्य जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर कोणत्याही प्रकारचा सुका अथवा ओला चारा वाहतूक करून नेण्यास तसेच विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (BNSS) मधील कलम १६३ अन्वये याबाबत आदेश काढला आहे. हा आदेश ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेला चारा मोठ्या प्रमाणावर इतर जिल्ह्यांत किंवा सीमावर्ती भागात विक्रीसाठी पाठविला जाऊ शकतो. त्यामुळे जालना जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कमी होऊन चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत पशुधनाच्या जीविताला धोका निर्माण होण्याबरोबरच त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे चाऱ्याची वाहतूक रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशानुसार हिरवा चारा, कडबा, कोणत्याही प्रकारची कुट्टी, पेंढा, टीएमआर व इतर प्रकारचे पशुखाद्य जिल्ह्याबाहेर नेता येणार नाही. या वस्तूंची जालना जिल्ह्याच्या हद्दीतून अन्य जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर वाहतूक करण्यास आणि विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला मात्र हा आदेश लागू राहणार नाही. संबंधित विभागाची अधिकृत परवानगी असल्यास अशा वाहतुकीस नियमांनुसार मुभा राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून चारा बाहेर नेताना संबंधितांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांत ट्रिगर-१ (प्रथम टप्पा) दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. सदर कालावधीत पशुधनासाठी चारा यांची उपलब्धता महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा जिल्ह्यातच उपलब्ध राहावा आणि स्थानिक पशुधनाला चारा मिळण्यात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्बंध लागू केला असल्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आदेशान्वये कळविले आहे.

****

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ महावितरणचा प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष

 


जालना,दि.30(जिमाका): वीजग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महावितरणकडून ‘सेवा सेतू’आणि ‘सेवा संकल्प अभियान’सुरू करण्यात आले आहे.

            सेवा संकल्प अभियान अंतर्गत जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ​आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या अंतर्गत जागेवरच ऑनलाईन अर्ज नोंदणी, योजनेचे आर्थिक फायदे व सौर संच बसविण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, कर्जाची सुविधा, अंदाजित खर्च यासाठी स्थानिक बँक प्रतिनिधी आणि निवडसूचीवरील सौर कंत्राटदार प्रतिनिधींशी थेट संपर्क व समन्वय करण्यात येत आहे. कर्जाची देखील सुविधा उपलब्ध होत आहे. यासह सौर योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच त्रुटींची पुर्तता करून प्रलंबित अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात येत आहे.

            या सेवा सेतू अभियानात नवीन घरगुती वीजजोडणी देणे, नादुरुस्त रोहित्र विनाविलंब बदलून देणे, वीज बिलावरील नावात बदल करणे, मंजूर भार बदलणे, बिलिंगविषयक तक्रारींचे निवारण करणे, प्रलंबित तक्रारींचे निवारण तसेच विद्युत सुरक्षेसाठी वीज यंत्रणेमध्ये आवश्यकतेनुसार स्पेसर बसवणे, इतर तांत्रिक उपाययोजना, वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती आदींना वेग देण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. सेवा सेतू व सेवा संकल्प अभियानात एकाच छत्राखाली उपलब्ध सर्व सेवा व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

****

 

निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन स्थगित

 


जालना : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०३ पदवीधर व ०२ शिक्षक मतदारसंघातील रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, म्हणजेच ६ डिसेंबर २०२६ पर्यंत निवडणूक आचारसंहिता लागू राहणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्याबाबत जालना जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जालना यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Monday, 28 September 2026

बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई; डेंग्यू नियंत्रणासाठी खासगी रुग्णालयांना अहवाल व रॅपिड टेस्ट रिर्पोटिंग बंधनकारक : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 




जालना,दि.28(जिमाका): जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांविरुद्ध कठोर मोहीम राबविण्याचे आणि डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवर समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल (भा.प्र.से.) यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील डॉक्टर्सची बैठक झाली. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

जिल्ह्यात 671 खासगी वैद्यकीय व्यावसायिक असून त्यापैकी 36 जण बोगस असल्याचे आढळले आहे. आतापर्यंत बोगस डॉक्टरांविरुद्ध ७ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व 7 प्रकरणांत कारवाई झाली आहे. बदनापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर तत्काळ गुन्हे (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश दिले. त्या म्हणाल्या की, बोगस डॉक्टरांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

जिल्ह्यात यावर्षी 28 सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे 17 रुग्ण आढळले असून, सध्या जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक झालेला नाही. आतापर्यंत 881 रॅपिड डेंग्यू एनएस१ अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 17 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, विविध ठिकाणी घरांमध्ये साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डासांचे जीवनचक्र तोडण्यासाठी साचलेले पाणी तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेंग्यूचे हॉटस्पॉट शोधून त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. डेंग्यू संशयित तसेच बाधित रुग्णांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक करण्यात येणार आहे. ताप असलेल्या डेंग्यू संशयित रुग्णांची रॅपिड डेंग्यू चाचणी करून त्याचे अहवाल संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना कळवावे लागणार आहेत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील रुग्णालयांना नियमित भेटी देऊन तपासणी व सनियंत्रण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयांकडून गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच बोगस डॉक्टरांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून फॉगिंग मोहीम राबवावी. ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांनी नाल्यांची स्वच्छता, नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा तसेच धूरफवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.डेंग्यू प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तयार करून ती प्रसारित करावी. प्रसारमाध्यमांतूनही नागरिकांना काय करावे आणि काय करू नये, याबाबत माहिती देण्यात यावी. डेंग्यूचा प्रसार एडिस इजिप्ती डासामुळे होतो. हा डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालतो आणि प्रामुख्याने दिवसा चावतो. त्यामुळे घरातील कुलर, कुंड्यांखालील ट्रे, रांजण आणि पाण्याच्या टाक्या आठवड्यातून किमान एकदा रिकाम्या करून कोरड्या कराव्यात.

घरातील पाण्याचे साठे झाकून ठेवावेत. छतावरील जुने टायर, प्लास्टिकच्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या आदी वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी किंवा अंगावर लाल पुरळ अशी लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे न घेता तातडीने शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. उपचार केवळ नोंदणीकृत डॉक्टरांकडूनच घ्यावेत. बोगस डॉक्टरांबाबत तक्रार असल्यास तालुका आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

**-*-*-*-*-

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पीक परिस्थितीची पाहणी

 







   जालना,दि.28 (जिमाका) : पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागाची पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी पाहणी केली. पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी आज बदनापुर तालूक्यातील कडेगाव, गेवराई बाजार आणि गोकुळवाडी तसेच जालना तालुक्यातील गणेशनगर शिवारातील शेतांमध्ये जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे जालना आणि बदनापुर तालूका दौऱ्यात शेतकरी बांधवांना आधार देत म्हणाल्या की, नुकसानग्रस्त पिकांची अवस्था पाहिल्यानंतर परिस्थिती गंभीर आहे. परंतु शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. राज्य शासनाकडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषी कर्जाच्या वसुलीला स्थगिती आणि कृषीपंपांच्या चालू वीजबिलात सवलत देण्याचा समावेश आहे.

 पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा यासाठी प्रशासकीय स्तरावर नियोजन केले जात आहे. ज्या भागात चाऱ्याची तीव्र टंचाई आहे, तिथे तातडीने चारा डेपो सुरू करणे आणि गाळपेरा जमिनींचा योग्य वापर करण्याबाबत धोरण आखले जात असल्याचे पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले. शेतकरी आणि शेतमजुरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बँक खात्यात तांत्रिक त्रुटी नसलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना मदतनिधीचे वाटप वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार अर्जून खोतकर, आमदार नारायण कुचे, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा अधिक्षक गहिनीनाथ कापसे, बदनापुर उपविभागीय अधिकारी लता बागुल यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

अपुऱ्या पावसामुळे सोमठाणा तलावातील मत्स्यउत्पादनात मोठी घट -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे • नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून मदतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश • जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती

 







 

जालना,दि.28(जिमाका): जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी तलाव परिसराची पाहणी करून मच्छीमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील राजेवाडी आणि सोमठाणा तलावांमधील पाणीसाठा, मत्स्यव्यवसायाची स्थिती आणि मच्छीमारांचे झालेले नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली.

मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आल्याने दुष्काळाच्या संकटात मच्छिमारांपर्यंतही शासनाची मदत पोहोचविण्याची भूमिका असल्याचे सांगत श्री. राणे म्हणाले की, तसेच स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधला. बदनापुर तालुक्यातील राजेवाडी आणि सोमठाणा तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम झाला आहे. पाणीसाठा आणि मत्स्यव्यवसायावरील परिणामाचे मोजमाप करून पंचनामे करुन त्यानुसार नियमानुसार मदत देण्याची केली जाणार असल्याचे श्री. राणे यांनी यावेळी सांगितले. 

यावर्षी अपुऱ्या पावसामुळे सोमाठणा तलावातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी मत्स्यउत्पादनावरही त्याचा गंभीर परिणाम झाला असून, गेल्यावर्षीच्या 79 टक्के मत्स्यउत्पादनाच्या तुलनेत यंदा हे उत्पादन केवळ 20 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून, शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांनाही शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तलावातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच मच्छीमारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहितीही यावेळी मच्छीमार बांधवांना देण्यात आली. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेऊन उपलब्ध शासकीय योजनांचा उपयोग करून घेण्याचे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.

यावेळी आमदार नारायण कुचे, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, सहाय्यक आयुक्त (भूजल) ऋता दिक्षित, प्रादेशिक आयुक्त, छत्रपती संभाजीनगर सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त मधुरिमा जाधव यांच्यासह मत्स्यव्यवसाय व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

जिल्ह्यातील नियोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्र्वविक्रमी रोजगार महाकुंभ” स्थगित

 


जालना दि.28 (जिमाका) :महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्गदर्शनाखाली  तसेच जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना व मॉडेल करिअर सेंटर,  जालना यांच्या वतीने विविध ठिकाणी  जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ स्थगित करण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी नियोजित रोजगार महाकुंभाचे आयोजन स्थगित करण्यात आले आहे. या रोजगार महाकुंभाची  नवीन तारीख व कार्यक्रमाची माहिती योग्य वेळी प्रसिध्दी माध्यमांद्वारे जाहीर करण्यात येईल.

 तरी सर्व रोजगार इच्छुक  युवक – युवती, नोकरी इच्छुक उमेदवार, नियोक्ते, औद्योगिक आस्थापना तसेच संबंधित घटकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन  सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

Thursday, 24 September 2026

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


जालना, दि.24(जिमाका)  :   राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

   पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे सोमवार, दि. 28 सप्टेंबर, 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता जालना येथे आगमन दुपारी 1.30 वाजता  बदनापूर  व जालना तालुक्यात पीक परिस्थिती पाहणी करतील. दुपारी 2.30 वाजता जालना येथून वाहनाने मुंबईकडे प्रयाण करतील.

                                                               -*-*-*-*-*-

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकारातून उपक्रम; इंडिगोच्या सीएसआर कार्यक्रमातून मार्गदर्शन






 


 

जालना दि.24(जिमाका) : आकाशात झेप घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जालन्यातील मुलींना व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) होण्याची दिशा मिळाली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘गिव्हिंग विंग्ज टू फ्लाय’ या विशेष कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील 250 हून अधिक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

इंडिगोच्या सीएसआर उपक्रमांतर्गत भारत केअर्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरच्या संधी, कमर्शियल पायलट होण्यासाठीची पात्रता, प्रशिक्षण आणि निवड प्रक्रियेबाबत विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारिया आणि अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या उपस्थितीत झाले. पारंपरिक करिअरच्या पर्यायांबरोबरच विमान वाहतूक क्षेत्रातील संधींचा विचार करण्याचे आवाहन यावेळी विद्यार्थिनींना करण्यात आले.

भारत केअर्सचे कार्यक्रम समन्वयक कल्पेश मोहोद आणि मास्टर ट्रेनर रुपेश गाडेकर यांनी विद्यार्थिनींना कमर्शियल पायलट होण्यासाठी आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, प्रशिक्षण तसेच भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी पायलट प्रशिक्षण, अभ्यासक्रम, पात्रता आणि विमान वाहतूक क्षेत्रातील करिअरविषयी विविध प्रश्न विचारले. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रामुळे विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन झाले.

जालन्यातील बारवाले महाविद्यालयाच्या कॅप्टन गार्गी गिरी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. नुकतेच दक्षिण आफ्रिकेत कमर्शियल पायलट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या गिरी यांनी पायलट होण्याचा स्वतःचा प्रवास, प्रशिक्षणादरम्यान आलेल्या अडचणी आणि त्यासाठी केलेल्या मेहनतीची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाची भूमिका होती. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब खरात, शिक्षण विस्तार अधिकारी विनया वडजे, समन्वयक सुनील ढाकरके आणि तंत्रस्नेही सोरटी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. कलेक्टर थिंक टँक फेलो सुप्रविण पाखरे, मुख्यमंत्री फेलो सिमरन जैस्वाल आणि मुख्यमंत्री फेलो तनया सावंत यांनीही आयोजन व समन्वयासाठी सहकार्य केले.

कार्यशाळेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता ‘गिव्हिंग विंग्ज टू फ्लाय’च्या दुसऱ्या बॅचसाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत नोंदणी सुरू आहे. पात्र विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने  करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान : ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’चा लाभ घेण्याचे सहायक संचालक अनंत कदम यांचे आवाहन

 

जालना दि.24(जिमाका) : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व विविध प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत 27, 28 आणि 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यात विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.

या अभियानासाठी महसूल विभाग, योजनांशी संबंधित विविध शासकीय विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कागदपत्रे त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.

अभियानात आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी अथवा अधिवास दाखला, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.
यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासह विविध शासकीय योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांची यंत्रणा शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहे.

 

तालुकानिहाय शिबिरांचे वेळापत्रक

जालना तालुका : 27 सप्टेंबर रोजी शिकलगीर वस्ती, रामनगर, जालना येथे, तर 28 सप्टेंबर रोजी वडार वस्ती, शिवनगर, जालना येथे शिबिर होणार आहे.

बदनापूर तालुका : 27 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, आन्वी येथे, 28 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, धामणगाव येथे, तर 29  सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, वसंतनगर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अंबड तालुका : 27 सप्टेंबर रोजी नाथगोसावी वस्ती व बाबर वस्ती, अंबड येथे, तर 28 सप्टेंबर रोजी लोहार वस्ती व बंजारा वस्ती, शाहपूर येथे शिबिर होणार आहे.

घनसावंगी तालुका : 27 सप्टेंबर रोजी  भिल्लवस्ती, पारधी वस्ती, – घनसावंगी शहर, कैकाडी वस्ती मांदळा रोड, घनसावंगी, कैकाडी वस्ती भावनगर, घनसावंगी शहर  या परिसरातील संबंधित भटके-विमुक्त वस्त्यांमध्ये, 28 सप्टेंबर रोजी कैकाडी वस्ती, पारडगांव येथे, तर 29 सप्टेंबर रोजी कैकाडी वस्ती, रांजणी तसेच धनगर वस्ती, रांजणी येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मंठा तालुका : 27 सप्टेंबर रोजी कैकाडी वस्ती, मंठा येथे, 28 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, मंठा येथे, तर 29 सप्टेंबर रोजी धनगर वस्ती, तळणी येथे शिबिर होणार आहे.

परतूर तालुका : 27 सप्टेंबर रोजी वडार वस्ती येथे, 28 सप्टेंबर रोजी शिकलकरी वस्ती, परतूर येथे, तर 29 सप्टेंबर रोजी बंजारा वस्ती, आष्टी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भोकरदन तालुका : 27 सप्टेंबर रोजी नाथगोसावी वस्ती, भोकरदन, गोसावी समाज वस्ती फत्तेपूर (शिबीर नाथगोसावी येथे) भोकरदन परिसरात, 28 सप्टेंबर रोजी पारधी वस्ती व लबानवस्ती-  राजुर, परिसरात तर 29 सप्टेंबर रोजी तसेच बंजारा/ वस्ती, तपोवन, गोसावी वस्ती  - मोतीनगर  तपोवन परिसर येथे शिबिर होणार आहे.

जाफ्राबाद तालुका : 27 सप्टेंबर रोजी वडार वस्ती, गोंधळी वस्ती व धनगर वस्ती, खासगांव येथे, 28 सप्टेंबर रोजी गोसावी वस्ती, माहोरा येथे, तर 29 सप्टेंबर रोजी वडार वस्ती, जाफ्राबाद तसेच भोई वस्ती, जाफ्राबाद येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिबिरापूर्वी वस्तीस्तरावर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तात्काळ वाटप करण्यावर भर देण्यात येणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील विविध विभागांचे सक्षम अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी संबंधित शिबिरांच्या ठिकाणी उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

जिल्ह्यातील नियोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्र्वविक्रमी रोजगार महाकुंभ” स्थगित

 


जालना दि.24 (जिमाका) :महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ स्थगित करण्यात आला आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना तसेच मॉडेल करिअर सेंटर, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी या रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 ची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

रोजगार महाकुंभाची नवीन तारीख आणि कार्यक्रमाचे वेळापत्रक योग्य वेळी प्रसिद्धी माध्यमांद्वारे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी दिली.दरम्यान, रोजगाराच्या शोधात असलेले युवक-युवती, नोकरी इच्छुक उमेदवार, नियोक्ते, औद्योगिक आस्थापना तसेच संबंधित घटकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन  सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

अंगारकी चतुर्थी निमित्त वाहतुक मार्गात बदल

 

 


 

जालना दि.24 (जिमाका) :पोलीस ठाणे हसनाबाद हद्यीतील मौजे राजूर ता. भोकरदन येथे दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गणपती दर्शनासाठी मोठया प्रमाणावर भाविक मराठवाडा, खान्देश, विदर्भ येथून येतात. तसेच जालना शहरातून व भोकरदन, जाफ्राबाद भागातून मोठ्या प्रमाणावर स्त्रिया, पुरुष, अबालवृध्द, लहान मुले पायी दर्शनासाठी येतात. तसेच नमुद तिर्थक्षेत्र स्थळास महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे.

 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये  पोलीस अधीक्षक, तेघबीर सिंह संधू,  यांना प्राप्त  अधिकारान्वये  आदेशीत करीत आहेत. पोलीस ठाणे हसनाबाद हद्यीतील मौजे राजूर ता. भोकरदन येथे दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त श्री गणपती दर्शनासाठी येणारे भाविकांची गैरसोय होवू नये तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी व वाहतुकीची कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी म्हणून या दृष्टीकोनातून राजूर ता. भोकरदन कडे जाणारे व येणारे वाहनांचे वाहतुकीत अंशतः बदल करण्यात येत आहे.

वळविण्यात आलेल्या वाहतुकींचे मार्ग

भोकरदन चौफुली जालना येथून राजुर, भोकरदनकडे जाणारे जड वाहनधारक हे (भक्तांची वाहने वगळून) देऊळगांव राजा, जाफ्राबाद, माहोरा मार्गे भोकरदनकडे जातील व येतील.

भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयापासून राजुर मार्गे जालना कडे येणारे जड वाहनधारक हे (भक्तांची वाहने वगळून) माहोरा, जाफ्राबाद, देऊळगांव राजा या मार्गाने जालना कडे जातील व येतील.

दाभाडी कडून राजूर मार्गे भोकदनकडे जाणारे जड वाहनधारक हे (भक्तांची वाहने वगळून) हसनाबाद मार्गे भोकरदनकडे जातील व येतील.

टेंभुर्णीकडून राजूर मार्गे जालनाकडे येणारे जड वाहनधारक हे (भक्तांची वाहने वगळून) देऊळगाव राजा मार्गे जालनाकडे जातील व येतील.

टेंभुर्णीकडून राजूर मार्गे भोकरदनकडे जाणारे जड वाहनधाक हे (भक्तांची वाहने वगळून) जाफ्राबाद-माहोरा मार्गे भोकरदन कडे जातील व येतील.

वरील मार्गाची जड वाहतुक दि. 28 सप्टेंबर 2026  रोजीच्या 2.00 वाजेपासुन दि. 30 सप्टेंबर 2026 रोजीच्या 2.00वाजेपर्यंत बदल करण्यात आलेला आहे. तरी सर्व वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी.

हा  आदेश 28 सप्टेंबर 2026  रोजीच्या 2.00 वाजेपासुन दि. 30 सप्टेंबर 2026 रोजीच्या 2.00वाजेपर्यंत अंमलात राहील.

-*-*-*-*-