Friday, 31 July 2026

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

 




 

जालना,दि.31 (जिमाका) : ग्राहकांच्या समस्यांची सोडवून ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळाव्यात, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि ग्राहक संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी (अ.का.) शशिकांत हदगल, वैधमापनशास्त्र उपनियंत्रक, आर.डी.दराडे, जि.अ.कृ.अ. संजय कायंदे, पोलीस उपअधिक्षक सचिन इंगोले, महावितरणचे अभियंता धनाजी जाधव, अन्न व औषध  प्रशासन सहा.आयुक्त जी.द.जाधव, अनुजा नगरारे, अश्वीनी तांबे, आरोग्य विभागाचे  डॉ.नारायण पवार, मोटार वाहन निरिक्षक कल्पेश सुर्यवंशी यांची उपस्थिती होते.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ म्हणाले की, ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळाव्यात, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि ग्राहक संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे. तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच ग्राहकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्याचे आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत नागरिकांना दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या अडचणीबाबत उपाय योजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून, नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर करावे.

बैठकीत यावेळी अशासकीय सदस्यांनी बैठकीमध्ये विविध विषयाच्या ग्राहकांशी निगडीत तक्रारी मांडल्या, यामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आयुष्मान कार्डचे वितरण व लाभ नियमानुसार वितरीत करावे. तसेच अनधिकृत वैद्यकीय व्यावसाय (बोगस डॉक्टर) करणाऱ्यावर कारवाई करावी. तसेच अन्न औषध प्रशासनाने भेसळयुक्त खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी. शहरातील विविध भागात अनाधिकृत केबल किंवा इंटरनेटच्या केबलमुळे नागरिकांना त्रास होत असुन, ही केबल काढण्यात यावेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत आहे, त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच शालेय बस व व्हॅनची तपासणी करावी. महावितरणने नागरिकांची परवानगी घेवूनच स्मार्ट मिटर बसवावे. बैठकीत सिटी सर्व्हे कार्यालयाच्या कामकाजाबाबत गंभीर तक्रार मांडण्यात आली. काही प्रकरणांमध्ये संबंधित बँकेला कोणतीही पूर्वसूचना अथवा माहिती न देता मालमत्तेवरील बँकेचा बोजा कमी किंवा वगळला जात असल्याचे मुद्दे उपस्थित केले.

आजच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेवून, याबाबत योग्य कार्यवाही करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी यावेळी दिल्या.

यावेळी बैठकीत विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये आरोग्य विभागाच्यावतीने मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) संरक्षण देणारी सुरक्षित व प्रभावी लस उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. पालकांनी पात्र मुलींचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले. तसेच वैध मापन शास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्रात परवाना नूतनीकरण, वजन-माप उपकरणांची पडताळणी व मुद्रांकन यासह विविध सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाने ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने दूधापासून तयार केलेले पनीर आणि ॲनालॉग पनीर यातील फरक स्पष्ट केला. हॉटेल व रेस्टॉरंट चालकांनी ग्राहकांना कोणत्या प्रकारचे पनीर दिले जात आहे, याची माहिती मेनूमध्ये स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच औषधांची एक्सपायरी डेट, निकृष्ट दर्जाची औषधे किंवा कफ सिरपसारख्या उत्पादनांबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी विभागाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सारथी पोर्टल, वाहन पोर्टल व ई-चलान प्रणालीद्वारे विविध ऑनलाइन सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. महावितरण विभागाने स्मार्ट व प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प, तसेच शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजनेची माहिती दिली. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या महाविस्तार मोबाईल ॲप विषयी माहिती दिली. या ॲपद्वारे हवामान, कृषी सल्ला, बाजारभाव व विविध कृषी योजनांची माहिती उपलब्ध होत असल्याचे सांगितले. तसेच महाडीबीटी पोर्टलद्वारे कृषी विभागाच्या विविध अनुदानित योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करता येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (PMFME) अंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले जात असुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हा पुरवठा कार्यालयाचे श्री. डोईफोडे यांनी प्रास्ताविकात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे उद्दीष्ट सांगुन मागील बैठकीबाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच jalna.nic.in या संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन केले.

-*-*-*-*-*-

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह दौरा कार्यक्रम

 


       

        जालना,दि.31(जिमाका) : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.

            केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे दि. 01 ऑगस्ट, 2026 रोजी दूपारी 4.15 वाजता महिको प्रा.लि. सीड रिसर्च कंपनी, जालना येथे आगमन. तर सायं. 5.15 वाजता महिको प्रा. लि. बीज संशोधन केंद्र भेट देतील. सायं. 5.45 वाजता कापूस प्रक्षेत्रास भेट देतील. सोयीने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात संपन्न

 






जालना,दि.31(जिमाका) : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत, जालना  डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धेचे आयोजन डि.जे.पी. कॅम्पस, रेवगाव रोड, जालना येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

स्पर्धेत चित्रकला, घोषवाक्य लेखन, भाषण, लोकनृत्य, लोकगीत, रिल निर्मिती, पथनाट्य आणि मौखिक कविता अशा आठ विविध स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारताचा संदेश प्रभावीपणे सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व धन्वंतरी प्रार्थनेने झाली.

कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजु यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सहायक आयुक्त (कौशल्य विभाग) गणेश चिमणकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मिनल ठोसर होत्या.

भागवत शिंदे प्रशासकीय अधिकारी डी.जे.पी, डॉ. विठ्ठल कुचके प्राचार्य ओजस कॉलेज फार्मसी, डॉ.कृष्ण कुमार सिंग प्राचार्य ओजस कॉलेज फिजीयोथेरीपी, डॉ.के.जे.रमीता प्राचार्य ओजस कॉलेज ऑफ नर्सींग, डॉ.संगीता गायकवाड बी.एड. कॉलेज डी.जे.पी, विनीत म्हणुन मयुरकुमार गोरमे जिल्हा युवा अधिकारी माय भारत, डॉ.मुकुंद बंडले उप.प्रा डॉ.वे.पा.आ.वै.महा. व पुरुषोत्तम राखुंडे प्रा. ओजस कॉलेज फार्मसी उपस्थिती होते.

प्रास्ताविकात डॉ. मिनल ठोसर यांनी नशामुक्त भारत अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. सहायक जिल्हाधिकारी डॉ. रंगमंजु यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगत व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला. तसेच गणेश चिमणकर यांनी सर्व उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली.

स्पर्धांचे परीक्षण डॉ.बी.जी.श्रीरामे, डॉ.शिवानंद मुंढे, डॉ.मोनिश शिंदे, श्रीमती कांचन वाघ, व्ही.आर.ठोंबरे, डॉ.अभिषेक शुक्ला, डॉ. रेणुका भावसार बडवणे, डॉ.सुजाता देवरे, श्री शशिकांत वडले, मिलींद सावंत, डॉ. दिपक बुक्तरे, डॉ. अस्मिता शिंदे, डॉ.निशिकांत लोखंडे, विनोद जैतमहल, डॉ. अभिजीत जोशी, सतिष लिंगडे, लक्ष्मीकांत पोलास, डॉ. निधी शर्मा, परमेश्वर क्षिरसागर, गणेश नागवे, डॉ. गंगाधर धांडगे, बिस्मील्ला सय्यद, प्रशंसा घोरपडे यांनी केले.

स्पर्धेतील विजेत्यांमध्ये मौखिक कविता स्पर्धेत नम्रता पवार, प्रांजल तस व ऋतुजा गरजे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. लोकनृत्य स्पर्धेत वैष्णवी ढाकीणकर व टीम प्रथम, तनुजा पवार व टीम द्वितीय तर सारिका नागरे व टीम तृतीय ठरली. भाषण स्पर्धेत साक्षी सुरेश डांगे, श्वेता नवनाथ देशमुख व भूमिका आढाव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. 

घोषवाक्य स्पर्धेत साक्षी राजेंद्र ठाकूर, स्नेहा श्याम खरात व नेहा संजय जोगदंड, रिल स्पर्धेत शिवराज टेकाळे, जयदीप शिंदे व प्रगती बोरुडे, लोकगीत स्पर्धेत पियुष पाटील व टीम, साईनाथ पवार व अर्जुन उबाळे, चित्रकला स्पर्धेत अनुश्री कदम, स्वराली लाडे व कल्याणी पाटील, तर पथनाट्य स्पर्धेत पल्लवी व टीम, श्रावणी व टीम आणि कैफ खान यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेतील विजेत्यांना अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संजय सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.

कार्यक्रमाचा समारोप जिल्हा युवा अधिकारी मयुरकुमार गोरमे यांनी केला. सूत्रसंचालन धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत आणि सहारा सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष बी. एस. सय्यद यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड तसेच महाविद्यालयाचे अजित लाटे, अंकित कड, फैजान शेख, अफान हाश्मी, महेश देशमुख, प्रणव खेडकर व महाविद्यालयातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-

थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त राज्यभर कार्यक्रम 'पराक्रम दिना' निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन !

 


 

जालना,दि.31 (जिमाका) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 18 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा व राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, या उद्देशाने राज्यभरात 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

पराक्रम दिन साजरा करण्यासंदर्भात अमृत संस्थेमार्फत 'पराक्रम दिन समिती' स्थापन करण्यात आलेली असून त्या समितीमध्ये काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर, सौ. कौमुदी परांजपे या दिग्गज इतिहास तज्ञ आणि अभ्यासक यांचा समावेश आहे.या पराक्रम दिन निमित्ताने शाळा, महाविद्यालये व खुल्या गटातील नागरिकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जात असून जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

स्पर्धेचे स्वरूप, विषय, बक्षीसे आणि अधिकृत नियमावली 'पराक्रम दिन'च्या अधिकृत संकेतस्थळावर  सहभाग कसा नोंदवाल? (https://parakramdin.mahaamrut.org.in/#) उपलब्ध करून देण्यात आली आहे. संदर्भ पुस्तके आणि ई बुक : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी संबंधित शेकडो पुस्तके उपलब्ध आहेत. तथापि या स्पर्धांसाठी निवडण्यात आलेल्या विषयांसाठी निवडक संदर्भ पुस्तके "पराक्रम दिन समिती' निश्चित केलेली आहेत. त्यांची यादी वरील संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे थोरले बाजीराव पेशवे यांचा जीवन प्रवास अतिशय सोपा आणि संक्षिप्त पद्धतीने ई बुक स्वरूपात या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि या ई बुक च्या आधारावरच प्रश्नावली देखील तयार करण्यात आलेले आहेत. सर्व शाळा व महाविद्यालयांनी तसेच सर्व इच्छुकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेअंतर्गत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

  

जालना, दि. 31(जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना कार्यालयामार्फत "तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजना" अंतर्गत जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

तृतीयपंथीयांची कार्यशाळा दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे.

कार्यशाळेमध्ये तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्क, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, सामाजिक सुरक्षा, ओळखपत्रे, कायदेशीर संरक्षण तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच उपस्थित तृतीयपंथीयांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक मार्गदर्शन व उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते  यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

Thursday, 30 July 2026

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान : तेलबिया काढणी पश्चात पायाभूत सुविधा (तेल काढणी युनिट) व गोदाम या घटकासाठी प्राप्त अर्जाची सोडत

 


 

            जालना,दि.30(जिमाका) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया (सन 2026-27) अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी फ्लेक्सी घटकातून गोदाम (250 मेट्रिक टन) बांधकाम तसेच काढणी पश्चात पायाभूत सुविधा (तेल काढणी युनिट) या घटकांसाठी लाभार्थी निवडीची सोडत दि. 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी फ्लेक्सी घटकातून 250 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाच्या बांधकामासाठी एक भौतिक लक्ष्य प्राप्त झाले असून, या घटकासाठी प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 14.40 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. तसेच काढणी पश्चात पायाभूत सुविधा (तेल काढणी युनिट) या घटकासाठीही एक भौतिक लक्ष्य मंजूर असून, त्यासाठी प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9.90 लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे.

या दोन्ही घटकांसाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज स्वीकारण्यात आले असून, ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राप्त अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने सोडत काढून करण्यात येणार आहे.

सोडत प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच अर्जदार शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, संपूर्ण प्रक्रिया त्यांच्या समक्ष पार पाडण्यात येईल. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-*-

खरीप 2026 पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; अर्ज प्रक्रिया प्रथमच पूर्णपणे ऑनलाईन

 


 

जालना,दि.30 (जिमाका) : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये अधिक उत्पादन घेण्याची स्पर्धात्मक भावना निर्माण करून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, तसेच कृषि उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने कृषी विभागामार्फत दरवर्षी राबविण्यात येणारी राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकस्पर्धा यंदाच्या खरीप हंगाम 2026 पासून पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहीनीनाथ कापसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

राज्यात विविध भागांतील प्रयोगशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची उत्पादकता वाढवित आहेत. अशा शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच त्यांच्या अनुभवाचा लाभ इतर शेतकऱ्यांनाही मिळावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. यामुळे राज्याच्या एकूण कृषी उत्पादनातही मोलाची भर पडण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी पिकस्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, सुलभता आणि गतिमानता आणण्यासाठी खरीप हंगाम 2026 पासून स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या प्रमुख पिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर होणार असून, तालुकास्तरावरील उत्पादकतेच्या आधारे पुढील स्तरासाठी विजेत्यांची निवड करण्यात येईल. स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी अशा दोन्ही गटांसाठी खुली आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वतःच्या मशागतीखाली असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. मात्र भात पिकासाठी किमान 20 गुंठे, तर इतर सर्व पिकांसाठी 40 गुंठे सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करताना फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याची पावती, आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र तसेच बँक खाते किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत अपलोड करावी लागणार आहे.

मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026, तर ज्वारी, बाजरी, मका, तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.  स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना ₹300, तर आदिवासी गटातील शेतकऱ्यांना ₹150 प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. तालुका स्तरावर अनुक्रमे ₹5 हजार, ₹3 हजार आणि ₹2 हजार, जिल्हा स्तरावर ₹10 हजार, ₹7 हजार आणि ₹5 हजार, तर राज्य स्तरावर ₹50 हजार, ₹40 हजार आणि ₹30 हजार अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील 'पीक स्पर्धा नोंदणी' या टॅबद्वारे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहीनीनाथ कापसे यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-*-

जिल्हा उद्योग मित्र समितीसह पाच समित्यांची संयुक्त बैठक; एमआयडीसी पायाभूत सुविधा, निर्यातवाढ, स्थानिकांना रोजगार आणि सिल्क हब विकासावर भर

 

 

जालना दि.30 (जिमाका) : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देणे, उद्योजकांच्या विविध समस्या सोडविणे, स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे तसेच जिल्ह्याच्या निर्यातक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हास्तरीय सल्लागार समिती, आजारी उद्योग पुनर्वसन समिती, स्थानिक लोकांना रोजगारात प्राधान्य समिती आणि जिल्हा निर्यात प्रचालन समिती यांची संयुक्त बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा सदस्य सचिव योगेश सारणीकर, महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता ए. एल. सगरुळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, एम आय डीसीचे उपअभियंता बी. व्ही. राऊत, एन एच एल एम एलचे प्रकल्प व्यवस्थापक विकास मलीक, औद्योगिक संस्थेचे प्रतिनिधी अर्जुन गेही, मेटा रोल्सचे शुभम सोनी तसेच उद्योजक सुनील रायठट्टा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जुन्या एम आय डीसी क्षेत्राला जोडणाऱ्या कन्हैयानगर ते मंठा चौफुली या मार्गासाठी स्वतंत्र बायपास रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव, औद्योगिक वसाहतीत वाहनतळ व सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी, विद्युत सुविधांचे नूतनीकरण, जालना औद्योगिक वसाहतीसाठी 'सिटी बस' सेवा सुरू करणे, समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ फ्लायओव्हर उभारणे तसेच एमआयडीसीतील मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

उद्योगांना विविध शासकीय सेवांचा लाभ 'मैत्री' पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने मिळावा, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नवीन उद्योग उभारणीला चालना द्यावी, यावरही बैठकीत भर देण्यात आला.

यावेळी कृषी विभागाच्या सहकार्याने जालना जिल्ह्याला 'सिल्क हब' म्हणून विकसित करण्याच्या संकल्पनेवर सविस्तर चर्चा झाली. रेशीम उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि उद्योगवाढीस चालना मिळू शकते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

 

जिल्ह्याच्या निर्यातवाढीसाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, औद्योगिक संघटना आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून सातत्याने पाठपुरावा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. जालना जिल्ह्याची औद्योगिक क्षमता अधिक प्रभावीपणे देश-विदेशातील बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत विविध उद्योगांशी संबंधित अडचणी, पायाभूत सुविधांतील सुधारणा, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच उद्योगवाढीस पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्यावर एकमत झाले. जिल्ह्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी अशा बैठका प्रभावी ठरत असून, विविध विषयांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

-*-*-*-*-*-

जिल्ह्यात रेड अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


जालना दि.30 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. दि. 30 जुलै,2026  रोजी रेड रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून, तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची आणि काही क्षणांसाठी वाऱ्याचा वेग ताशी 70 किमीपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

दि. 31 जुलै,2026  रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून, तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.दि. 1 ऑगस्ट रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.दि.2 ऑगस्ट 2026  रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.दि. 3 ऑगस्ट, 2026  रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सर्व नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणेशी संपर्क साधावा, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


 

जालना दि.30 (जिमाका) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात.

सन 2026-27 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा.

सन 2026-27 साठीच्या समान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. (Matching Schemes)इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना कमाल रु. 25 लाख.  

वरील योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.

सन 2026-27 साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. (Non Matching Schemes)

ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य (फर्निचर खरेदी रु. 4 लाख व इमारत बांधकाम (प्रस्ताव फक्त एकदाच) रु. 10 ते 15 लाख)

"ज्ञान कोपरा" विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य (रु. २.५० लाख) व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण (रु. 2 लाख)

 

महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य - (रु.6.20 लाख / व इमारत विस्तार रु. 10 लाख). राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य (रु. 1.50 लाख/रु. 2.50 लाख रु. 3 लाख)

"बालकोपरा" स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य कमाल (रु. 6.80 लाख)

 

योजनेसाठी करावयाचा अर्ज :-वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.mmlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी/ हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 21 ऑगस्ट 2026 पर्यंत पाठवावेत, तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या ऑनलाईन प्रणालीव्दारेही ऑनलाईन पाठविण्यात यावेत, असे आवाहन . प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन अशोक गाडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

Wednesday, 29 July 2026

विशेष वृत्त कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण तातडीने करा : प्रशासनाचे आवाहन जालना जिल्ह्यात 1 लाख 7 हजार 505पात्र शेतकरी; अद्याप 78 हजार 215 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी

 


जालना, दि.29(जिमाका): महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि दि. 31 मार्च 2026 अखेरपर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाची मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी जालना जिल्ह्यातील सर्व बँकांनी एकूण 2 लाख 3 हजार 283 थकबाकीदार खातेदारांची माहिती महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. या माहितीच्या आधारे दि. 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लाभार्थी यादीमध्ये जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 505 पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मात्र, या पात्र लाभार्थ्यांपैकी दि. 29 जुलै 2026 पर्यंत केवळ 29 हजार 290 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली असून, अजूनही 78 हजार 215 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार कार्ड व लाभार्थी यादीतील विशिष्ट क्रमांक सोबत न्यावा. केंद्रावर विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या कर्ज खात्याची माहिती आणि थकीत कर्जाची रक्कम दिसून येईल. सदर रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी सहमती दर्शवून आधार प्रमाणीकरण करावे. जर रक्कमेबाबत शंका अथवा आक्षेप असल्यास असहमती नोंदवूनही आधार प्रमाणीकरण करता येणार आहे.

शेतकऱ्यांनी असहमती नोंदवल्यानंतर संबंधित तक्रार ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर बँकेच्या अभिलेखांच्या आधारे तक्रारीची शहानिशा करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल आणि सुधारित माहिती पुन्हा पोर्टलवर अपलोड केली जाईल. याशिवाय, आधार प्रमाणीकरणासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालकास कोणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा संभ्रमाला बळी न पडता पात्र शेतकऱ्यांनी विनाशुल्क आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफीची कार्यवाही पूर्ण होऊन त्यांना भविष्यात नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्गही सुकर होणार आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून शासनाच्या महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना श्री. रोडगे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

 

 

 

 

शासकीस मुलींच्या वसतिगृहात प्रवेशसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

जालना,दि.29 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष 2026-27 करीता जालना शहरात नव्याने सुरु होणारे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, हॉटेल योजना इमारत, निरामय हॉस्पीटल शेजारी, रेल्वे स्टेशन रोड,जालना  येथे प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या इच्छुक मुलींनी/विद्यार्थिंनींना www.swayam.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर शासकीय वसतिगृहात  प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह गृहपाल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

राज्यातील ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील 9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी शिष्यवृती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

जालना, दि. 29 (जिमाका) :   जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (EBC) आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती (DNT) या प्रवर्गातीलकेंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या "PM YASASVI" (Top Class Education in School) या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (NSP) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

            शासन शुध्दीपत्रकान्वये इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (EBC) आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती (DNT) या प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत सन 2026-27 "PM YASASVI" (Top Class Education in School)  शिष्यवृत्ती योजनाही संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक इतर मागस बहुजन कल्याण  यांच्यामार्फत  राबविण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त 'टॉप क्लास' शाळांमध्ये चालू वर्षातइयत्ता ९ वी आणि ११ वीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

            प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी स्वतःचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आहे. मागील वर्षात (२०२५-२६) या योजनेचा लाभ घेतलेल्या इयत्ता ९ वी आणि ११ वी च्या विद्यार्थ्यांनी देखील चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्या अर्जांचेनूतनीकरण (Renewal) करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (NSP) ऑनलाइन नोंदवावेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेतील मुख्याध्यापक किंवा नोडल शिक्षकांशी तात्काळ संपर्क साधण्याचे वाहन अंनतकदम, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

Tuesday, 28 July 2026

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन

 


जालना, दि. 28 (जिमाका) :  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे शुक्रवार, दि. 31 जुलै,  2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला समितीवर नियुक्त शासकीय सदस्य, अशासकीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे ग्राहक हितासंबंधीत तक्रार असल्यास सदर बैठकीच्या दिवशी उपस्थित राहून आपला लेखी स्वरुपाचा अर्ज सादर करावा.

नागरिकांना ग्राहक या संबंधाने काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून, नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जालना संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव शशीकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

जागतिक कावीळ दिनानिमित्त जालना शहरात जनजागृती रॅली

 



जालना,दि.28(जिमाका) : जागतिक कावीळ दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, जालना आणि सनराईज शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी जालना शहरात कावीळ आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र एस. पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

"चला तर कावीळ मुक्त करूया" या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीद्वारे नागरिकांना कावीळ आजाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर निदान आणि उपचार याबाबत माहिती देण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते..

यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कावीळ आजार नियंत्रणासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत कावीळ निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, ते साध्य करण्यासाठी जनजागृती, लसीकरण आणि लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान जिल्हा रुग्णालयातील सुमारे 100 वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कावीळ प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. या उपक्रमात सनराईज रेस्टॉरंटचे संचालक  मोहन इंगळे, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. प्रकाश पाटोदेकर, डॉ. प्रशांत बांदल, डॉ. रवींद्र बेदरकर, डी. एच. बोर्डे, नितीश जाधव, संदीप लुखे, संतोष इंगळे, विद्या म्हस्के, चंद्रकांत मुंढे, विजय पवार, कांबळे, अमोल पेरकर, सोनाजी भुतेकर, दीपक जाधव तसेच जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्र, जालना येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना


 

Monday, 27 July 2026

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


जालना दि.27 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 27 जुलै रोजी यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा  (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) येण्याची शक्यता वर्तवली आहे. दि. 28 ते 31 जुलै रोजी यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा  (ताशी 40-50  कि.मी.प्र.ता. वेगाने) येण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

रायगड येथे निवासी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पोलीस पाटील व कोतवालांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपदा मित्र किट व प्रमाणपत्रांचे वितरण

 



रायगड येथे निवासी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पोलीस पाटील व कोतवालांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपदा मित्र किट व प्रमाणपत्रांचे वितरण

 

जालना,दि.27(जिमाका) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांच्या वतीने रायगड येथे आयोजित 12 दिवसांचे निवासी 'आपदा मित्र' प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून आलेल्या 68 पोलीस पाटील व कोतवालांना आज जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिमा मित्तल यांच्या हस्ते आपदा मित्र किट तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की, गावपातळीवर सक्षम व प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी निर्माण करून आपत्ती व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. आपत्तीच्या प्रसंगी गावपातळीवर सर्वप्रथम मदतीसाठी धावून जाणारे पोलीस पाटील व कोतवाल हे प्रशासनाचे महत्त्वाचे दुवे असून, रायगड येथे प्राप्त केलेले आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण, शोध व बचाव कार्य, प्रथमोपचार, पूर, वीज पडणे, अग्नी दुर्घटना, सर्पदंश तसेच आपत्कालीन परिस्थितीतील समन्वयाचे कौशल्य प्रत्यक्ष कार्यात वापरून गावातील नागरिकांचे जीवित व वित्तहानी कमी करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

रायगड येथे आयोजित निवासी प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील तात्काळ प्रतिसाद, शोध व बचाव कार्य, प्रथमोपचार, दोरीच्या साहाय्याने बचाव तंत्र, जलबचाव, अग्निसुरक्षा, समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध आपत्तीजन्य परिस्थितींचा प्रत्यक्ष सराव देण्यात आला.

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या 68 पोलीस पाटील व कोतवालांना गावपातळीवर प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साहित्य असलेले आपदा मित्र किट तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी जालना शहर महानगरपालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर, सतीश उढाण, ज्ञानेश्वर राऊत, छत्रसिंग कायते, राहुल बिजुले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेले पोलीस पाटील व कोतवाल उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-*-