Saturday, 25 July 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 : जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध; आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू

 


 

जालना, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026" अंतर्गत जालना जिल्ह्यातील पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेत जिल्ह्यातील 954 गावांतील पात्र शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली असून संबंधित गावांच्या ग्रामपंचायत कार्यालय, गाव चावडी, विविध कार्यकारी सेवा संस्था तसेच संबंधित बँक शाखांमध्ये ही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यातील शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांत अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्पादन खर्चात वाढ, बाजारभावातील चढ-उतार आणि नैसर्गिक संकटांमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि त्यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी राज्य शासनाने ही कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रति शेतकरी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत न भरलेले कर्ज या योजनेसाठी पात्र राहणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी शासनाने 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आपले सरकार सेवा केंद्र चालकांनीही कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

आधार प्रमाणीकरणाच्या वेळी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा कर्जाच्या रकमेबाबत काही त्रुटी आढळल्यास त्याबाबतची ऑनलाइन तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविण्यासाठी सेवा केंद्र चालकांना सांगावे. तसेच बोटांचे ठसे न उमटल्यामुळे आधार प्रमाणीकरण होत नसल्यास त्याबाबतची ऑनलाइन तक्रार तहसीलदारांकडे नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी वेळेत आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ घ्यावा तसेच सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून कोणतेही शुल्क आकारू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना विष्णु रोडगे यांनी केले आहे.

 

No comments:

Post a Comment