Tuesday, 7 July 2026

जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

 




            जालना, दि.7 (जिमाका): जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्या वतीने प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन गणेश चिमणकर, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

            सदर स्पर्धेचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता संपन्न झाले. यावेळी त्यांनी स्पर्धकांनी कौशल्य विकास, आत्मनिर्भर भारत, महिला सक्षमीकरण, डिजिटल कौशल्य आदी विषयांवर साकारलेल्या आकर्षक व कल्पक रांगोळ्यांचे अवलोकन करून सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक कौतुक केले. युवक-युवतींमधील सृजनशीलता, कौशल्य आणि सामाजिक जाणीव अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

            स्पर्धेमध्ये एकूण 41 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. परीक्षकांच्या निर्णयानुसार प्रथम क्रमांक प्रियंका पडूळ, अमृता लकडे, दीपिका आहेर, प्रेरणा आहेर व वैष्णवी कु-हे यांच्या समूहाने पटकाविला. द्वितीय क्रमांक विशाल पारवे यांनी, तर तृतीय क्रमांक निकिता दडके यांनी प्राप्त केला. सदर स्पर्धेसाठी अजिंठा चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य शाह एजाज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी स्पर्धकांच्या कल्पकता, विषयानुरूप मांडणी, रंगसंगती, कलात्मकता आणि सादरीकरणाच्या आधारे विजेत्यांची निवड केली.

            सदर उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कौशल्य विकास अधिकारी विशाल येवले तसेच अधिकारी व कर्मचारी अमोल बोरकर, दत्ता जाधव, डॉ. अमोल परिहार, नितीन लोकडे, प्रदीप डोळे, कैलास काळे, रविंद्र पाडमुख, विशाल जगरवाल, दीपक पालवे व गणेश सुपारकर यांनी परिश्रम घेतले.

            जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे युवक-युवतींना आपल्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच कौशल्य विकासाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यास मदत झाली, अशी भावना गणेश चिमणकर, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, यांनी  व्यक्त केली.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment