Wednesday, 8 July 2026

जालना जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धा 2026-27 च्या आयोजनासाठी तालुकानिहाय नियोजन बैठका; 13 ते 16 जुलैदरम्यान वेळापत्रक जाहीर

 


जालना, दि.8 (जिमका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांचे तालुकास्तर, जिल्हास्तर व विभागस्तरावरील आयोजन सुयोग्य व प्रभावी पद्धतीने पार पाडण्यासाठी जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आयोजन व नियोजन बैठका घेण्यात येणार आहेत. यासाठी दि. 13 ते दि. 16 जुलै 2026 या कालावधीत तालुकानिहाय बैठकींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

या बैठकींमध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन, यजमान संस्थांची निवड, पंचांची नियुक्ती, स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करणे, आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे, विविध समित्यांची स्थापना तसेच स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय व तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दि. 13 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता जाफ्राबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात जाफ्राबाद तालुक्याची बैठक होणार असून, त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता भोकरदन येथील जिल्हा परिषद प्रशालेत भोकरदन तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर दि. 14 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता परतूर येथील जिल्हा परिषद प्रशालेत परतूर तालुक्याची बैठक होणार असून, दुपारी 2.30 वाजता मंठा येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मंठा तालुक्याची बैठक पार पडणार आहे.

तसेच दि. 15 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता बदनापूर येथील शासकीय निवासी विद्यालयात बदनापूर तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता मस्तगड, जुना जालना येथील शिशु विहार प्री-प्रायमरी स्कूल येथे जालना तालुक्याची बैठक होणार आहे. तर  दि. 16 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता अंबड येथील मत्सोदरी महाविद्यालयात अंबड तालुक्याची बैठक होईल, तर दुपारी 2.30 वाजता घनसावंगी येथील गटसाधन केंद्रात घनसावंगी तालुक्याची बैठक संपन्न होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच संस्थाचालक यांनी आपल्या संस्थेतील क्रीडा शिक्षक अथवा क्रीडा प्रभारी यांना संबंधित तालुक्याच्या नियोजित बैठकीस वेळेत उपस्थित राहण्याबाबत सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. शालेय क्रीडा स्पर्धा सन 2026-27 चे नियोजन शिस्तबद्ध, पारदर्शक व यशस्वी पद्धतीने राबविण्यासाठी सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग नोंदवून आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment