Wednesday, 22 July 2026

भोकरदन येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर' उत्साहात; हजारो नागरिकांच्या विविध प्रशासकीय प्रश्नांचा जागीच निपटारा

 









 

जालना, दि. 22 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघासाठी आज (दि. 22) आयोजित करण्यात आलेले 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान'  समृद्धी लॉन्स, सिल्लोड रोड, भोकरदन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, महसूल व इतर शासकीय विभागांशी संबंधित शेकडो अर्ज व तक्रारींचा जागीच निपटारा करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या विविध सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकाच ठिकाणी पोहोचाव्यात, प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, उपविभागीय अधिकारी तथा मुख्य नोडल अधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे (भोकरदन), तहसीलदार अविनाश लोंढे (जाफ्राबाद) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार संतोष पाटील दानवे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ, दाखले व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी हे महसूल समाधान शिबीर अत्यंत उपयुक्त ठरले आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांचा वेळ व खर्च वाचत असून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत आहे."

जिल्हाधिकारी अशिमा मित्तल आणि उपविभागीय अधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विविध विभागांमधील उत्तम समन्वयामुळे नागरिकांना तातडीने सेवा उपलब्ध करून देणे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिबिरात महसूल विभाग, भूमी अभिलेख, कृषी, पंचायत राज, आरोग्य, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, बँक, सामाजिक न्याय, पशुसंवर्धन आदी विभागांचे स्वतंत्र सेवा कक्ष उभारण्यात आले होते. प्रत्येक विभागामार्फत नागरिकांच्या विविध समस्यांवर तत्काळ कार्यवाही करून आवश्यक सेवा आणि लाभ उपलब्ध करून देण्यात आले.

महसूल व भूमी अभिलेख विभागामार्फत 'जिवंत ७/१२' मोहीम, ई-फेरफार, वारस नोंदी, कौटुंबिक वाटणीपत्र नोंदी तसेच प्रलंबित फेरफार प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आला. पात्र निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण, गावठाण स्वामित्व सनद वाटप, महिलांचे नाव ७/१२ उताऱ्यावर भोगवटादार म्हणून समाविष्ट करण्याची कार्यवाही तसेच महिला शेतकरी दाखल्यांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते अभियानांतर्गत प्रलंबित शेतरस्त्यांबाबतही आवश्यक मंजुरीपत्रे देण्यात आली.

अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत नवीन डिजिटल शिधापत्रिकांचे वितरण, शिधापत्रिकांमधील दुरुस्ती अर्जांचा निपटारा करण्यात आला. तसेच उत्पन्न, रहिवासी व इतर शैक्षणिक प्रमाणपत्रे, नवीन मतदार नोंदणीसह विविध नागरिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

आरोग्य विभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी व वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. 'जलतारा' उपक्रम, वृक्षारोपण जनजागृती तसेच महिला बचत गटांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शनही देण्यात आले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालय भोकरदन व जाफ्राबाद, पंचायत समिती तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरात हजारो नागरिकांनी सहभाग घेत विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला आणि समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment