Friday, 10 July 2026

विशेष वृत्त कर्जमाफीसाठी आधार व अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य

 


जालना,दि.10(जिमाका): राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आता शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकाशिवाय कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर लाभ कोणत्याही परिस्थितीत दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक विष्णु रोडगे यांनी केले आहे.

योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज, जे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत होते आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जमीनधारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नसून, एका किंवा अनेक बँकांमधील मिळून कमाल दोन लाख रुपयांपर्यंतची मुद्दल व व्याजासह थकबाकी थेट संबंधित कर्ज खात्यात जमा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येणार आहे.

याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शासनाने दिलासा दिला आहे. सन 2022-23, सन 2023-24 आणि सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

अॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी प्रथम आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. त्यानंतर अॅग्रीस्टॅक पोर्टलवर जाऊन नोंदणी पूर्ण करावी. नोंदणी झाल्यानंतर मिळणारा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक संबंधित पीक कर्ज खाते असलेल्या बँकेत जमा करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा क्रमांक आधीपासून उपलब्ध आहे, मात्र त्यांनी तो अद्याप बँकेत सादर केलेला नाही, त्यांनीही तो तातडीने बँकेकडे सादर करावा.

अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकाशिवाय कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर लाभाची रक्कम खात्यात जमा होणार नसल्याने पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता आवश्यक नोंदणी करून संबंधित बँकेत माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक  विष्णु रोडगे यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment