जालना,दि.30 (जिमाका) : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये अधिक उत्पादन घेण्याची
स्पर्धात्मक भावना निर्माण करून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, तसेच कृषि उत्पादनात
वाढ व्हावी या उद्देशाने कृषी विभागामार्फत दरवर्षी राबविण्यात येणारी राज्यांतर्गत
अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकस्पर्धा यंदाच्या खरीप हंगाम 2026 पासून पूर्णपणे
ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या
ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी गहीनीनाथ कापसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
राज्यात
विविध भागांतील प्रयोगशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची उत्पादकता
वाढवित आहेत. अशा शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच
त्यांच्या अनुभवाचा लाभ इतर शेतकऱ्यांनाही मिळावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित
केली जाते. यामुळे राज्याच्या एकूण कृषी उत्पादनातही मोलाची भर पडण्यास मदत होणार आहे.
यापूर्वी पिकस्पर्धेची
संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र प्रशासकीय कामकाजात
पारदर्शकता, सुलभता आणि गतिमानता आणण्यासाठी खरीप हंगाम 2026 पासून स्वतंत्र ऑनलाईन
संगणक प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
यंदाच्या
खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या
प्रमुख पिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य
अशा तीन स्तरांवर होणार असून, तालुकास्तरावरील उत्पादकतेच्या आधारे पुढील स्तरासाठी
विजेत्यांची निवड करण्यात येईल. स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी अशा दोन्ही गटांसाठी
खुली आहे.
स्पर्धेत
सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वतःच्या मशागतीखाली असणे
आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
मात्र भात पिकासाठी किमान 20 गुंठे, तर इतर सर्व पिकांसाठी 40 गुंठे सलग क्षेत्रावर
लागवड असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन
अर्ज करताना फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याची पावती, आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी
जात प्रमाणपत्र तसेच बँक खाते किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत अपलोड करावी लागणार
आहे.
मूग व उडीद पिकांसाठी
अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026, तर ज्वारी, बाजरी, मका, तूर, सोयाबीन, भुईमूग
व सूर्यफूल या पिकांसाठी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना
₹300, तर आदिवासी गटातील शेतकऱ्यांना ₹150 प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे.
स्पर्धेतील
विजेत्यांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.
तालुका स्तरावर अनुक्रमे ₹5 हजार, ₹3 हजार आणि ₹2 हजार, जिल्हा स्तरावर ₹10 हजार,
₹7 हजार आणि ₹5 हजार, तर राज्य स्तरावर ₹50 हजार, ₹40 हजार आणि ₹30 हजार अशी पारितोषिके
जाहीर करण्यात आली आहेत. कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील 'पीक स्पर्धा नोंदणी' या टॅबद्वारे
शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका
कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहीनीनाथ
कापसे यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment