Friday, 10 July 2026

सोशल मिडियावर अपप्रचार करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणार-उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वाहनधारकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये

 


 

जालना, दि.10 (जिमाका) : जिल्ह्यातील काही समाजकंटक सोशल मिडियाच्या माध्यमातून चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित करून शासकीय यंत्रणेची बदनामी करणाऱ्या तसेच वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1988 व त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमांनुसार वाहनधारकांनी विहित कालावधीत वाहनांची नोंदणी, फिटनेस, परवाना आदी बाबींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येते.

याच पार्श्वभूमीवर दिनांक 3 जुलै, 2026 रोजी नियमित तपासणीदरम्यान एका मालवाहू ट्रकवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर संबंधीत व्यक्तींनी शासकीय वाहन अडवून शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, तसेच जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार केले. या घटनेप्रकरणी संबंधित व्यक्तींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 अंतर्गत संबंधीतावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यानंतर काही समाजकंटकांकडून सोशल मिडियावर वस्तुस्थितीच्या विपरीत, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व संदेश प्रसारित करून उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि त्याच्या अधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या खोट्या माहितीमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत असून, शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शासकीय कार्यालय आणि अधिकाऱ्यांची सोशल मिडियावरुन बदनामी करणाऱ्या अशा समाजकंटाकाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच काही समाजकंटक वाहनधारकांना केवळ केसेस सोडवून देण्याचे आमिष दाखवून, "तुमच्या वाहनावर जालना जिल्ह्यात कारवाई होऊ देणार नाही.", "आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांना आम्ही बांधून ठेवले आहे.", किंवा "परिवहन विभागाच्या काही अधिकाऱ्यांची बदली लवकरच होणार आहे.", अशा प्रकारच्या अफवा पसरवत असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन परिवहन प्रशासनाने केले आहे.

परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, वाहनधारकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे. कोणत्याही दलाल, मध्यस्थ किंवा अनधिकृत व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये. नियमभंग करणाऱ्यांवर कोणताही दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप न मानता नियमानुसार कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मिडियावर कोणत्याही प्रकारची माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी आणि अपप्रचार टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संबंधीतावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

याशिवाय, कोणत्याही अधिकाऱ्यांचे नाव सांगून पैसे मागितले जात असल्यास किंवा कारवाई टाळण्याचे आमिष दाखविले जात असल्यास त्याची तात्काळ माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा जालना शहर पोलीस प्रशासनाला द्यावी, असेही उपप्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनधारक, प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सोशल मिडियावरील अफवा आणि अपप्रचारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment