जालना, दि.18 (जिमाका) : औरंगाबाद विभाग पदवीधर
मतदारसंघाच्या २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात निवडणूक
प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी
सुरू केली आहे. यासाठी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, मतदान केंद्रांवरील सुविधा,
मनुष्यबळाचे नियोजन आणि मतदान साहित्याच्या व्यवस्थेबाबत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात
आली.
दि. 16 ऑक्टोबर 2026
रोजी जिल्हाधिकारी जालना यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत
कनवारीया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संधु, अप्पर जिल्हाधिकारी
रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष
यादव यावेळी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान
कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना
यावेळी देण्यात आल्या.
जिल्ह्यात
89 मतदान केंद्रे
जालना जिल्ह्यातील आठ
तालुक्यांमध्ये एकूण 89 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर एकूण
33 हजार 196 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 26 हजार 732 पुरुष, 6 हजार
463 महिला आणि एका इतर मतदाराचा समावेश आहे.
तालुकानिहाय
मतदान केंद्रे आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
जालना तालुक्यात 24 मतदान
केंद्रांवर 8 हजार 578 मतदार, बदनापूर तालुक्यात 7 केंद्रांवर 2 हजार 241 मतदार, भोकरदन
तालुक्यात 13 केंद्रांवर 4 हजार 404 मतदार, जाफराबाद तालुक्यात 7 केंद्रांवर 2 हजार
951 मतदार, परतूर तालुक्यात 8 केंद्रांवर 3 हजार 218 मतदार, मंठा तालुक्यात 5 केंद्रांवर
1 हजार 924 मतदार, अंबड तालुक्यात 15 केंद्रांवर 5 हजार 962 मतदार, तर घनसावंगी तालुक्यात
10 केंद्रांवर 3 हजार 918 मतदार आहेत.
मतदान
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
निवडणूक प्रक्रिया योग्य
पद्धतीने पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण
देण्यात येत असून, दुसरे प्रशिक्षण १६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी स्तरावर पूर्ण
झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तिसरे प्रशिक्षण २२ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हास्तरावर
आयोजित करण्यात येणार आहे.
निवडणुकीदरम्यान मतदान
अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या
जबाबदाऱ्यांची माहिती देणे आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांना सज्ज
ठेवणे, यावर भर देण्यात येत आहे.
मतदान
केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध होणार
मतदान केंद्रांवर मतदारांसाठी
आवश्यक किमान सोयी-सुविधा (AMF) उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना
देण्यात आल्या आहेत. यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि रॅम्प यांसारख्या सुविधांचा
समावेश आहे. तहसीलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांना भेटी देऊन सुविधांची
पाहणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.
मतदान केंद्रांवरील व्यवस्था वेळेत पूर्ण करून मतदारांना
मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याचेही सांगण्यात आले.
मतदान
साहित्य आणि सुरक्षेचे नियोजन
मतदानाच्या दिवशी मतदान
केंद्रांवर आवश्यक साहित्य वेळेत पोहोचविण्यात येणार आहे. मतदान संपल्यानंतर सर्व साहित्य
तहसीलस्तरावर जमा करण्यात येईल. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आणून
सुरक्षितपणे ठेवण्यात येणार आहे. मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी आवश्यक वाहनांची व्यवस्था
आणि सुरक्षेचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
याशिवाय संवेदनशील मतदान
केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून, अशा केंद्रांना संबंधित अधिकाऱ्यांनी भेटी
देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आले. निवडणुकीच्या काळात कायदा
व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाने आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन करावे, असेही
सांगण्यात आले.
निवडणूक
पारदर्शकपणे पार पाडण्यावर भर
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक
ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे होणार असल्याने मतपत्रिकेच्या वापराबाबत आणि मतदान प्रक्रियेबाबत
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला. मतपत्रिकेवर
पसंतीक्रम नोंदविताना मतदारांनी योग्य पद्धतीने मतदान करावे, यासाठी आवश्यक मार्गदर्शन
करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
निवडणूक प्रक्रिया शांततेत,
निर्भय वातावरणात आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय
राखावा. मतदान केंद्रांवरील व्यवस्था, सुरक्षा, प्रशिक्षण आणि साहित्य वितरण याबाबत
कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे, असे निर्देश
बैठकीत देण्यात आले.
बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांच्यासह
विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-*-*-*-

