Tuesday, 16 June 2026

हुतात्मा जनार्दन मामा नागापुरकर आयटीआयमध्ये ऑगस्ट-2026 सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; 432 जागांसाठी 21 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


 

जालना,दि.16 (जिमाका):  राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) शिल्पकारागीर योजनेअंतर्गत ऑगस्ट-2026 सत्रासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, जालन्यातील हुतात्मा जनार्दन मामा नागापुरकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांतील एकूण 432 जागांसाठी प्रवेश उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी 21 जून 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्या तृप्ती रामचंद्र भोपे यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेनुसार उमेदवारांनी प्रवेश अर्ज निश्चित करणे तसेच संस्थानिहाय व्यवसायांचे विकल्प व प्राधान्यक्रम भरण्याची अंतिम मुदत 22 जून 2026 आहे. प्रवेशासाठी अर्ज भरणे पूर्णपणे ऑनलाईन असून उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज सादर करावा.

या संस्थेमध्ये फॅशन टेक्नॉलॉजी, शिवण तंत्रज्ञान (Sewing Technology), कोपा (COPA), यांत्रिकी डिझेल, संधाता (Fitter), पत्रेकारागीर (Sheet Metal Worker), यंत्रकारागीर (Turner), कातारी (Machinist), जोडारी (Welder), यांत्रिकी विद्युत (Electrician Mechanic), प्रशीतन व वातानुकूलित तंत्रज्ञ (Refrigeration and Air Conditioning Technician), आरेखक स्थापत्य (Draughtsman Civil), यांत्रिकी मोटार गाडी (Mechanic Motor Vehicle), विजतंत्री (Electrician), तारतंत्री (Wireman) आणि सोलार टेक्निशियन असे एकूण 16 व्यवसाय उपलब्ध आहेत.

महिला उमेदवारांसाठी प्रत्येक व्यवसायामध्ये 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच प्रशिक्षणार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार दरमहा 500 रुपये विद्यावेतन देण्यात येते.

संस्थेमध्ये नियमित प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर विशेष भर दिला जातो. यामध्ये ऑन-द-जॉब ट्रेनिंग (OJT), औद्योगिक भेटी (Industrial Visits) तसेच डीएसटी (DST) अंतर्गत सहा महिन्यांपर्यंत उद्योगांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. या कालावधीत संबंधित कंपन्यांकडून प्रशिक्षणार्थ्यांना मासिक मानधनही दिले जाते.

प्रवेश अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास उमेदवारांनी संस्थेच्या प्रवेश विभागाशी संपर्क साधावा. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन प्राचार्या तृप्ती रामचंद्र भोपे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment