जालना,दि.18(जिमाका): जागतिक बँकेच्या मदतीने राबविण्यात
येणाऱ्या ‘रॅम्प’ (Raising and Accelerating MSME Performance - RAMP)
कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे 27
जून, 2026 रोजी वाशी येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एमएसएमई शिखर परिषद व
पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यभरातील सुमारे 3
हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योजक आणि प्रतिनिधी सहभागी
होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात
येणाऱ्या या शिखर परिषदेचा उद्देश उद्योग क्षेत्रातील अग्रणी व्यक्ती, तज्ज्ञ,
धोरणकर्ते तसेच एमएसएमई क्षेत्रातील प्रतिनिधींना एकत्र आणून उद्योगवृद्धी,
सहकार्य, नवकल्पना, शाश्वतता आणि जागतिक बाजारपेठेतील संधी यांवर सखोल चर्चा घडवून
आणणे हा आहे. या परिषदेदरम्यान रॅम्प उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करून
व्यवसायात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या सूक्ष्म व लघुउद्योगांना (MSME)
विशेष एमएसएमई पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्पादन क्षमता, नवोन्मेष,
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत विकास आणि उद्योगातील उत्कृष्ट कामगिरी या
निकषांच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
एमएसएमई शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योजकांनी ttps://mahamsmeawards.in/summit
या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतरच परिषदेत सहभाग निश्चित
मानला जाणार आहे. तसेच पात्र सूक्ष्म व लघुउद्योगांनी https://mahamsmeawards.in
या संकेतस्थळावर एमएसएमई पुरस्कारांसाठी नामांकन (Nomination) सादर करण्याचे आवाहन
करण्यात आले आहे. राज्यातील विविध क्षेत्रांतील एकूण आठ श्रेणींमध्ये पुरस्कार
प्रदान करण्यात येणार आहेत.
पुरस्कारांसाठी
पात्रता
एमएसएमई पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या उद्योगांनी खालील अटी पूर्ण करणे
आवश्यक आहे :
• उद्योग महाराष्ट्रात नोंदणीकृत असावा व
किमान तीन वर्षांपासून कार्यरत असावा.
• संबंधित उद्योगाने रॅम्प
कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला असावा.
यामध्ये आरबीएसएमएस
(Raising & Business Support Measures), क्षमता विकास (Capacity Building),
एव्हीडीपी (Advanced Vendor Development Programme) तसेच कौशल्य विकास (Skill
Development) आदी योजनांचा समावेश आहे. जिल्हा उद्योग केंद्र, जालना यांनी
जिल्ह्यातील पात्र सूक्ष्म व लघुउद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत शिखर परिषद व
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नोंदणी करून सहभाग नोंदवावा, असे
आवाहन केले आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यो. रा. सारणीकर यांनी
जालना जिल्ह्यातील उद्योजकांना परिषदेत सहभागी होऊन उद्योग क्षेत्रातील नव्या
संधी, तांत्रिक प्रगती आणि व्यवसायवृद्धीसाठी उपयुक्त मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे
आवाहन केले आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment