जालना, दि.23 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत वर्ष 2023 आणि 2024 मधील विविध
राज्यस्तरीय कृषि पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, जालना जिल्ह्यातील
प्रयोगशील, नाविन्यपूर्ण आणि अभ्यासू शेतकऱ्यांनी या पुरस्कारांमध्ये उल्लेखनीय यश
संपादन केले आहे. जिल्ह्याच्या कृषि क्षेत्राचा गौरव वाढविणाऱ्या या गुणवंत
शेतकऱ्यांचा भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. 1 जुलै 2026 रोजी
दुपारी 1 वाजता मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (एनएससीआय डोम), वरळी
येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल
जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात
येणार आहे. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले,
कृषि राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल
यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कृषि सचिव परिमल सिंह
आणि कृषि आयुक्त सूरज मांढरे यांचीही कार्यक्रमास विशेष उपस्थिती असणार आहे.
पुरस्कारांच्या रकमेतील
चौपट वाढ
महाराष्ट्र शासनाने 7 फेब्रुवारी 2024
रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय कृषि पुरस्कारांच्या रकमेतील मोठी वाढ
केली आहे. नव्या धोरणानुसार पुरस्कारांच्या रकमांमध्ये जवळपास चौपट वाढ करण्यात
आली असून, निवड झालेल्या शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वाढीव रोख रक्कम
प्रदान करण्यात येणार आहे.
यामध्ये वसंतराव नाईक कृषि भूषण
पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार आणि कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कारासाठी
प्रत्येकी दोन लाख रुपये, युवा शेतकरी पुरस्कारासाठी एक लाख वीस हजार रुपये तर
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी 44 हजार रुपये रोख रक्कम देण्यात
येणार आहे. तसेच पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक पुरस्कार्थीस 15
हजार रुपये दैनिक व प्रवास भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती कृषि विभागाने
दिली आहे.
वर्ष 2023 मधील जालना
जिल्ह्याचे पुरस्कार विजेते
वर्ष 2023 साठी जालना जिल्ह्यातील चार
शेतकऱ्यांची विविध पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. परतूर तालुक्यातील रायपूर येथील
अभयकुमार बाजीराव काळुके यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार जाहीर
झाला आहे. बदनापूर तालुक्यातील वरुडी येथील जयकिशन रामदास शिंदे यांना कृषिभूषण
(सेंद्रिय शेती) पुरस्कार तर वाकुळणी येथील सोमनाथ सुधाकर अवघड यांना युवा शेतकरी
पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील श्रीकांत
बेलेश्वर आखाडे यांची वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
वर्ष 2024 मधील
पुरस्कार विजेते
वर्ष 2024 साठी अंबड तालुक्यातील
डोमेगाव येथील सौ. रंजना हनुमंतराव काळे यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर
झाला आहे. त्याच तालुक्यातील लालवाडी येथील गोवर्धन प्रभाकर उगले यांना कृषिभूषण
(सेंद्रिय शेती) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अंबड तालुक्यातील आलमगाव
येथील प्रल्हाद दत्तात्रय येळेकर यांची वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी
पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
जिल्ह्याच्या कृषि
प्रगतीचा सन्मान
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक
तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, जलव्यवस्थापन, पीकपद्धतीतील नवकल्पना आणि कृषी
क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रयोगांच्या बळावर राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण
केली आहे. या पुरस्कारांमुळे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळणार असून,
कृषि क्षेत्रातील नवोपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल तसेच जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी सर्व पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचे
अभिनंदन करून त्यांच्या यशाबद्दल गौरव व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्याच्या कृषि
वैभवात भर घालणाऱ्या या यशस्वी शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय सन्मान हा संपूर्ण
जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment