Tuesday, 2 June 2026

विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांसाठी ‘बेनेफिशियरी सत्यापन ॲप’ द्वारे हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध

 


जालना,दि.2(जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना आता ‘बेनेफिशियरी सत्यापन ॲप (BSA)’च्या माध्यमातून डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांतील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आदी योजनाद्वारे वृध्द, विधवा, निराधार महिला-पुरुष, दिव्यांग व इतर गरजु लाभार्थ्यांना  दरवर्षी  हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. संबंधित आर्थिक वर्षात लाभार्थ्यांनी प्रमाणपत्र सादर केल्यास बंद करण्यात आलेले अर्थसहाय्य पुन्हा सुरू करण्याची तरतूद शासनाने केली आहे.

केंद्र पुरस्कृत योजनांतील लाभार्थ्यांना मोबाईल अॅपच्या माध्यमातून हयात प्रमाणपत्र सादर करता यावे यासाठी ‘Beneficiary Satyapan App’ ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य पुरस्कृत योजनांतील लाभार्थ्यांनाही ऑफलाईन प्रक्रियेऐवजी BSA प्रणालीद्वारे ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

यामुळे वृद्ध, विधवा तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त लाभार्थ्यांना बँक, पोस्ट कार्यालय किंवा तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता राहणार नाही. लाभार्थी स्वतः मोबाईलद्वारे, नातेवाईकांच्या मदतीने किंवा गावपातळीवरील ग्राम महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आदींच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने हयात प्रमाणपत्र सादर करू शकतात.

ही सेवा लाभार्थ्यांसाठी निशुल्क असून, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रामार्फत सेवा घेतल्यास किमान 50 रुपये सेवा शुल्क देय राहील. लाभार्थ्यांनी स्वतः अथवा कुटुंबीयांच्या मदतीने BSA प्रणालीचा वापर करून हयात प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसिलदार (संगायो) प्रणाली तायडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

****

No comments:

Post a Comment