जालना,दि.18(जिमाका): मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र
तसेच ऑनलाइन कुणबी नोंदी शोधण्याबाबत मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी
कार्यालय, जालना येथे विशेष हेल्पलाईन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी
आशिमा मित्तल यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
शासनाच्या सामान्य
प्रशासन विभागाच्या 7 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयासह सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागाच्या 2 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ही कार्यवाही
करण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या पत्रानुसार
जिल्हा स्तरावर आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाने मराठा-कुणबी,
कुणबी-मराठा व कुणबी या जात प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेसाठी मा. न्यायमूर्ती संदीप
शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यपद्धती निश्चित केली आहे. या
प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ सेवा मिळावी यासाठी
गावपातळीवर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी
यांच्या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
आदेशानुसार, मराठा
समाजातील भूपुत्र, भूमिहीन, शेतमजूर अथवा वडिलोपार्जित शेती करणाऱ्या व्यक्तींकडे
जमीन मालकीचे पुरावे उपलब्ध नसल्यास त्यांनी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी किंवा
त्यानंतर संबंधित परिसरात वास्तव्यास असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. या
प्रतिज्ञापत्राच्या आधारे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून स्थानिक चौकशी करण्यात येणार
असून, संबंधित व्यक्तीच्या गावातील किंवा कुळातील नातेवाईकांना कुणबी जात
प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्याचीही पडताळणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार
गावपातळीवरील स्थानिक समिती आणि वंशावळ समितीच्या सहाय्याने चौकशी करून निर्णय
घेतला जाईल.
नागरिकांना या
प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कक्ष
सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांना कुणबी नोंदी शोधणे, जात
प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करणे, ऑनलाइन नोंदींचा वापर करणे तसेच जात पडताळणी
प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
हेल्पलाईन कक्षासाठी
खालील अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत :
• श्री. किशोर तायडे – नायब तहसीलदार
(महसूल), जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
• श्री. अशोक झळके – महसूल सहाय्यक,
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
नागरिकांनी कुणबी जात
प्रमाणपत्र व जात पडताळणीसंदर्भातील माहिती, मार्गदर्शन किंवा शंकानिरसनासाठी
हेल्पलाईन क्रमांक 02482-223132 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा
मित्तल यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment