Tuesday, 9 June 2026

ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहात प्रवेशाचे आवाहन

 


 

जालना,दि.9(जिमाका): समाजकल्याण विभागामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संबंधित वसतिगृहांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी केले आहे.

समाजकल्याण विभागाच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात जालना, अंबड, मंठा, बदनापूर आणि घनसावंगी येथे मुलांचे व मुलींचे असे एकूण नऊ शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत. या सर्व वसतिगृहांची एकत्रित प्रवेश क्षमता ९०० विद्यार्थ्यांची आहे.

या शासकीय वसतिगृहांमध्ये इयत्ता पाचवीपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली वह्या, पुस्तके, शालेय स्टेशनरी आदी साहित्यही विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते.

याशिवाय जिल्हास्तरीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ६०० रुपये, तर तालुकास्तरीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये निर्वाहभत्ता देण्यात येतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे.

प्रवेशासाठी अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असून तो ऊसतोड कामगाराचा पाल्य असावा, ही प्रमुख अट आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहांशी संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील वसतिगृहांची यादी

·  संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतिगृह, जालना – १०० जागा

·  संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, जालना – १०० जागा

·  संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतिगृह, अंबड – १०० जागा

·  संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, अंबड – १०० जागा

·  संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतिगृह, मंठा – १०० जागा

·  संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, मंठा – १०० जागा

·  संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वसतिगृह, बदनापूर – १०० जागा

·  संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, बदनापूर – १०० जागा

·  संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह, घनसावंगी – १०० जागा

एकूण प्रवेश क्षमता : ९०० विद्यार्थी

समाजकल्याण विभागाच्या या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणासाठी सुरक्षित निवास, भोजन व शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

 

-*-*-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment