Monday, 15 June 2026

दहावी-बारावी पुरवणी परीक्षांसाठी जालना जिल्ह्यात कलम 163 लागू परीक्षा केंद्रे व परिरक्षक केंद्रांच्या 500 मीटर परिसरात ध्वनीक्षेपक, झेरॉक्स व एसटीडी बूथ बंद राहणार

 


 

जालना,दि.15(जिमाका): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलै 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) पुरवणी परीक्षा सुरळीत, शांततापूर्ण आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जालना जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे व परिरक्षक केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) 2023 च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

अपर जिल्हादंडाधिकारी, जालना यांनी जारी केलेल्या आदेशानुसार इयत्ता 10 वीची परीक्षा दि. 16 जून ते 30 जून 2026 या कालावधीत जिल्ह्यातील आठ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. यात नूतन विद्यालय, जालना, राष्ट्रीय हिंदी विद्यालय (इंग्रजी माध्यम), जालना, समर्थ विद्यालय, अंबड, कै. दत्तासाहेब देशमुख हायस्कूल, घनसावंगी, जिल्हा परिषद प्रशाला भोकरदन, जिल्हा परिषद हायस्कूल जाफ्राबाद, श्री योगानंद माध्यमिक विद्यालय परतूर आणि स्वामी विवेकानंद विद्यालय, मंठा या केंद्रांचा समावेश आहे.

तसेच इयत्ता 12 वीची परीक्षा देखील दि. 16 जून ते 30 जून 2026 या कालावधीत जिल्ह्यातील सहा परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. यामध्ये जे.ई.एस. कॉलेज, जालना, मत्स्योदरी कला व वाणिज्य महाविद्यालय, अंबड, लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय, परतूर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मंठा, रेणुका कनिष्ठ महाविद्यालय, मंठा आणि श्री रामेश्वर आर्ट्स, कॉमर्स व कनिष्ठ महाविद्यालय, भोकरदन या केंद्रांचा समावेश आहे.

परीक्षांच्या सुरक्षित व शिस्तबद्ध आयोजनासाठी जिल्ह्यात सहा परिरक्षक केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद मुलांची प्रशाला, जालना, जिल्हा परिषद प्रशाला हायस्कूल, अंबड, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती भोकरदन, जिल्हा परिषद हायस्कूल, परतूर आणि जिल्हा परिषद हायस्कूल, मंठा यांचा समावेश आहे.

परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रे व परिरक्षक केंद्रांच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन या सर्व केंद्रांच्या 500 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. आदेशानुसार सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बूथ, फॅक्स केंद्रे, झेरॉक्स केंद्रे तसेच ध्वनीक्षेपकांचा वापर बंद ठेवण्यात येणार आहे.

अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पडावी तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध नसल्याने बीएनएसएस कलम 163 (2) अन्वये हा आदेश एकतर्फी स्वरूपात काढण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक, जालना यांच्यामार्फत या आदेशाची ध्वनिक्षेपकाद्वारे प्रसिद्धी करण्यात येणार असून, परीक्षा दिवसांमध्ये सकाळी 8.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत हा आदेश प्रभावी राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनाने विद्यार्थी, पालक, नागरिक आणि संबंधित व्यावसायिकांनी आदेशाचे पालन करून परीक्षा प्रक्रियेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment