जालना,दि.10(जिमाका): महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित
करण्यात येणारी महाराष्ट्र गट-ब
(अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 रविवार, दि. 14 जून
2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत जालना शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार
आहे. परीक्षेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने
परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या
माहितीनुसार, जालना शहरातील 17 उपकेंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. यामध्ये
मत्सोदरी शिक्षण संस्था कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट
पॉलिटेक्निक कॉलेज, बद्रीनारायण बारवाले कॉलेज, अंकुशराव टोपे महाविद्यालय,
राष्ट्रमाता इंदिरा गांधी आर्टस् अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, नूतन माध्यमिक व उच्च
माध्यमिक विद्यालय, श्री एम. एस. जैन इंग्लिश स्कूल, राष्ट्रीय हिंदी विद्यालय,
सेंट मेरी हायस्कूल (पार्ट ए व पार्ट बी), श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय,
जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल, आर. जी. बगडिया आर्टस्, एस. बी. लखोटिया कॉमर्स अँड
आर. बेन्झॉजी सायन्स कॉलेज, रेयान इंटरनॅशनल स्कूल तसेच श्री एम. एस. जैन विद्यालय
(मराठी माध्यम) आदी केंद्रांचा समावेश आहे.
परीक्षेच्या कालावधीत परीक्षा
केंद्रांच्या परिसरात गर्दी, गोंधळ अथवा अशांतता निर्माण होऊन कायदा व
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित केंद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
करण्यात आले आहेत. हे आदेश दि.
14 जून 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रभावी राहणार
आहेत.
या कालावधीत परीक्षा
केंद्रांच्या परिसरात अनावश्यक गर्दी करणे, ध्वनिक्षेपकांचा वापर, मोर्चे, सभा
किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हालचालींवर
निर्बंध राहतील. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन, पोलीस विभाग
आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.
जिल्हा प्रशासनाने उमेदवार,
पालक आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून परीक्षा केंद्रांच्या
परिसरात नियमांचे पालन करून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment