Thursday, 25 June 2026

मार्डी येथे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा मुक्कामी दौरा महिलांच्या हॉलचा प्रश्न जागेवरच निकाली अवैध दारू विक्रीवर कडक कारवाईचे निर्देश

 








 

जालना, दि.26 (जिमाका): ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन प्रशासन जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अंबड तालुक्यातील मौजे मार्डी येथे 22 जून रोजी मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला, गावातील विकासकामांची पाहणी केली तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिला ग्रामसंघाच्या हॉलचा प्रश्न जागेवरच निकाली काढून लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला.

दौऱ्याची सुरुवात गावातील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनसंवाद सभेने झाली. या सभेला 500 हून अधिक ग्रामस्थ, विशेषतः महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रामस्थांनी गावातील विविध समस्या थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

महिलांच्या हॉलचा प्रश्न तात्काळ सोडविला

गावातील महिला व्हिलेज ऑर्गनायझेशन (ग्रामसंघ) अनेक वर्षांपासून कार्यरत असूनही त्यांना स्वतःचे कार्यालय उपलब्ध नव्हते. ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांवरील हॉल काही व्यक्तींच्या अनधिकृत ताब्यात असल्याची तक्रार महिलांनी केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन संबंधित हॉलचा ताबा महिलांना मिळवून दिला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाल्याने महिलांनी समाधान व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.

अवैध दारू विक्री विरोधात कठोर भूमिका

जनसंवाद सभेत महिलांनी गावातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण बिघडत असल्याची व्यथा मांडली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला तात्काळ कारवाईचे आदेश देत गावातील सर्व अवैध दारू अड्ड्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पीकपद्धतीत बदलाचे आवाहन

यंदा 'एल निनो'च्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता आधुनिक आणि कमी पाण्यात येणाऱ्या अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले. चिया सीड्सची लागवड, रेशीम शेती (सेरीकल्चर) यांसारख्या हाय-व्हॅल्यू शेतीबरोबरच 'जल कवच' योजनेअंतर्गत विहीर पुनर्भरण, शेततळ्यांचा वापर आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

पहाटेपासून विविध शासकीय कार्यालयांची पाहणी

23 जून रोजी पहाटेच जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील विविध शासकीय कार्यालयांची आणि संस्थांची प्रत्यक्ष पाहणी केली.

महा-ई-सेवा केंद्रात नागरिकांना वेळेत आणि योग्य दरात सेवा मिळत असल्याची खातरजमा करण्यात आली. रेशन दुकानात अन्नसुरक्षा योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळत असल्याची तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजावर समाधान व्यक्त करत गावाने 'उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार' मिळविण्यासाठी डिजिटल प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांना स्वतः शिकविले धडे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देताना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी विषयांचे धडे दिले. तसेच शिक्षकांशी संवाद साधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सूचना केल्या.

अंगणवाडीतील तफावतीवर तात्काळ अहवालाचे आदेश

अंगणवाडी केंद्राच्या तपासणीत साठा आणि रजिस्टरमध्ये तफावत आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या खिचडीची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांनी स्वतः अन्नाची चवही घेतली.

लोकाभिमुख प्रशासनाची ग्रामस्थांकडून प्रशंसा

वरिष्ठ अधिकारी स्वतः गावात मुक्काम करून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून त्यावर तत्काळ निर्णय घेत असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे स्वागत केले. नरेगा, वीजपुरवठा, पाणीपुरवठा तसेच विविध विकासकामांबाबतही या दौऱ्यात सकारात्मक चर्चा झाली.

या दौऱ्यात अंबडचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, नगर परिषद अध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment