जालना,दि.18(जिमाका): जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या
'एल निनो'च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता
नाकारता येत नाही. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये,
यासाठी राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच सतर्क राहून चारा पिकांचे नियोजन
करावे, असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
पशुपालकांना
या संकटाचा सामना समर्थपणे करता यावा, यासाठी पशुसंवर्धनविभागाच्यावतीनेपशुपालक व
शेतकरी यांना पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले
आहे. गाई व म्हशींच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादनात घट होऊ नये म्हणून
पशुपालकांनी पोषक असणाऱ्या चारा पिकांची लागवड करावी. अशी पिके निवडावीत ज्यातून
मुख्य शेतमाल (धान्य/उत्पादन) तर मिळेलच, सोबतीला जनावरांच्या पोषणासाठी दर्जेदार
चाराही उपलब्ध होईल.
शेतकऱ्यांनी
आपल्या शेताच्या बांधावर अथवा पडीक जमिनीवर येणारे नैसर्गिक गवत वाया न घालवता
त्याचे योग्य जतन करावे. पावसाची ओढ किंवा टंचाईच्या संकट काळात हेच गवत
जनावरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा आधार ठरणार आहे.भविष्यातील संभाव्य
टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चारा
उत्पादनावर भर द्यावा. उत्पादित केलेला अतिरिक्त चारा 'मुरघास' किंवा सुक्या
चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवावा, जेणेकरून जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण
होणार नाही.
पशुसंवर्धन
विभागामार्फत 'एल निनो' च्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पशुपालक- शेतकरी
बांधवांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी विभागाच्यावतीने नियोजन करण्यात
येत आहे. या संभाव्य संकटकाळात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सक्षम
असून, कोणत्याही शंका तसेच अडचणी संदर्भात पशुपालकांनी 1962 या कॉल सेंटर नंबरवरुन
माहिती व पशुवैद्यकीय सेवा प्राप्त करुन घ्याव्यात, असे आवाहन पशुसंवर्धन
विभागामार्फत करण्यात आले आहे.
एल
निनोच्या सावटामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य टंचाईचा फटका आपल्या पशुधनाला बसू नये, ही
आपली प्राथमिकता असली पाहिजे. योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड आणि उपलब्ध
चाऱ्याची साठवणूक करून आपण पशुधनाचे पोषण आणि आपले आर्थिक उत्पन्न दोन्ही सुरक्षित
ठेवू शकतो. सर्व पशुपालकांनी या आवाहनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने
अंमलबजावणी करावी.
- डॉ. किरण
पाटील, आयुक्तपशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment